शिक्षण मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा 2026 चे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2026 5:26PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली वर्ल्ड बुक फेअर (NDWBF/ एनडीडब्ल्युबीएफ) 2026 चे उद्घाटन केले. या उद्घाटन समारंभाला कतारचे सांस्कृतिक कार्य मंत्री अब्दुलरहमान बिन हमद बिन जसीम बिन अल थानी, स्पेनचे सांस्कृतिक कार्य मंत्री अर्नेस्ट उर्तासुन डोमेनेच, स्पेनच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातील पुस्तक विभागाच्या महासंचालिका मारिया होसे गाल्व्हेझ, उच्च शिक्षण सचिव डॉ. विनीत जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद सुधाकर मराठे, एनबीटीचे संचालक युवराज मलिक यांच्यासह कतार व स्पेनमधील मान्यवर प्रतिनिधी आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते “The Saga of Kudopali: The Unsung Story of 1857” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक मराठी, बंगाली, आसामी, पंजाबी, मल्याळम आणि उर्दू भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी कुडोपालीच्या गाथेवर आधारित व्हिडीओ देखील उपस्थितांना दाखवण्यात आला.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2026 हा जगातील सर्वात मोठा बी2सी (B2C) पुस्तक मेळा असून, तो केवळ विचारांचे संगमस्थान नसून भारताच्या समृद्ध व सशक्त वाचनसंस्कृतीचा भव्य उत्सव आहे. पुस्तक मेळ्याची “भारतीय लष्करी इतिहास: शौर्य आणि बुद्धिमत्ता @ 75” (Indian Military History: Valour and Wisdom @ 75) ही संकल्पना तसेच कतार आणि स्पेनसारख्या देशांचा सहभाग यामुळे या सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जगातील हा सर्वात मोठा बी2सी (B2C) पुस्तक मेळा नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा (NDWBF) राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT), भारत यांच्या वतीने शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. हा मेळा 10 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होत असून, प्रथमच या पुस्तक मेळ्यात प्रवेश पूर्णतः मोफत ठेवण्यात आला आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या पुस्तक मेळ्यात 35 पेक्षा जास्त देशांतील 1,000 पेक्षा जास्त प्रकाशक सहभागी होत असून, 1,000 पेक्षा अधिक वक्त्यांसह 600 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या भव्य साहित्यिक महोत्सवाला 20 लाखापेक्षा जास्त वाचक व अभ्यागत उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदाच्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा (NDWBF) 2026 ची संकल्पना “भारतीय लष्करी इतिहास: शौर्य आणि बुद्धिमत्ता @ 75” (Indian Military History: Valour and Wisdom @ 75) अशी आहे. यासोबतच मेळ्यात ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांचे तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याच्या 150 वर्षांचे औचित्य साधणारी विशेष प्रदर्शनेही आयोजित करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा (NDWBF) 2026 मधील प्रमुख आकर्षण म्हणून “भारतीय लष्करी इतिहास: शौर्य आणि बुद्धिमत्ता @ 75” (Indian Military History: Valour and Wisdom @ 75) या संकल्पनेवर आधारित थीम पॅव्हिलियन साकारण्यात आला आहे. सुमारे 1,000 चौ. मी. क्षेत्रफळाच्या या दालनात स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शौर्य, बलिदान व राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेचा गौरव करण्यात आला आहे. पॅव्हिलियनमध्ये 500 पेक्षा जास्त पुस्तके, निवडक प्रदर्शने, पोस्टर्स, माहितीपट व इंस्टॉलेशन्स सादर करण्यात आली आहेत. अर्जुन टँक, आयएनएस विक्रांत आणि एलसीए तेजस यांच्या प्रतिकृती, 21 परमवीर चक्र विजेत्यांना श्रद्धांजली, तसेच 1947 मधील बुडगावपासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंतच्या प्रमुख युद्ध व लष्करी कारवायांवरील सत्रे हे याचे विशेष आकर्षण आहे.
***
माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213323)
आगंतुक पटल : 20