वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करारात जगातील एक तृतीयांश लोकसंख्या व्यापली जाते तसेच जागतिक जीडीपीच्या 25% प्रभावित करतो: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
भारताने चार वर्षांमध्ये आठ मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी करून प्रतिभा आणि व्यापारासाठी जागतिक संधी खुल्या केल्या : पीयूष गोयल
भारताचे चिलीसोबतचे आगामी मुक्त व्यापार करार महत्त्वपूर्ण खनिजांपर्यंत पोहोच वाढवतील: पीयूष गोयल
मजबूत व्यापक आर्थिक मूलभूत तत्त्वांमुळे जागतिक चढ -उतारातही भारताच्या निर्यातीत वाढ झाली : गोयल
184 शाखांमध्ये कार्यरत 5.25 लाख सनदी लेखापाल जागतिक स्तरावर भारताच्या व्यावसायिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन घडवतील : गोयल
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराचे उदाहरण देत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की हा करार जवळपास एक तृतीयांश लोकसंख्या व्यापतो, जागतिक जीडीपीच्या सुमारे 25 टक्के याचा वाटा आहे आणि जागतिक व्यापारातही महत्त्वपूर्ण वाटा आहे. ते आज ग्रेटर नोएडा येथे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) द्वारे आयोजित वर्ल्ड फोरम ऑफ अकाउंटंट्सला संबोधित करत होते. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी भारत-युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराचे वर्णन "सर्व करारांची जननी (मदर ऑफ ऑल डील्स)" असे करणे ही काही छोटी गोष्ट नाही.
युरोपियन बाजारपेठेच्या प्रचंड क्षमता अधोरेखित करत गोयल म्हणाले की, एकटे युरोपियन युनियन सुमारे 7 ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या वस्तू आणि 3 ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या सेवा आयात करतो, जे एकत्रितपणे 10 ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करते. भारताची सध्याची निर्यात ही या क्षमतेचा केवळ एक छोटासा भाग आहे असे ते म्हणाले . मात्र भारतासमोर अभूतपूर्व संधी आहेत आणि त्यांचा फायदा घेतला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
गेल्या चार वर्षांमध्ये भारताने आठ मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षरी केली आहे, जे जागतिक अर्थव्यवस्थेशी देशाच्या संबंधामधील मूलभूत बदल दर्शवतात . या कराराच्या कक्षेत युरोप आणि इतर प्रदेशांमधील प्रमुख अर्थव्यवस्था येतात, ज्यामध्ये 27 देशांचा युरोपियन युनियन, स्वित्झर्लंड, लिकटेंस्टाईन, नॉर्वे आणि आइसलँड यांचा समावेश असलेला चार देशांचा ईएफटीए गट, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिराती आणि ओमान यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. हे करार भारतीय प्रतिभा, कौशल्ये आणि युवा व्यावसायिकांसाठी नवीन आणि महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देत आहेत, तसेच जागतिक मूल्य साखळींबरोबर भारताचे एकीकरण मजबूत करत आहेत, असे गोयल यांनी नमूद केले.
वाणिज्य मंत्र्यांनी नमूद केले की, भारत लवकरच चिलीसोबत एक मुक्त व्यापार करार करणार असून त्यामुळे महत्त्वपूर्ण खनिजांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ईएफटीए देशांसोबतच्या कराराचा उल्लेख करत ते म्हणाले की, त्यात भारतात 100 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक करण्याप्रति वचनबद्धता समाविष्ट आहे, ज्याचा उद्देश पायाभूत सुविधा विकास, नवोन्मेष आणि अचूक निर्मितीला पाठिंबा देणे हा आहे. या गुंतवणुकीमध्ये सुमारे 50 लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, असे ते म्हणाले. मागील 25 वर्षांमध्ये अवघी 70 दशलक्ष डॉलर्सची एकूण गुंतवणूक करणारा न्यूझीलंड पुढील 15 वर्षांमध्ये भारतात 20अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे असे ते म्हणाले.
मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, या वचनबद्धता भारताच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीवरील, युवा लोकसंख्येवर, कौशल्यपूर्ण मनुष्यबळावरील आणि सचोटीवरील वाढता जागतिक विश्वास स्पष्टपणे दर्शवतात. त्यांनी नमूद केले की, भारतीय व्यावसायिक सुशिक्षित, महत्त्वाकांक्षी, परिश्रमी असून, त्याबद्दल जागतिक स्तरावर विश्वास आहे.
वर्ष 2047 पर्यंत भारताला एक विकसित आणि समृद्ध राष्ट्र बनवण्याच्या प्रवासात सनदी लेखापालांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकताना, मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, ज्यावेळी देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, त्यावेळी 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था म्हणून विकसित आणि समृद्ध भारताच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीचा अविभाज्य भाग बनण्याचा निर्धार सनदी लेखापालांनी केला आहे. त्यांनी अधोरेखित केले की, सनदी लेखापाल केवळ भारतातच नव्हे, तर भारत आणि उर्वरित जग यांच्यात एक दुवा म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावतील.
सध्याच्या जागतिक परिस्थितीचा संदर्भ देत मंत्री गोयल म्हणाले की, जग अस्थिर, अनिश्चित, गुंतागुंतीच्या त्याचबरोबर संदिग्ध काळातून जात आहे. सध्याच्या परिस्थितीला अशांत आणि अनपेक्षित टप्पा असे संबोधून, त्यांनी नमूद केले की, बदल वेगाने होत आहेत आणि केवळ आत्मविश्वास, प्रतिभा, कौशल्ये, मोठा विचार करण्याची क्षमता आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचे धैर्य असलेल्या व्यक्तीच यशस्वी होतील. अशा अनिश्चिततेच्या काळात, भारत स्थिरतेचे एक नंदनवन म्हणून उठून दिसतो, असे पीयूष गोयल म्हणाले.
मंत्र्यांनी अधोरेखित केले की, आज भारताचे मूलभूत स्थूल आर्थिक घटक मजबूत आहेत आणि उच्च वाढीचा दर आणि कमी महागाईसह भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. ते म्हणाले की, भारताकडे एक मजबूत बँकिंग प्रणाली आणि भक्कम परकीय चलनसाठा आहे. जागतिक व्यापार बाजारातील अस्थिरतेनंतरही, चालू वर्षातही भारताच्या वस्तू आणि सेवांची निर्यात वाढत आहे. 1.4 अब्ज भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, भारत अविरतपणे प्रगती करत राहील आणि लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.
यावेळी मंत्री पीयूष गोयल यांनी देशाच्या बदलत्या मानसिकतेबद्दल सांगितले, आणि आठवण करून दिली की, 2014 मध्ये भारत अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था बदलण्यासाठी, नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाची गरज होती. ते म्हणाले की, भारत आता पूर्वीच्या अंदाजांपेक्षा खूप आधी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास आत्मविश्वासाने सज्ज आहे आणि हा बदल देशाच्या दुर्गम भागांमध्येही दिसून येतो. त्यांनी नमूद केले की, भारत आता जगाशी संकोच किंवा बचावात्मक भूमिकेतून नव्हे, तर आत्मविश्वासाने संवाद साधतो. त्यांनी पुढे सांगितले की, भारत आता जे न्याय्य, समान आणि संतुलित आहे, अशाच प्रकारचे मुक्त व्यापार करार करीत आहे.
व्यावसायिकांच्या भूमिकेवर भर देताना, गोयल म्हणाले की, सनदी लेखापालांना भारतात आणि परदेशात, जागतिक क्षमता विकास केंद्रे, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी, यासह अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी आहेत. ते म्हणाले की, सत्य आणि वैध खाती प्रमाणित करण्यामध्ये हा व्यवसाय महत्वाची भूमिका बजावतो, यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास प्राप्त होतो आणि देशात भांडवल आकर्षित होते.
भारतातील 184 शाखांमध्ये आणि 47 देशांमध्ये कार्यरत असलेल्या 4.25 लाखांहून अधिक सक्रिय व्यावसायिकांसह 5.25 लाखांहून अधिक सनदी लेखापाल, यांच्या सहभागाने, या व्यवसायातील भारताचे सामर्थ्य जगापुढे सिद्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, भारतीय सनदी लेखापालांचे कठोर प्रशिक्षण आणि व्यापक ज्ञान त्यांना जगात कोठेही कामगिरी करण्यासाठी सक्षम बनवते.
व्यावसायिकांनी मोठा विचार करावा, असे आवाहन करत गोयल यांनी सनदी लेखापालांना अधिक महत्त्वाकांक्षा बाळगण्याचे, भागीदारी करण्याचे, कामकाज वाढवण्याचे आणि जागतिक संधींचा शोध घेण्याचे प्रोत्साहन दिले. त्यांनी कौशल्यांचा विस्तार करावा, सुरक्षित चौकट भेदून पुढे जावे, आणि अमृत काळातील संधीचा लाभ घेण्यासाठी सज्ज व्हावे, असे ते म्हणाले.
व्यावसायिक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय व्यापार, उत्पादन आणि सेवा यासह जागतिक स्तरावरील अनुभव देणाऱ्या विषयांचा समावेश करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. जगाशी जोडल्याशिवाय कोणताही देश विकसित होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले आणि जागतिक संधींचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी या व्यवसायाने स्वतःला सज्ज करावे असे आवाहन केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना गोयल म्हणाले की, जर व्यावसायिकांनी एकत्रितपणे भारताच्या विकासगाथेत मोठी भूमिका बजावण्याची वचनबद्धता दर्शवली, तर चार्टर्ड अकाउंटन्सी (सनदी लेखा) व्यवसायात अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्याची आणि अमृत काळात भारताला नव्या उंचीवर न्यायला सहाय्य करण्याची क्षमता आहे. भारताला विकसित राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय महासत्ता बनवण्यात हा व्यवसाय महत्वाचे योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
शैलेश पाटील/सोनाली काकडे/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221070)
आगंतुक पटल : 10