नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विंग्ज इंडिया 2026 भरारी घेण्यासाठी सज्ज: आशियातील सर्वात मोठा नागरी हवाई वाहतूक कार्यक्रम जागतिक हवाई वाहतुकीचे भविष्य सादर करणार


विंग्ज इंडियाची संकल्पना: “भारतीय हवाई वाहतूक: भविष्याचा मार्ग प्रशस्त करताना – आरेखनापासून तैनातीपर्यंत, उत्पादनापासून देखभालीपर्यंत, सर्वसमावेशकतेपासून नाविन्यापर्यंत आणि सुरक्षिततेपासून शाश्वततेपर्यंत”

प्रविष्टि तिथि: 17 JAN 2026 3:48PM by PIB Mumbai

 

आशियातील सर्वात मोठा नागरी हवाई वाहतूक कार्यक्रम, विंग्ज इंडिया 2026 चे औपचारिक उद्घाटन नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते भारत आणि परदेशातील उच्च-स्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात केले जाईल. या उद्घाटनाने 28 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर आयोजित करण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण चार दिवसीय जागतिक हवाई वाहतूक संमेलनाची सुरुवात होईल.

“भारतीय हवाई वाहतूक: भविष्याचा मार्ग प्रशस्त करताना – आरेखनापासून तैनातीपर्यंत, उत्पादनापासून देखभालीपर्यंत, सर्वसमावेशकतेपासून नाविन्यापर्यंत आणि सुरक्षिततेपासून शाश्वततेपर्यंत” या संकल्पनेवर आधारित विंग्ज इंडिया 2026 वेगाने विस्तारणाऱ्या भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रावर, त्याच्या वाढत्या जागतिक प्रभावावर आणि उत्पादन, सेवा, नावीन्य आणि शाश्वत हवाई वाहतूक उपायांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्याच्या परिदृश्यावर प्रकाश टाकेल.

हवाई वाहतूक क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी जागतिक व्यासपीठ

विंग्ज इंडिया 2026 मध्ये एका भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे, स्टॅटिक विमानांच्या प्रदर्शनाचे, उड्डाण आणि हवाई कसरतींच्या प्रदर्शनांचे, एका उच्च-स्तरीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे, सीईओ गोलमेज परिषदांचे, बी2बी आणि बी2जी बैठकांचे, हवाई वाहतूक क्षेत्रातील नोकरी मेळाव्याचे, पुरस्कार समारंभाचे आणि रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. जगभरातील प्रतिनिधी यात सहभागी होण्याची अपेक्षा असल्याने हा कार्यक्रम एक प्रमुख जागतिक हवाई वाहतूक मंच म्हणून आपली ओळख प्रस्थापित करेल.

हवाई वाहतूक मूल्य साखळीतील प्रमुख देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भागधारक यामध्ये सहभागी होतील, ज्यात एअरलाइन्स, विमान आणि इंजिन उत्पादक, एमआरओ, विमानतळ विकासक, ओईएम, तंत्रज्ञान प्रदाते, प्रशिक्षण संस्था आणि सेवा भागीदार यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम धोरणकर्ते, उद्योग नेते, नवोन्मेषक आणि गुंतवणूकदारांसाठी एक संगम बिंदू म्हणून काम करेल, जिथे ते भारतातील आणि जगभरातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राच्या भविष्याला आकार देणारे उदयोन्मुख कल, संधी आणि सहकार्याच्या मार्गांवर विचारमंथन करतील. 

जागतिक सीईओ मंच आणि मंत्रीस्तरीय सत्रासह या आंतरराष्ट्रीय परिषदेत 13 संकल्पनाधारित सत्रे असतील आणि त्यामध्ये विमानतळ, विमानांचे भाडेकरार, हेलिकॉप्टर्स, विमान कंपन्या, हवाई वाहतूक क्षेत्रातील महिला, एमआरओ, हवाई कार्गो वाहतूक, व्यापारी हवाई वाहतूक तसेच लहान विमाने, विमानांचे सुटे भाग, शाश्वत हवाई इंधन (एसएएफ), विमानोड्डाणाचे प्रशिक्षण आणि कौशल्य, आधुनिक हवाई गतिशीलता आणि ड्रोन्स यांच्यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल.

सशक्त आंतरराष्ट्रीय आणि राज्यांचा सहभाग

हवाई वाहतूक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहयोग आणखी बळकट करत, विंग्ज इंडिया 2026 मध्ये जगभरातील 20 पेक्षा जास्त देशांच्या अधिकृत प्रतिनिधीमंडळांसह अनेक देशांची मंत्रीस्तरीय परदेशी शिष्टमंडळे आणि ज्येष्ठ सरकारी अधिकारी सहभागी होणार आहेत. सदर कार्यक्रमात भारतातील राज्यांनी घेतलेल्या सक्रीय सहभागामधून देशातील हवाई वाहतूक क्षेत्राद्वारे प्रेरित विकास, गुंतवणूक संधी आणि पायाभूत सुविधा विकासाचे दर्शन घडेल.

नेत्रदीपक हवाई कसरती आणि विमानांची प्रदर्शने

विंग्ज इंडिया 2026 मध्ये विविध प्रकारच्या विमानांची प्रभावी मांडणी, हवाई प्रदर्शने आणि आकाशातील कसरती यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विमानांची विस्तृत श्रेणी बघायला मिळेल. या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणांमध्ये भारतीय हवाई दलातील सूर्य किरण एरोबॅटिक पथकाने सादर केलेल्या हवाई कसरतींचा समावेश आहे.

या कार्यक्रमात प्रदर्शने, शॅलेट्स आणि बी2बी/बी2जी बैठका यांसाठी समर्पित व्यासपीठे उपलब्ध करून दिली जाणार असून त्याद्वारे विविध व्यवसायांमधील नेटवर्किंग, भागीदारी आणि गुंतवणूकसंबंधी चर्चा शक्य होणार आहेत. हवाई वाहतूक परिसंस्थेतील तरुण व्यावसायिक तसेच कुशल प्रतिभावंत या कार्यक्रमात आयोजित हवाई क्षेत्र संबंधी नोकरी मेळाव्यामुळे उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींशी जोडले जातील.   

विद्यार्थी तसेच तरुण व्यावसायिक व्यक्तींना हवाई वाहतूक क्षेत्रातील वास्तविक आव्हाने आणि संधी यांचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देत, त्यांच्यात नवोन्मेष, समस्यांची सोडवणूक आणि उद्योगाभिमुख विचारपद्धती यांना चालना देण्यासाठी या कार्यक्रमात एका विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेल्या नागरी हवाई नवोन्मेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हवाई प्रदर्शनांबरोबरच, या कार्यक्रमाला उपस्थित प्रतिनिधी आणि अभ्यागतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अनुभवात्मक आयामाची जोड देत सदर कार्यक्रमामध्ये भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवणाऱ्या रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

हवाई वाहतूक क्षेत्रातील उत्कृष्टता आणि अतुलनीय योगदानाचा गौरव करण्याची परंपरा कायम राखत या कार्यक्रमात एका प्रतिष्ठित पुरस्कार वितरण सोहोळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

भव्यता, विविधता आणि धोरणात्मक लक्ष्यासह, विंग्ज इंडिया 2026 हा कार्यक्रम एक असा महत्त्वपूर्ण कार्यक्रम असेल जो भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राची विकासगाथा सादर करण्यासोबतच जागतिक भागीदारीला बळकटी देत, नवोन्मेषाला चालना देऊन नागरी हवाई वाहतूक क्षेत्राच्या चढत्या भाजणीचे भविष्य देखील आखून देईल.

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/संजना चिटणीस/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2215659) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Telugu