सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भद्रकाली मंदिरातील शिलालेख, सोमनाथचा कालातीत वारसा आणि त्याच्या पुनरुज्जीवनातील कुमारपाल यांची भूमिका कथन करतो


प्रभास पाटण येथील पुरातत्त्वीय पुरावे, सोलंकी काळातील स्थापत्य हे मौल्यवान वारसा म्हणून उभे

सोमनाथचे पाषाण पराक्रमाची गाथा सांगतात तर, शिलालेख सनातन संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवतात

प्रभास पाटण संग्रहालयात सोमनाथचा इतिहास दर्शविणारे शिलालेख आणि अवशेष जतन

प्रविष्टि तिथि: 11 JAN 2026 1:28PM by PIB Mumbai
 

प्रभास पाटण येथे समृद्ध व पवित्र असा भूतकाळ जतन झालेला असून, ताम्रपट, शिलालेख तसेच स्मृतिस्तंभ यांमधून या प्रदेशाची समृद्धी, वारसा आणि पराक्रमाची चिरस्थायी भावना प्रतिबिंबित होते.

प्रभास पाटण आणि सोमनाथ मंदिराचा इतिहास उलगडून दाखविणारे शिलालेखीय अभिलेख व प्रमाणित अवशेष प्रभास परिसरात विविध ठिकाणी आढळतात. आक्रमणांच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या मंदिराचे शिलालेख, ताम्रपट आणि अवशेष पराक्रम, सामर्थ्य तसेच भक्तीची प्रतीके म्हणून प्रभास पाटण संग्रहालयात जतन करण्यात आले आहेत. हे संग्रहालय सध्या प्रभास पाटण येथील प्राचीन सूर्य मंदिरात आहे.

असाच एक शिलालेख प्रभास पाटण येथे संग्रहालयाच्या जवळ, भद्रकाली गल्लीतील जुन्या राम मंदिराशेजारी स्थित आहे. सोमपुरा ब्राह्मण दीपकभाई दवे यांच्या निवासस्थानी जतन करण्यात आलेला हा शिलालेख त्यांच्या अंगणातील प्राचीन भद्रकाली मंदिराच्या भिंतीत आजही बसवलेला आहे.

याचा तपशील देताना प्रभास पाटण संग्रहालयाचे प्रमुख तेजल परमार यांनी सांगितले की, 1169  इसवी सन (वैभव संवत 850 आणि विक्रम संवत 1255) मध्ये कोरलेला आणि सध्या राज्य पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेला हा शिलालेख अनहिलवाड पाटणचे महाराजाधिराज कुमारपाल यांचे आध्यात्मिक गुरु, परम पशुपत आचार्य श्रीमान भावबृहस्पती यांच्या स्तुतिपर शिलालेख आहे. या शिलालेखात सोमनाथ मंदिराचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास नोंदवलेला आहे. यात चारही युगांत सोमनाथ महादेवाच्या निर्मितीचा उल्लेख आहे. त्यानुसार, सत्ययुगात चंद्र (सोम) यांनी सोन्याचे मंदिर उभारले; त्रेतायुगात रावणाने चांदीचे मंदिर बांधले; द्वापारयुगात श्रीकृष्णांनी लाकडी मंदिर उभारले; आणि कलियुगात राजा भीमदेव सोलंकी यांनी अत्यंत कलात्मक दगडी मंदिराची उभारणी केली.

इतिहासानुसार, भीमदेव सोलंकी यांनी पूर्वीच्या अवशेषांवर चौथे मंदिर बांधले, त्यानंतर त्याच स्थळी 1169 इसवी सन मध्ये कुमारपाल यांनी पाचव्या मंदिराची उभारणी केली. सोलंकी राजवटीत प्रभास पाटण हे धर्म, स्थापत्यकला आणि साहित्याचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले. सिद्धराज जयसिंह यांचा न्याय आणि कुमारपाल यांची भक्ती यांमुळे सोमनाथ गुजरातच्या सुवर्णयुगाचे अभिमानास्पद प्रतीक ठरले.

प्रभास पाटणची ही पवित्र भूमी केवळ अवशेषच नव्हे तर, सनातन धर्माचा आध्यात्मिक अभिमान जपून ठेवते. ऐतिहासिक भद्रकाली शिलालेख सोलंकी राजे आणि भावबृहस्पती यांसारख्या विद्वानांची भक्ती प्रतिबिंबित करतो. कला, स्थापत्य आणि साहित्याच्या समृद्ध वारशामुळे ही भूमी आजही भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे, तर प्रभासचा वारसा आणि सोमनाथचे अढळ शिखर हे भक्ती आणि स्वाभिमान कालातीत असल्याची साक्ष देतात.

***

शिल्पा पोफळे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2213406) आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu