संसदीय कामकाज मंत्रालय
राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत सरकारने आज घेतली बैठक
39 राजकीय पक्षांच्या 51 नेत्यांची बैठकीत उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2026 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2026
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या नेत्यांची आज (27 जानेवारी 2026) नवी दिल्लीत संसद भवन संकुलात बैठक घेण्यात आली. संसदीय कामकाज तथा अल्पसंख्याक कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तथा रसायन आणि खत मंत्री तसेच राज्यसभेचे सभागृह नेते जे.पी.नड्डा, कायदा आणि न्याय तथा संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, आणि संसदीय कामकाज तथा माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन हेही उपस्थित होते. या बैठकीला मंत्र्यांसह 39 राजकीय पक्षांचे एकूण 51 नेते उपस्थित होते.

प्रारंभी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली की, "संसदेचे 2026 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 या दिवशी सुरु होईल आणि सरकारच्या कामकाजाच्या अत्यावश्यक बाबींच्या अधीन राहून, गुरुवार 2 एप्रिल 2026 ला ते संपण्याची शक्यता आहे. या काळात दोन्ही सदने शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026 पासून सुट्टीसाठी स्थगित राहणार असून सोमवार 9 मार्च 2026 ला सत्र पुन्हा सुरु होईल. विविध मंत्रालये/विभागांच्या अनुदानाच्या मागण्या तपासून त्यावर अहवाल तयार करण्यासाठी स्थायी समित्यांना वेळ मिळावा या उद्देशाने ही सुट्टी आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 शी संबंधित वित्तीय व्यवहारांना आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला हे अधिवेशन मुख्यत्वे समर्पित असेल, अशी माहिती रिजिजू यांनी दिली.

भारताचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 अनुक्रमे गुरुवार 29 जानेवारी 2026 आणि रविवार 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी संसदेसमोर मांडण्यात येतील असे संसदीय कामकाज मंत्र्यांनी नमूद केले. 'संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे' अशी विनंती त्यांनी सर्व नेत्यांना केली. तसेच, "संसदेच्या दोन्ही सदनांच्या नियमांनुसार सदनांमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे", असेही त्यांनी सांगितले. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केल्या जाऊ शकणाऱ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली मते मांडली आणि संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन सरकारला दिले.
* * *
निलिमा चितळे/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219380)
आगंतुक पटल : 4