रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज या लोकसहभागाच्या स्पर्धात्मक उपक्रमाला दिली मुदतवाढ
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांवरील स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि प्रवाशांच्या अनुभवात अधिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने क्लीन टॉयलेट पिक्चर चॅलेंज या लोकसहभागाच्या स्पर्धात्मक उपक्रमाला 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सार्वजनिक सहभाग कायम राखावा आणि या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करता यावी यासाठी ही मुदतवाढ दिली गेली आहे. यासोबतच या उपक्रमाशी जोडलेले फास्टॅग रिचार्ज बक्षीस प्रक्रिया यामुळे वेळेत सुनिश्चित होणार आहे.
आता या विस्तारित मुदतीच्या मोहिमेअंतर्गत, राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांनी सामायिक केलेल्या स्वच्छ स्वच्छतागृहांच्या छायाचित्रांचे दररोज मूल्यमापन केले जाईल. त्यानंतर पात्र ठरलेल्या दाव्यांवर कालबद्ध पद्धतीने प्रक्रिया केली जाईल. पडताळणी झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत संबंधित वाहन नोंदणी क्रमांकावर (VRN) फास्टॅग रिचार्जचे बक्षीस जमा केले जाईल. या माध्यमातून या प्रक्रियेअंतर्गतची पारदर्शकता आणि प्रतिसादाची क्षमताही वाढणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सप्टेंबर 2025 मध्ये या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ केला होता. महामार्गावरील टोल नाक्यांजवळील अस्वच्छ स्वच्छतागृहांची सक्रीयपणे तक्रार करण्याबाबत प्रवाशांना प्रोत्साहन देता यावे हा यामागचा मुख्य हेतू होता. या उपक्रमाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे 350 प्रवाशांनी अस्वच्छ स्वच्छतागृहांची तक्रार केली होती, त्यापैकी 265 पात्र प्रवेशांना फास्टॅग रिचार्जचे बक्षिसही दिले गेले आहे.
हा उपक्रम राष्ट्रीय महामार्गावरील सर्व प्रवाशांसाठी खुला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवाशांना Rajmargyatra या मोबाईल ॲप्लिकेशनच्या नव्या आवृत्तीचा वापर करावा लागेल. त्यानंतर प्रवासी अस्वच्छ स्वच्छतागृहांचे स्पष्ट, जिओ-टॅग केलेले आणि वेळेचा उल्लेख असलेले फोटो अपलोड करून या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. फोटो अपलोड करताना वापरकर्त्यांना त्यांचे नाव, ठिकाण, वाहन नोंदणी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असे मूलभूत तपशीलही द्यावे लागणार आहेत.
अशा प्रकारच्या तक्रारीची नोंद करणाऱ्या प्रत्येक पात्र वाहन नोंदणी क्रमांकाला फास्टॅग रिचार्जच्या स्वरूपात 1,000 रुपयांचे (एक हजार रुपये फक्त) बक्षीस दिले जाईल. संपूर्ण योजनेच्या कालावधीत प्रत्येक वाहन नोंदणी क्रमांक केवळ एकाच बक्षीसासाठी पात्र असेल. हे बक्षीस हस्तांतरणीय नसेल आणि ते रोख स्वरूपात दिले जाणार नाही. याव्यतिरिक्त, प्रत्येक महामार्गावरील स्वच्छतागृहाच्या बाबतीत असंख्यवेळा तक्रारी आल्या तरी देखील ते दिवसातून केवळ एकदाच बक्षीस देण्याच्या निकषासाठी पात्र असणार आहे. एकाच दिवशी एकाच स्वच्छतागृहाच्या बाबतीत एकापेक्षा जास्त तक्रारी आल्या तर, केवळ राजमार्गयात्रा ॲपद्वारे प्राप्त झालेल्या पहिल्या वैध तक्रारीचा विचार केला जाईल.
ही योजना केवळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत बांधलेल्या, चालवल्या जाणाऱ्या किंवा देखरेख केल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांनाच लागू असणार आहे. इंधन केंद्रे, ढाबे किंवा प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली नसलेल्या इतर सार्वजनिक सुविधांमधील स्वच्छतागृहे यातून वगळण्यात आली आहेत. सर्व नोंदींची पडताळणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्क्रीनिंग द्वारे, तसेच आवश्यकता भासली तर प्रत्यक्ष मानवी पडताळणीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील वापरकर्त्यांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच स्वच्छतेबाबत सामायिक जबाबदारीची संस्कृती जोपासण्याबद्दलची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213989)
आगंतुक पटल : 19