आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैद्यकीय उपचार पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार प्रादेशिक वैद्यकीय केंद्रांची स्थापना करणार


केंद्रीय अर्थसंकल्पात आयुष पायाभूत सुविधांना आणि जागतिक प्रसाराला मोठी चालना

प्रविष्टि तिथि: 01 FEB 2026 1:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात, भारताला वैद्यकीय उपचार पर्यटनाचे जागतिक केंद्र (एमव्हीटी) बनविण्यासाठी आणि आयुष प्रणालीच्या बळकटीकरणासाठी अनेक उपाययोजनांची घोषणा केली. यामध्ये दर्जा, संशोधन, रोजगारनिर्मिती आणि जागतिक प्रसार यावर भर देण्यात आला आहे. 

वैद्यकीय उपचार पर्यटनासाठी प्रादेशिक वैद्यकीय केंद्र

वैद्यकीय उपचार पर्यटनासाठी प्राधान्याचे ठिकाण म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यासाठी खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून प्रादेशिक वैद्यकीय उपचार केंद्रांची स्थापना करण्यासाठी राज्यांना मदत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने सादर केला आहे.

या प्रस्तावित वैद्यकीय केंद्रांमध्ये आयुष केंद्रे, वैद्यकीय उपचार सुविधा पर्यटन केंद्रे आणि रोग निदानासाठीच्या आधुनिक पायाभूत सुविधा, उपचारानंतरची काळजी व पुनर्वसन या सुविधांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पर्यटकांना या केंद्रांमध्ये चांगल्या सुविधा  मिळाव्यात यासाठी या केंद्रांनी डॉक्टर्स आणि अन्य संबंधित आरोग्य उपचार व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या वैविध्यपूर्ण संधी निर्माण करणे अपेक्षित आहे. 

आयुष प्रणालीला जागतिक गती

आयुष उत्पादनांची वाढती आंतरराष्ट्रीय मागणी औषधी वनस्पतींची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीदेखील फायद्याची ठरत आहे. तसेच त्याच्यावरील प्रक्रिया व मूल्यवर्धन पद्धतींमध्ये सहभागी होणाऱ्या युवा पिढीसाठीही लाभदायक आहे.

आयुषसाठीच्या अर्थसंकल्पातील ठळक तरतूदी

आयुष क्षेत्राच्या मजबूतीसाठी आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रिय अर्थसंकल्पात पुढील उपक्रमांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दर्जेदार शिक्षण, वैद्यकीय  उपचार व संशोधन यांच्या विस्तारासाठी तीन नवीन अखिल भारतीय आयुर्वेद प्रशिक्षण संस्थांची स्थापना

उच्च दर्जा, प्रमाणीकरण व कुशल मनुष्यबळ उपलब्धतेच्या हमीसाठी आयुष औषधालये व औषध चाचणी प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण

प्रमाण आधारित संशोधन, प्रशिक्षण व पारंपरिक औषधोपचार प्रणालीच्या जागतिक प्रसारासाठी जामनगर येथील डब्ल्यूएचओ आंतरराष्ट्रीय पारंपरिक औषध केंद्राचे अद्ययावतीकरण

पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक आरोग्यसेवा यांच्या समावेशनातून भारताचे सुप्त सामर्थ्य विकसित करणे आणि सर्वंकष व प्रामाण्य  आधारित आरोग्यसेवांचे विश्वासार्ह जागतिक केंद्र अशी ओळख भारताला मिळवून देणे यासाठीची सरकारची वचनबद्धता या उपक्रमांमधून अधोरेखित होते.

***

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2221914) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati , Tamil