रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की धोरणात्मक सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी, सहकारी संघराज्य प्रणालीला बळकटी देण्यासाठी आणि देशभरात कार्यक्षम, सुरक्षित व नागरिक-केंद्रित वाहतूक उपाययोजना उपलब्ध करण्यासाठी नियमित सल्लामसलत करणे आवश्यक आहे


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांची वार्षिक बैठक संपन्न

प्रविष्टि तिथि: 08 JAN 2026 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली येथे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहनमंत्र्यांच्या वार्षिक बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत रस्ते सुरक्षा, प्रवासी आणि सार्वजनिक सुविधा, व्यवसाय सुलभता आणि वाहने नियमन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

उपस्थितांना संबोधित करताना गडकरी म्हणाले की, संविधानानुसार वाहतूक हा समवर्ती विषय असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये निकट आणि निरंतर समन्वय असणे आवश्यक आहे. धोरणात्मक सुसंगतता सुनिश्चित करण्यासाठी, सहकारी संघराज्य प्रणालीला बळकट करण्यासाठी तसेच देशभरात कार्यक्षम, सुरक्षित व नागरिक-केंद्रित वाहतूक उपाययोजना उपलब्ध करण्यासाठी नियमित सल्लामसलत करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

भारताच्या रस्ते वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यास मदत करण्याच्या दृष्टीने समस्या, उपाय आणि पुढील पावले यावर सर्वांगीण चर्चा करण्यासाठी 7 जानेवारी आणि 8 जानेवारी 2026 रोजी भारत मंडपम येथे दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. 7 जानेवारी रोजी कार्यशाळेचा पहिला दिवस सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन सचिवांसोबत आयोजित करण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्षस्थान परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी भूषवले. अतिरिक्त सचिव (परिवहन) महमूद अहमद यांनी सत्राचे उद्घाटन केले आणि या दिवसाच्या विचारमंथन कार्यशाळेसाठी विषय निश्चित केले.

7 जानेवारी रोजी सरकारी अधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाल्यानंतर 8 जानेवारी रोजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्षस्थान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भूषवले. या कार्यशाळेत 7 जानेवारीच्या कार्यशाळेतील प्रमुख कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा करण्यात आली आणि रस्ता सुरक्षा प्रतिज्ञेसह रस्ता सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रित करून रस्ता वाहतूक क्षेत्रातील केंद्र आणि राज्य सरकारच्या भागधारकांमध्ये त्या कल्पनांवर समन्वय साधण्यात आला.

दोन दिवसीय कार्यशाळेदरम्यान खालील विषयांवर विचारविनिमय करण्यात आला आणि रस्ते वाहतूक क्षेत्राला पुढे नेण्यास मदत करण्यासाठी संबंधित भागधारकांसाठी विशिष्ट कृती निश्चित करण्यात आली:

1. परिवहन सेवांचे डिजिटायझेशन आणि मानकीकरण

2. मोटार वाहन सुधारणा आणि कायदेशीर दुरुस्त्या

3. रस्ता सुरक्षा आणि अपघातानंतरची काळजी

4. वाहनांची सुरक्षा आणि अभियांत्रिकी मानके

5. जिल्हा-स्तरीय रस्ता सुरक्षा उपक्रम

6. शाश्वत वाहतूक आणि वाहन भंगार धोरण

7. उत्सर्जन आणि पीयूसीसी 2.0 मानके

8. बुद्धिमान वाहतूक प्रणाली आणि ई-अंमलबजावणी

9. चालक प्रशिक्षण आणि क्षमता विकास

10. सडक सुरक्षा मित्र कार्यक्रम

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने कार्यशाळांची सांगता झाली, त्यांनी या सर्व संकल्पनांना एकत्र आणून एक सुसंगत, दूरदृष्टीचा दृष्टिकोन विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. आपले सामूहिक प्रयत्न अशा वाहतूक व्यवस्थेचा पाया घालतील, जी प्रत्येक नागरिकाच्या गरजा पूर्ण करेल, आपल्या राष्ट्रीय विकासात योगदान देईल आणि सर्व नागरिकांसाठी एक शाश्वत व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करेल, असे ते म्हणाले.


शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 


(रिलीज़ आईडी: 2212685) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali