ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
नॅशनल टेस्ट हाऊसने संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षणातील सहकार्यासाठी डीआरडीओच्या डीएमएसआरडीई प्रयोगशाळेसोबत केला सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
28 DEC 2025 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2025
ग्राहक व्यवहार विभागांतर्गत ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नॅशनल टेस्ट हाऊस (NTH) या संस्थेने, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची एक प्रयोगशाळा – डिफेन्स मटेरियल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) सोबत संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षण या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एक सामंजस्य करार (MoU) केला आहे.
या सामंजस्य कराराचा उद्देश खालील बाबी सुलभ करणे आहे:
- संयुक्त संशोधन आणि चाचणी उपक्रम
- प्रयोगशाळा आणि उपकरण सुविधांची देवाणघेवाण
- वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्यांची देवाणघेवाण
- परिसंवाद, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे क्षमता विकास
- परस्पर हिताच्या आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य
या करारानुसार, दोन्ही संस्था त्यांनी मान्य केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून, चाचणी आणि मूल्यांकन सेवांमध्ये एकमेकांना सहकार्य करतील, विशेषतः ज्या ठिकाणी आवश्यक विशेष सुविधा संस्थेमध्ये उपलब्ध नाहीत अशा प्रकरणांमध्ये. या सहकार्यामुळे वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.
1912 मध्ये स्थापित, एनटीएच ही संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विविध प्रकारच्या औद्योगिक आणि ग्राहक उत्पादनांसाठी चाचणी, तपासणी आणि गुणवत्ता हमी सेवा प्रदान करते. चाचणी आणि कॅलिब्रेशन प्रयोगशाळांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनएबीएल) मान्यताप्राप्त आणि भारतीय मानक ब्युरो-मान्यताप्राप्त प्रयोगशाळा म्हणून, एनटीएच देशभरातील प्रादेशिक प्रयोगशाळांच्या जाळ्याद्वारे कार्यरत आहे.
1929 पासूनचा वारसा लाभलेली कानपूर येथील डीएमएसआरडीई, ही संस्था संरक्षण क्षेत्रासाठी अत्यावश्यक असलेल्या पॉलिमर, कंपोझिट्स, इलास्टोमर्स, सिरॅमिक्स, तांत्रिक वस्त्रे, इंधन, वंगण आणि संरक्षण अनुप्रयोगांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या इतर विशेष सामग्रीसारख्या गैर-धातू पदार्थांच्या संशोधन आणि विकासामध्ये गुंतलेली आहे.
हा सामंजस्य करार संस्थात्मक सामर्थ्याचा लाभ घेणे, संशोधन आणि चाचणी क्षमता वाढवणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि संरचित संस्थात्मक सहकार्याद्वारे आत्मनिर्भरता आणि राष्ट्रीय विकासासाठी योगदान देण्याच्या एनटीएच आणि डीआरडीओच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209284)
आगंतुक पटल : 10