संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूरनंतर सादर झालेल्या संरक्षण अर्थसंकल्प 2026-27 ने एका भक्कम आणि पूर्णपणे अभेद्य सुरक्षा प्रणाली निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पाला दिली आणखी जास्त बळकटीः संरक्षणमंत्री


“वाढीव भांडवली खरेदीच्या बजेटमुळे लष्करी क्षमतांमध्ये अधिक वाढ होईल”

प्रविष्टि तिथि: 01 FEB 2026 5:22PM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 7.85 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ऑपरेशन सिंदुरच्या ऐतिहासिक यशानंतर मांडलेला हा अर्थसंकल्प देशाची भक्कम आणि अभेद्य सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या निर्धाराला अधिक बळ देत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक्स या समाज माध्यम मंचावरील एका पोस्टमध्ये त्यांनी ठामपणे सांगितले की, हा अर्थसंकल्प सुरक्षा, विकास आणि स्वावलंबन यांचा समतोल वाढवणारा आहे.

सशस्त्र दलांसाठी भांडवली खर्चासाठी 2.19 लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद  करण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले. यापैकी 1.85 लाख कोटी रुपये भांडवली सामग्री खरेदीसाठी राखून ठेवले आहेत, जे आर्थिक वर्ष 2025-26 च्या भांडवली खरेदी बजेट पेक्षा अंदाजे 24 टक्क्यांनी जास्त आहेत. यामुळे भारताची लष्करी क्षमता अधिक वाढेल. सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण हा या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी आणि त्यांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना राजनाथ सिंह म्हणाले की, माजी सैनिक अंशदान आरोग्य योजनेसाठी 12,100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ही तरतूद आर्थिक वर्ष 2025-26 च्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 45.49 टक्के जास्त आहे. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी असलेल्या सरकारच्या निर्धाराचा हा दाखला असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “हा अर्थसंकल्प जनतेच्या भावना आणि अपेक्षा पूर्ण करतो. हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांच्या उत्थानासाठी पुरेशा तरतुदींसह पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी एक भक्कम पाया प्रदान करतो.

***

निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2221873) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil