वस्त्रोद्योग मंत्रालय
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या मुंबईतील संकुलामध्ये ‘समावेशक भविष्यासाठी डिझाईन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयएफटी) 40 व्या स्थापना दिनानिमित्त, संस्थेच्या वतीने येत्या 22 आणि 23 जानेवारी 2026 रोजी, संस्थेच्या मुंबई इथल्या संकुलात ‘समावेशक भविष्यासाठी डिझाईन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद 2026 आयोजित केली जाणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते संस्थेची आजवरची कालानुरुप वाटचालीची मांडणी असलेल्या एका भिंतीचे अनावरण तसेच गेल्या 40 वर्षांतील महत्त्वाच्या टप्पे उलगडणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाणार आहे.
देशातील फॅशन विषयक शिक्षण, डिझाईन विषयक नवोन्मेष आणि या उद्योग क्षेत्रात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने गेल्या चार दशकांत दिलेल्या योगदानाचा गौरव या परिषदेच्या निमित्ताने केला जाणार आहे. दोन दिवसीय परिषदेत प्रख्यात विचारवंतांची बीज भाषणे, शोधनिबंधांचे सादरीकरण, चर्चासत्रे, निमंत्रितांच्या निबंधांचे सादरीकरण, कार्यशाळा, हस्तकला बाजार तसेच विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राच्या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. 22 जानेवारी 2026 च्या संध्याकाळी संस्थेचे माजी विद्यार्थी आणि उद्योग प्रतिनिधींच्या परस्पर संवादाचे “संवाद” हे विशेष सत्र होणार आहे, यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्तेचा आधार असलेले संस्थेचा ‘VisionNxt’ या फॅशन पूर्वानुमान प्रयोगशाळेचा मास्टरक्लासही यानिमित्ताने होणार आहे.
या आयोजनाच्या अनुषंगाने विशेषरित्या आखणी केलेल्या हस्तकला बाजारामुळे परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना हस्तकला निर्मितीचे प्रात्यक्षिक पाहण्याची आणि कारागिरांकडून थेट हस्तकला तसेच हातमाग उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल. राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आणि ब्रिटीश काउन्सिलच्या परस्पर सहकार्यातून, युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडनचे तीन भारतीय प्रकल्पांवर आधारीत नवीन भूप्रदेश या संकल्पनेवरील प्रदर्शनाचे आयोजनही या निमित्ताने केले गेले आहे. यात मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी (ब्रिटन), व्हाईटक्लिफ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड डिझाईन (न्यूझीलंड), स्विस टेक्स्टाईल कॉलेज, दिल्ली इथले नेतेजी सुभाष तंत्रज्ञान विद्यापीठ, राष्ट्रीय डिझाईन संस्था, पर्यावरण नियोजन आणि तंत्रज्ञान केंद्र विद्यापीठ विद्यापीठ, ॲमिटी विद्यापीठ, भारतीय कला आणि डिझाईन संस्था, युनायटेड वर्ल्ड विद्यापीठ आणि राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांसारख्या आघाडीच्या संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेची स्थापना 1986 मध्ये झाली होती. ही देशातली फॅशन विषयक शिक्षण क्षेत्रातली प्रमुख संस्था आहे. भारतीय संसदेच्या कायद्याद्वारे 2006 मध्ये या संस्थेला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत या संस्थेने वस्त्रोद्योग, पेहराव आणि संबंधित उद्योगजगतासाठीच्या व्यावसायिक नेतृत्वाची जडणघडण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारांसाठी ज्ञान विषयक भागीदार म्हणूनही ही संस्था कामी येत राहिली आहे. डिझाईन विकासित करण्यासंबंधीचे उपक्रम, शाश्वतता आणि हातमाग तसेच हस्तकलेला जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्यासाठी या संस्थेचे सातत्यपूर्णतेने योगदान दिले आहे.
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216974)
आगंतुक पटल : 27