मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालनामधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि इस्रायलने संयुक्त मंत्रिस्तरीय इरादा घोषणापत्रावर केली स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2026 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या नेतृत्वाखालील एका उच्च-स्तरीय भारतीय शिष्टमंडळाने इस्रायलमधील इलात येथे आयोजित 'ब्लू फूड सिक्युरिटी: सी द फ्युचर 2026' या दुसऱ्या जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी 13-15 जानेवारी 2026 दरम्यान इस्रायलचा यशस्वी दौरा केला. या भेटीमुळे भारत आणि इस्रायल यांच्यातील मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले.

हा संयुक्त जाहीरनामा परस्पर हिताच्या अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी एक व्यापक आराखडा सादर करतो. सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रगत मत्स्यपालन तंत्रज्ञानामध्ये संयुक्त संशोधन आणि विकास यांचा समावेश आहे. हा जाहीरनामा मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या देवाणघेवाणीवर आणि त्यांना पाठिंबा देण्यावर भर देतो तसेच नील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
याव्यतिरिक्त, हा जाहीरनामा सागरी संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी, पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी तसेच मत्स्यव्यवसायाची दीर्घकालीन लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी शाश्वत आणि जबाबदार मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन देतो. क्षमता बांधणी हा या सहकार्याचा एक प्रमुख केंद्रबिंदू असेल, ज्यामध्ये खोल समुद्रातील मासेमारी, जहाजांची रचना आणि विकास, किनारी मत्स्यपालन तसेच तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाद्वारे सागरी संसाधनांचे संरक्षण यांसारख्या उपक्रमांचा समावेश असेल.
या सहकार्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे भारत-इस्रायल सहकार्याअंतर्गत आधीच कार्यरत असलेल्या 43 कृषी उत्कृष्टता केंद्रांच्या धर्तीवर, मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी नवीन भारत-इस्रायल उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याच्या शक्यता तपासणे हा असेल.

हा ऐतिहासिक करार दोन्ही देशांतील मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रांमध्ये नवोन्मेष, शाश्वतता आणि आर्थिक वाढीसाठी नवीन मार्ग खुले करेल, तसेच अन्न सुरक्षा आणि हवामान-पूरक विकासासाठीची दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अधिक बळकट करेल.
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215119)
आगंतुक पटल : 8