पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाकडून लाल चंदन उत्पादक शेतकऱ्यांना 45 लाखांचे अनुदान; दुहेरी उत्पन्न व शाश्वत वापराला चालना
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2026 11:22AM by PIB Mumbai
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने प्रवेश व लाभवाटप योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश राज्य जैवविविधता मंडळामार्फत आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना 45 लाख रुपये वितरित केले आहेत. या वितरणामुळे देशातील एकूण राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाकडून करण्यात आलेली एकत्रित निधी वितरणाची रक्कम आता 143.5 कोटी पेक्षा अधिक झाली आहे.
हा उपक्रम लाल चंदन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक संधी अधोरेखित करतो. या अंतर्गत शेतकऱ्यांना दुहेरी उत्पन्नाचा लाभ मिळत असून. कायदेशीररित्या लागवड केलेल्या लाल चंदन लाकूड विक्रीतून तसेच जैवविविधता अधिनियम, 2002 अंतर्गत अनिवार्य असलेल्या प्रवेश व लाभवाटप योजनेमार्फत असे त्याचे स्वरुप आहे. जागतिक स्तरावर मौल्यवान असलेल्या स्थानिक प्रजातीचे संवर्धन आणि शाश्वत उपयोग केल्याबद्दल शेतकऱ्यांना थेट प्रोत्साहन मिळत आहे.
लाल चंदनाचे संवर्धन, संरक्षण आणि लाभार्थ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने आंध्र प्रदेशाला आतापर्यंत 104 कोटी रुपयांहून अधिक वितरीत केले आहेत. यासोबत, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांना 15 कोटींहून अधिक निधी वितरित केला आहे.
गेल्या तीन महिन्यांत, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यातील 220 हून अधिक लाल चंदन उत्पादक शेतकऱ्यांना 5.35 कोटींच्या प्रवेश व लाभवाटप निधीचे वितरण केले आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या प्रवेश व लाभवाटप यंत्रणेचा उद्देश केवळ लाभांचे न्याय्य व समतोल वाटप सुनिश्चित करणे नाही, तर शाश्वत उपयोगाच्या पद्धतींचा सक्रिय प्रचार करणे देखील आहे. ही यंत्रणा बेकायदेशीर व्यापार व अति-शोषण थांबवते, तसेच संवर्धनाच्या परिणामांना प्रत्यक्ष जैव-आर्थिक लाभांशी जोडते. यामुळे लाल चंदन केवळ संरक्षित प्रजाती नसून शेतकरी समुदायांसाठी उपजीविकेचे साधन ठरले आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे लाभार्थ्यांना प्रवेश व लाभवाटप निधी वितरित केला जात असून, त्यामुळे लाल चंदनाच्या संवर्धनास प्रोत्साहन मिळत आहे. वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळून शेतकरी व समुदायांचा सामाजिक-आर्थिक विकास साधला जात आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आगामी पिढ्यांसाठी ही प्रजाती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असून, भारताच्या जागतिक जैवविविधता संवर्धनाच्या नेतृत्वास बळकट करत आहे.
***
नितीन फुल्लुके / राज दळेकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210770)
आगंतुक पटल : 26