आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी इंडियन फार्माकोपियाच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन  केले


इंडियन फार्माकोपियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृती मिळाली असून ग्लोबल साऊथ मधील 19 देशांमध्ये मान्यता मिळाल्याचे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन

जागतिक आरोग्य संघटनेच्या फार्माकोव्हिजिलन्स योगदानात भारताने जागतिक स्तरावर 123 व्या स्थानावरून 8 व्या स्थानावर झेप घेतल्याचे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे गौरवोद्गार

इंडियन फार्माकोपिया 2026 मध्ये 121 नवीन मोनोग्राफसह अँटी-टीबी, अँटी-डायबेटिक आणि अँटी-कॅन्सर औषधांचा समावेश

आयपी 2026 मध्ये प्रथमच रक्तसंक्रमण औषधासाठी रक्त घटक मोनोग्राफ सादर करण्यात आले

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2026 1:46PM by PIB Mumbai

 

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात इंडियन फार्माकोपिया 2026 (आयपी 2026), या भारताच्या औषध मानकांच्या अधिकृत पुस्तिकेच्या 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन केले. औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता बळकट करण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या प्रयत्नांमधील हा महत्वाचा टप्पा आहे.

 

इंडियन फार्माकोपिया, म्हणजेच भारतीय औषधकोश हे देशातील औषधांसाठी मानकांचे अधिकृत पुस्तक आहे, आणि औषधनिर्माण क्षेत्रासाठी भारताच्या नियामक चौकटीचा तो आधारस्तंभ आहे, असे नड्डा यांनी नवीन आवृत्तीचे प्रकाशन करताना अधोरेखित केले. ते म्हणाले की 10 व्या आवृत्तीत वैज्ञानिक प्रगती, जागतिक सर्वोत्तम पद्धती आणि औषध निर्मिती आणि नियमन यामधील भारताचे वाढते नेतृत्व प्रतिबिंबित होते.

 

ते म्हणाले की, इंडियन फार्माकोपिया 2026 मध्ये 121 नवीन मोनोग्राफ समाविष्ट करण्यात आले असून, मोनोग्राफची एकूण संख्या 3,340 झाली आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, क्षयरोगविरोधी, मधुमेहविरोधी आणि कर्करोगविरोधी औषधे तसेच लोह पूरकांसह प्रमुख उपचारात्मक श्रेणींची व्याप्ती लक्षणीयरीत्या मजबूत करण्यात आली आहे. त्याद्वारे विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत वापरल्या जाणाऱ्या औषधांचे अधिक व्यापक मानकीकरण सुनिश्चित केले जाईल.

 फार्माकोव्हिजिलन्स, म्हणजेच औषधनिर्माण क्षेत्रातील दक्षतेकहा संदर्भ देत केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, 'अलिकडच्या काही वर्षांत, भारतीय फार्माकोपिया मानकांनाही आंतरराष्ट्रीय स्वीकृती मिळाली आहे, कारण भारत सरकारच्या आरोग्य कूटनीति अंतर्गत त्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. इंडियन फार्माकोपियाला आता ग्लोबल साउथमधील 19 देशांमध्ये मान्यता मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

 

केंद्रीय मंत्री नड्डा यांनी इंडियन फार्माकोपिया कमिशन (आयपीसी) अंतर्गत फार्माकोविजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (पीव्हीपीआय) च्या उल्लेखनीय प्रगतीवरही प्रकाश टाकला. 2009-2014 दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या फार्माकोव्हिजिलन्स डेटाबेसमध्ये योगदान देण्यात जागतिक स्तरावर 123 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने 2025 मध्ये 8 व्या स्थानावर झेप घेतल्याचे त्यांनी नमूद केले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आयपीसी आणि पीव्हीपीआय टीमची प्रशंसा करताना नड्डा म्हणाले की, मजबूत फार्माकोव्हिजिलन्स परिसंस्था, रुग्णांची सुरक्षा, गुणवत्ता हमी आणि मजबूत नियामक दक्षतेपप्रति भारताची वचनबद्धता दर्शवते.

 नियामक चौकटीमधील महत्वाच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना, डॉ. सिंह यांनी, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने (दुसरी दुरुस्ती) नियम, 2020 च्या तरतुदींनुसार भारतीय फार्माकोपिया 2026 मध्ये रक्तसंक्रमणाशी संबंधित 20 रक्त घटक मोनोग्राफचा प्रथमच समावेश केल्याचे अधोरेखित केले.

 आपल्या भाषणाचा समारोप करताना नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आरोग्य सेवा प्रणाली आणि नियामक संस्था मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले आहे. ते म्हणाले कीइंडियन फार्माकोपिया 2026 हे या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि गुणवत्तापारदर्शकता आणि सार्वजनिक कल्याणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे प्रतिबिंब आहे.

 केंद्रीय मंत्र्यांनी इंडियन फार्माकोपिया आयोग आणि दहावी आवृत्ती प्रकाशित करण्यात सहभागी असलेल्या सर्व भागधारकांचे अभिनंदन केले. इंडियन फार्माकोपिया 2026 औषध गुणवत्ता मानके आणखी मजबूत करेलभारताची नियामक चौकट मजबूत करेल आणि जागतिक औषध निर्माण क्षेत्रात देशाचे स्थान उंचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या की, इंडियन फार्माकोपिया 2026 चे प्रकाशन, हे भारतातील औषधनिर्माण नियामक परिसंस्थेला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. देशभरात सुरक्षित, प्रभावी आणि दर्जेदार औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एक मजबूत, विज्ञान-आधारित फार्माकोपिया आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. आरोग्य सचिवांनी नमूद केले की फार्माकोपिया मानकांचे सातत्यपूर्ण अद्ययावतीकरण आणि सुसूत्रता हे जागतिक सर्वोत्तम पद्धतीरुग्ण सुरक्षा आणि नियामक उत्कृष्टतेप्रति भारताची वचनबद्धता दर्शवते, तसेच जागतिक औषध पुरवठा साखळीतील देशाच्या वाढत्या भूमिकेला देखील समर्थन देते.

 

इंडियन फार्माकोपिया

औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 ची पूर्तता करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने इंडियन फार्माकोपिया कमिशन (आयपीसी) द्वारे इंडियन फार्माकोपिया (आयपी) प्रकाशित केले जाते. आयपी, भारतात उत्पादित आणि/किंवा विकल्या जाणार् या औषधांसाठी अधिकृत मानके निर्धारित करते आणि अशा प्रकारे औषधांच्या गुणवत्तेचे नियंत्रण आणि हमी यामध्ये योगदान देते. आयपीची मानके अधिकृत आणि कायदेशीररित्या अंमलात आणण्यायोग्य आहेत. आपल्या देशात औषधांचे उत्पादन, तपासणी आणि वितरणासाठी परवाना देण्यात सहाय्य करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

 

इंडियन फार्माकोपिया, फार्माकोपियल डिस्कशन ग्रुप (पीडीजी) चा सदस्य असून, मोनोग्राफ आणि सामान्य प्रकरणांमध्ये सुसूत्रता यावी, यासाठी युरोपियन, जपानी आणि युनायटेड स्टेट्‍स या देशांच्या फार्माकोपिया बरोबर सहयोग साधतो. भारतीय फार्माकोपियाच्या सर्वसाधारण गरजा इंटरनॅशनल कौन्सिल फॉर हार्मोनायझेशन (आयसीएच) मानकांशी जुळवून घेण्यात आल्या आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मानकीकरण केलेल्या औषधनिर्माण गुणवत्तेच्या मानदंडांप्रति भारताच्या वचनबद्धतेला बळकटी मिळत आहे.

 ड्रग्ज कंट्रोलर जनरल (भारत) डॉ. राजीव सिंह रघुवंशीआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव हर्ष मंगल आणि भारतीय औषधनिर्माण आयोगाचे सचिव आणि वैज्ञानिक विभाग संचालक डॉ. व्ही. कलैसेलवन आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ यावेळी उपस्थित होते.

***

नेहा कुलकर्णी / राजश्री आगाशे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2210799) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Telugu