संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय लष्कराने जयपूर येथे साजरा केला 78 वा लष्कर दिन

प्रविष्टि तिथि: 15 JAN 2026 9:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026

भारतीय  लष्कराने  15 जानेवारी 2026 रोजी राजस्थानमधील जयपूर इथे 78वा लष्कर दिन साजरा केला. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान व  लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी ‘प्रेरणा स्थल’ या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना अभिवादन केले. एअर व्हाईस मार्शल एम बंदोपाध्याय यांनी वायुसेनेतर्फे व कमोडोर पी वर्मा यांनी नौसेने तर्फे पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर संचलनाला सुरुवात झाली. 

लष्कर दिनाचा कार्यक्रम केवळ दिल्लीपुरताच मर्यादित न ठेवण्याच्या निर्णयानंतर हे संचलन दिल्लीबाहेर आयोजित होण्याची ही चौथी वेळ होती. लष्करी कॅंटोन्मेंट च्या बाहेर हे संचलन होण्याची ही पहिलीच वेळ होती. 

लष्कर दिनाच्या या संचलनासाठी 1 लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भारतीय लष्कर आणि जनता यांच्यामधील अतूट विश्वासाच्या बंधनाची व अभिमानाची प्रचिती आली. 

या लष्कर दिन संचलनासाठी 7 लष्करी वाद्यवृंद कार्यरत होते. 

लष्कराची अत्याधुनिक सामरिक सज्जता व तंत्रज्ञानातील प्रगती दर्शवणारे अभेद्य कवच असलेले अत्याधुनिक  टी 90 , BMP- 2 व अर्जुन रणगाडे या संचलनात सामील झाले होते. 

कार्यक्रमातील लष्करी जवानांनी मोटारसायकलवर केलेल्या अचूक व शिस्तबद्ध कसरतींमधून त्यांचे कौशल्य, संघभावना व नियंत्रण दिसून आले. त्यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलामी दिली.  

लष्कर दिनाच्या या कार्यक्रमात लष्कर प्रमुखांनी वीर जवान, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना त्यांची सेवा व त्यागभावनेबद्दल सन्मानित केले. भारतीय लष्कराने भावी काळातील आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने लष्कराच्या संरचनेमध्ये आवश्यक ते बदल केले असून अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच भविष्यासाठी सज्ज ठेवणारी त्वरित प्रतिसाद प्रणाली अंगिकारली असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. आत्मनिर्भरतेवर लष्कराचा भर असून स्वदेशीकरण ही आधुनिक काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हे दर्शवणारी भारत निर्मित शस्त्रास्त्रे व उपकरणे कार्यक्रमस्थळी प्रदर्शित केली होती.    

संध्याकाळी ‘शौर्य संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री ,भजन लाल शर्मा, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि इतर अनेक वरिष्ठ लष्करी व नागरी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित असतील अशी अपेक्षा आहे. 

या कार्यक्रमात संरक्षणमंत्री ‘प्रथम दिवस कव्हर’ चे अनावरण करतील तसेच अनेक ‘नमन केंद्रां’चे दूरस्थ पद्धतीने उदघाटन करतील. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या कुटुंबियांचा ते यावेळी सत्कार करतील. ‘शौर्य संध्या’ या कार्यक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चा नाट्यानुभव सादर होईल, तसेच पारंपरिक लढाऊ खेळ कलरिपयट्टू आणि मल्लखांब, शिवाय 1000 ड्रोन्स चा भव्य अविष्कार  सादर केला जाणार आहे. 


शैलेश पाटील/उमा रायकर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2215117) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Telugu