रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेच्या सर्वात कठीण घाट विभागांपैकी सकलेशपूर-सुब्रमण्य मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण
या मार्गावरून मंगळुरूपर्यंत वंदे भारत गाडी चालवणे शक्य होईल : अश्विनी वैष्णव
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
भारतीय रेल्वेने सकलेशपूर-सुब्रमण्य घाट रस्त्याच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण करून मोठा अभियांत्रिकी टप्पा गाठला आहे. हा भाग भारतीय रेल्वेच्या जाळ्यातील सर्वात कठीण आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक विभागांपैकी एक मानला जातो.
28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच्या यशस्वी चाचणीमुळे हा मैलाचा दगड गाठला गेला. यामुळे, हा विभाग आता इलेक्ट्रिक ट्रेन चालविण्याच्या दृष्टीने पूर्णपणे तयार आहे. या घाट विभागाच्या विद्युतीकरणामुळे, संपूर्ण बेंगळुरू-मंगळुरू रेल्वे मार्गाचे आता पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.

सकलेशपूर आणि सुब्रमण्य रोड दरम्यानच्या विद्युतीकरण झालेल्या घाट विभागाची लांबी 55 किमी आहे. रेल्वे मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने हा भूभाग अत्यंत आव्हानात्मक आहे. डिसेंबर 2023 मध्ये विद्युतीकरणाचे काम सुरू झाले होते.
बोगद्याच्या विद्युतीकरणाचे काम करताना विशेष लक्ष देणे आवश्यक होते. 57 बोगद्यांमध्ये 427 मुख्य तर 427 अतिरिक्त ब्रॅकेट्स बसवण्यात आले. तत्पूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स आणि बंगळुरू विद्यापीठाच्या सहकार्याने तपशीलवार भूशास्त्रीय अभ्यास करण्यात आला.

तीव्र उतारांसाठी विशेष उपकरणे आणि मजबूत अभियांत्रिकी उपाय करण्याची आवश्यकता होती. मुसळधार पाऊस, भूस्खलन, मातीची धूप आणि दगड कोसळण्यामुळे कामावर वारंवार परिणाम झाला. अनेक ठिकाणी, दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण ठिकाणी पोहोचण्यासाठी रुळांवरून साहित्य वाहून नेणे आवश्यक होते. संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत सुरक्षा उपायांचे काटोकोरपणे पालन करण्यात आले.
विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर आणि चाचण्या यशस्वी झाल्यामुळे, घाट विभाग आता इलेक्ट्रिक रेल्वे गाड्या चालविण्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. यामुळे इंधनाचा वापर, उत्सर्जन कमी होऊन अधिक कार्यक्षमपणे कार्य होऊ शकेल. या भागात वंदे भारत रेल्वे सेवांसह आधुनिक इलेक्ट्रिक सुपर फास्ट रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी देखील हा मार्ग योग्य आहे.
या महत्त्वाच्या घाट मार्गाचे विद्युतीकरण झाल्याने देशाची माहिती-तंत्रज्ञान राजधानी असलेल्या बेंगळुरू आणि मंगळुरू हे बंदराचे शहर तसेच किनारपट्टीवरील इतर आर्थिक आणि व्यावसायिक केंद्रांना जोडणारे दुवे देखील बळकट होतील. इलेक्ट्रिक गाड्या सुरू झाल्याने लोकांची वाहतूक तसेच व्यावसायिक प्रवास करणे सुलभ होईलल, त्यामुळे किनारी प्रदेशात व्यापार, सेवा आणि संबंधित आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल.

रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कामगिरीमुळे होणारा प्रभाव स्पष्ट करताना, आता आपल्याला या मार्गावरून मंगळुरूपर्यंत वंदे भारत ट्रेन चालवणे शक्य. होणार असल्याचे सांगितले.
भारतीय रेल्वेने तिच्या ब्रॉडगेज नेटवर्कच्या विद्युतीकरणाचे 99% हून अधिक काम पूर्ण केले आहे.
* * *
निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209967)
आगंतुक पटल : 11