पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
भारत उर्जा सप्ताह 2026 मध्ये भारत आणि कॅनडा दरम्यान ऊर्जा सहकार्याबाबतच्या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2026 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2026
भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्रालय यांच्यातील संयुक्त निवेदन:
भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या निमंत्रणावरून, कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधन मंत्री टिमोथी हॉजसन यांनी गोव्यामध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीक 2026 (आयईडब्ल्यू'26) मध्ये भाग घेतला. आयईडब्ल्यूमध्ये कॅनेडियन कॅबिनेट मंत्र्यांचा हा पहिलाच उच्चस्तरीय सहभाग आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली आणि नव्याने सुरु करण्यात आलेल्या भारत-कॅनडा मंत्रीस्तरीय ऊर्जा संवादाचा प्रारंभ केला. या बैठकीदरम्यान, दोन्ही देशांची सुरक्षा, कल्याण आणि आर्थिक चैतन्य, यासाठी ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठ्यामधील विविधतेला असलेले असाधारण महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.
ही बैठक म्हणजे कॅनडामधील कानास्कीस येथे जून 2025 मध्ये आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत आणि कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या संवादाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशांचा पाठपुरावा आहे, यावेळी दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ मंत्रीस्तरीय, तसेच कार्यकारी स्तरावरील संवाद पुन्हा सुरू करण्याच्या महत्त्वावर जोर दिला होता. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि नॅचरल रिसोर्सेस कॅनडा यांनी दोन्ही देशांच्या ऊर्जा क्षेत्रांचे पूरक स्वरूप आणि ऊर्जा विषयक बाबींवर शाश्वत सहभागाद्वारे मिळणारा लाभ जाणला. कॅनडाने निर्यात विविधतेला प्राधान्य देऊन स्वच्छ आणि पारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ऊर्जा महासत्ता बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर जागतिक ऊर्जा परिदृश्याचे केंद्रस्थान असलेल्या भारतामध्ये, व्याप्ती, स्थिरता आणि दीर्घकालीन संधींवर आधारित, नैसर्गिक आणि सहजीवी भागीदारीची संधी उपलब्ध आहे.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या ऊर्जा क्षेत्रात संयुक्त व्यावसायिक आणि गुंतवणूक भागीदारीचे महत्त्व ओळखले.
दोन्ही नेत्यांनी जागतिक जैवइंधन आघाडी (जीबीए) द्वारे जैवइंधनाचा जागतिक विकास आणि वापराच्या माध्यमातून जागतिक ऊर्जा संक्रमणाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या सहयोगी प्रयत्नांची दखल घेतली, यामध्ये कॅनडा, हा निरीक्षक आहे.
चर्चेच्या आधारावर दोन्ही देशांमध्ये पुढील बाबींवर सहमती झाली:
- ऊर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण ऊर्जा पुरवठा साखळीचे महत्त्व. एक प्रमुख ग्राहक म्हणून भारत, आणि एक सुरक्षित, विश्वासार्ह पुरवठादार म्हणून कॅनडा, परस्परांबरोबरचा व्यापार अधिक दृढ करण्यासाठी आणि स्थिर व सुरक्षित ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भागीदारीमध्ये काम करू शकतील. भारत आणि कॅनडा सेवांसह ऊर्जा क्षेत्रातील व्यापारात सहकार्याला चालना देण्यासाठी आणि ते मजबूत करण्यासाठी सहकार्य करतील.
- भारत-कॅनडा मंत्रीस्तरीय ऊर्जा संवाद आणि नियमित आणि सध्या सुरु असलेल्या तज्ञांच्या सहकार्यासारख्या सरकार-ते-सरकार संवाद आणि सहकार्यासाठी दोन्ही देशांची वचनबद्धता.
- मूल्य साखळीमध्ये अर्थपूर्ण व्यवसाय-ते-व्यवसाय, किंवा व्यवसाय-ते-सरकार सहकार्याला पाठबळ देण्यासाठी भागीदारीने काम करण्याचा हेतू.
- जागतिक समुदायाच्या फायद्यासाठी हवामानविषयक उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय यंत्रणांद्वारे तसेच उद्योग भागीदारांसह काम सुरू ठेवण्याचा परस्पर हेतू.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219401)
आगंतुक पटल : 9