आयुष मंत्रालय
77 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात आयुष चित्ररथाने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2026 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
दिल्लीत कर्तव्य पथावर आयोजित 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये आयुष मंत्रालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून, भारताच्या पारंपरिक वैद्यकीय प्रणालींची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत सर्वसमावेशक चित्र सादर करण्यात आले. आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम) योजनेच्या अंतर्गत, चित्ररथाची संकल्पना, आत्मनिर्भर भारत आणि लोककेंद्रित विकासाच्या व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या 'आयुष का तंत्र, स्वास्थ का मंत्र' यावर आधारित होती.

आरोग्य आणि कल्याण यांच्या प्रती देशाच्या सांस्कृतिक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब दर्शवत या चित्ररथामधन, आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिगपा आणि होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक ज्ञान प्रणाली प्रतिबंधात्मक, प्रोत्साहन देणारी आणि समुदाय आधारित आरोग्य सेवेला बळकटी देण्यात कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे हे अधोरेखित करण्यात आले.
चित्ररथाच्या दर्शनी भागात, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भारताच्या पारंपरिक आरोग्य ज्ञानाच्या प्रतीकात्मक सादरीकरणातून आयुषचा मूलभूत उगम दर्शवण्यात आला होता. शिल्पकला आणि औषधी वनस्पतींच्या प्रतीकांतून मानवी आरोग्य आणि नैसर्गिक परिसंस्था यांच्यातले घनिष्ट नाते दर्शविण्यात आले तसेच शाश्वतता आणि सर्वांगीण जीवनशैली या आय़ुषच्या मूळ तत्वांवर भर देण्यात आला होता.

या रथावर राष्ट्रीय आयुष मिशन (एनएएम)द्वारे राष्ट्रीय आरोग्य आराखड्यातील आयुष मंत्रालयाची एकात्मिक संरचना दर्शवण्यात आली होती. तळाच्या स्तरावर आयुषमान आरोग्य मंदिर (आयुष) संस्थात्मक क्षमता बांधणी, शिक्षण आणि संशोधन उपक्रम ज्यामुळे देशभरात सुलभता आणि प्रमाणीकरण वृद्धिंगत करणाऱ्या आयुष सेवांच्या विस्तारावर दृकश्राव्य माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला.
या चित्ररथामधून, आरोग्य क्षेत्रातील अग्रणी डिजीटल सक्षम नेतृत्व म्हणून भारताचा उदय झाल्याचे दाखवण्यात आले.
सार्वजनिक सहभाग आणि लोक सहभाग हा या चित्ररथाच अविभाज्य भाग होता, त्यामध्ये योग अभ्यास, सर्वसाधारण वापरली जाणारी आयुष औषधे आणि शरीर, मन आणि आत्मा यांच्या सुसंवादाचे प्रतीक असलेल्या ध्यानमुद्रा दर्शवणारे देखावेही सादर करण्यात आले होते.
या चित्ररथामध्ये राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत, आरोग्य सेवा वितरण बळकट करण्यासाठी भारताच्या डिजीटल साधनांच्या वाढत्या वापराचेही प्रतिबिंब पहायला मिळाले. मर्मा, शिरोधारा आणि कपिंग यांसारख्या उपचार पद्धतीच्या त्रिमितीय सादरीकरणाद्वारे भारतीय उपचार पद्धतींमधील विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच पारंपरिक औषध ज्ञानाचा जागतिक स्तरावर प्रसार करणाऱ्या प्रमुख आयुष प्रणालींच्या प्रवर्तकांचाही उल्लेख करण्यात आला होता.

चित्ररथावर शेवटी, संस्थात्मक सातत्य, शिक्षण आणि उत्कृष्टतेचे प्रतीक असलेल्या आयुर्वेद महाविद्यालयाची प्रतिकृती उभारण्यात आली होती आणि भारताच्या सार्वजनिक आरोग्य प्रणालीचा एक गतिमान आणि विकसित आधारस्तंभ आणि जागतिक आरोग्य नेतृत्वाचा घटक म्हणून आयुष मंत्रालयाला अधोरेखित करण्यात आले होते.
* * *
निलिमा चितळे/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218815)
आगंतुक पटल : 9