आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून आरोग्य आणि पारंपरिक औषधोपचारांना बळ दिल्याबद्दल केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चे स्वागत
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये आयुष क्षेत्रासाठी 4,408 कोटी रुपयांची मोठी तरतूद: केंद्रीय आयुष मंत्री
“केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आयुषच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी आरोग्य’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पाचा करतो पुनर्पुष्टी”
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2026 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2026
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य तसेच कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चे कौतुक केले आहे. त्यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन 'दूरदृष्टी असलेला, सर्वसमावेशक आणि भविष्यवेधी' असे केले असून, 'सर्वांसाठी आरोग्य' आणि 'विकसित भारत' याप्रती असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेची यातून पुष्टी होते, असे म्हटले आहे.
मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली, या अर्थसंकल्पाने आरोग्य क्षेत्राला एक निर्णायक दिशा दिली आहे. वाढीव निधी आणि पुरोगामी धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून देशातील प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्य सेवा यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे.
आयुष मंत्रालयासाठी 4,408 कोटी रुपयांच्या निधीचे स्वागत करताना प्रतापराव जाधव म्हणाले की, या वाढीव निधीमुळे आयुष पद्धतीला मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवेशी जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. तसेच, पुराव्यावर आधारित संशोधन आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन मिळेल आणि देशभरातील संस्थात्मक पायाभूत सुविधा तसेच मानवी साधनसंपत्तीची क्षमता वाढण्यास मदत होईल.
“केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा भारताला निरोगी आरोग्य आणि पारंपरिक औषधोपचारांचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या निरंतर प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य लवचिकता ) आणि समाजाच्या कल्याणासाठी आयुष-आधारित उपचारपद्धतीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या वाढीव निधीमुळे भारताच्या पारंपरिक औषधोपचार पद्धतीचा लाभ प्रत्येक घराघरात पोहोचवणे आम्हाला शक्य होईल,” असे मंत्री म्हणाले.
प्रमुख लक्ष्यित क्षेत्रांवर प्रकाश टाकताना मंत्र्यांनी नमूद केले की, आर्थिक वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प, आयुष शिक्षण आणि प्रशिक्षणाचे आधुनिकीकरण, राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत 'आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांचा' विस्तार तसेच मजबुतीकरण, त्याप्रमाणे संशोधन, मानकीकरण आणि गुणवत्ता हमी उपक्रमांना गती देण्यास मदत करेल.
आयुष क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या खालील महत्त्वाच्या उपक्रमांची, मंत्र्यांनी नोंद घेतली: शिक्षण, वैद्यकीय उपचार (क्लिनिकल) सेवा आणि संशोधनाला बळ देण्यासाठी तीन नवीन 'अखिल भारतीय आयुर्वेद संस्था' (ए आय आय ए) स्थापन करणे; गुणवत्ता, मानकीकरण आणि कुशल मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आयुष औषध निर्मिती( फार्मसी) आणि औषध चाचणी प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण करणे; पारंपरिक औषधोपचार क्षेत्रातील पुराव्यावर आधारित संशोधन आणि जागतिक पोहोच वाढवण्यासाठी जामनगर येथील जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्र (डब्ल्यू एच ओ ग्लोबल ट्रॅडिशनल मेडिसिन सेंटर) चे आधुनिकीकरण करणे;
त्यांनी पुढे सांगितले की, या अर्थसंकल्पामुळे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी क्षेत्रात जागतिक सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पोहोच वाढेल. त्यामुळे जागतिक स्तरावर पारंपरिक औषधोपचार क्षेत्रातील भारताचे नेतृत्व अधिक मजबूत होईल.
मंऔत्र्यांनी यावर भर दिला की, सरकारचा सर्वांगीण आरोग्यावर असलेला भर हा भारताच्या 'स्वस्थ भारत, संपन्न भारत' (आरोग्यमय भारत, समृद्ध भारत) या सांस्कृतिक विचारांशी सुसंगत आहे. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक प्रगती यांची एकत्रित वाटचाल होऊन एक अधिक आरोग्यदायी, लवचिक ( कुठल्याही आरोग्यविषयक प्रतिकूलतेत तरणारे) आणि स्वावलंबी राष्ट्र घडेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
* * *
नेहा कुलकर्णी/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2222152)
आगंतुक पटल : 56