इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी डीएलआय योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या सेमीकंडक्टर चिप डिझाइन कंपन्यांशी साधला संवाद
पुढील टप्प्यात किमान 50 फॅबलेस सेमीकंडक्टर कंपन्यांना सक्षम बनवण्याचे लक्ष्य
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2026 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2026
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथे सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाच्या डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआय) योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेल्या सेमीकंडक्टर चिप डिझाइन कंपन्यांशी संवाद साधला. प्रगतीचा आढावा घेणे, अभिनव डिझाइन कल्पना समजून घेणे आणि एक मजबूत, स्वदेशी सेमीकंडक्टर डिझाइन परिसंस्था तयार करण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी देणे यावर हा संवाद केंद्रित होता.

डीएलआय योजनेचा उद्देश एसओसी, दूरसंचार, पॉवर मॅनेजमेंट, एआय आणि आयओटी सारख्या क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि कंपन्यांना पाठिंबा देऊन देशांतर्गत चिप डिझाइन क्षमतांना गती देणे हा आहे, जेणेकरून महत्त्वाच्या सेमीकंडक्टर तंत्रज्ञानात भारत अधिक स्वयंपूर्ण होईल.
हितधारकांना संबोधित करताना, वैष्णव म्हणाले की सेमीकंडक्टर विकासाप्रति सरकारचा दीर्घकालीन, परिसंस्था संचालित दृष्टिकोन मूर्त परिणाम देत आहे.
डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह (डीएलआय) योजनेचे यश अधोरेखित करताना, मंत्र्यांनी नमूद केले की सुरुवातीला अपेक्षा कमी होती मात्र आज हा कार्यक्रम 24 स्टार्टअप्सना पाठबळ देतो, ज्यापैकी अनेकांनी आधीच टेप-आउट पूर्ण केले आहेत, उत्पादने प्रमाणित केली आहेत आणि बाजारपेठेत स्थान मिळवले आहे.
इंडिया सेमीकंडक्टर अभियानाने सेमीकंडक्टर स्टार्टअप्सना दिलेला व्यापक पाठिंबा अतुलनीय आहे यावर मंत्र्यांनी भर दिला आणि आता या कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा सरकारचा मानस असून पुढील टप्प्यात देशात किमान 50 फॅबलेस सेमीकंडक्टर कंपन्याना सक्षम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आगामी काळात , भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक फॅबलेस कंपन्यांचा उदय होताना पाहील ज्यांची आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी तुलना केली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नुकत्याच दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात झालेल्या बैठकांमधून मिळालेला प्रतिसाद सामायिक करत, मंत्री म्हणाले की आंतरराष्ट्रीय उद्योग नेत्यांनी भारताच्या सेमीकंडक्टर कार्यक्रमाचे गांभीर्य, व्यापक स्वरूप आणि अंमलबजावणी क्षमता मोठ्या प्रमाणात ओळखली आहे.
भारताच्या सेमीकंडक्टर डिझाइन क्षमता मजबूत करण्यासाठी मंत्र्यांनी सहा प्रमुख प्रणाली श्रेणींवर केंद्रित धोरणाची रूपरेषा आखली, यात कॉप्युट, आरएफ आणि वायरलेस, नेटवर्किंग, पॉवर मॅनेजमेंट, सेन्सर्स आणि मेमरी यांचा समावेश आहे.
प्रतिभा विकसित करण्यावर सरकारचा निरंतर भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दहा वर्षांत 85,000 कुशल व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना अवघ्या चार वर्षांमध्ये 67,000 हून अधिक सेमीकंडक्टर व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थेतील भारताच्या वाढत्या भूमिकेवर विश्वास व्यक्त करताना, मंत्री म्हणाले की, येत्या काळात जगातील सेमीकंडक्टर डिझाइन कामातले भारताचे योगदान लक्षणीय असेल, ज्याला देशांतर्गत स्टार्टअप्स, अभियंते आणि नवोन्मेषक चालना देतील आणि स्वतःचे आयपी, पेटंट आणि उद्योग स्थापन करतील.
केंद्र सरकार 2026 मध्ये प्रमुख क्षेत्रांमधील नवोन्मेषांची दखल घेण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डीप टेक पुरस्कार सुरु करेल अशी घोषणा वैष्णव यांनी केली.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219376)
आगंतुक पटल : 11