गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील रीवा येथे कृषक संमेलनाला केले संबोधित
नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, पाण्याचे संवर्धन होईल, विविध आजारांपासून ग्राहकांचे संरक्षण होईल
निसर्गसेवेची शपथ घ्या; सर्वाधिक ऑक्सिजन देणारी पिंपळाची किमान पाच झाडे लावा
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2025 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज 25 डिसेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशातील रीवा येथे कृषक संमेलनाला संबोधित केले. बसवन मामा गोवंश वन विहार हा नैसर्गिक शेतीद्वारे अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याचा यशस्वी प्रयोग आहे, असे शाह यांनी सांगितले. रीवा विभागातील ही आदर्श शेती लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल आणि नैसर्गिक शेतीच्या प्रोत्साहनासाठी पथदर्शी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

आज नैसर्गिक शेतीची पारंपरिक संकल्पना आपण विसरल्याचेही त्यांनी नमूद केले. नैसर्गिक शेती ही गाईचे शेण आणि गोमूत्रावर आधारित असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करते, शुद्ध आणि आरोग्यदायी पिकांचे उत्पादन सुनिश्चित करते, असे त्यांनी सांगितले. नैसर्गिक शेतीमुळे उत्पन्नवाढ होईल, जलसंवर्धनाला चालना मिळेल आणि विविध आजारांपासून ग्राहकांचे संरक्षण होईल, असे शाह यांनी अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, सध्या देशातील 40 लाख शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती स्वीकारली असून त्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.
शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयामार्फत नैसर्गिक शेती उत्पादनांच्या प्रमाणनासाठी दोन मोठ्या सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्था सेंद्रिय उत्पादनांचे प्रमाणन, अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये तपासणी, पॅकेजिंग, विपणन आणि निर्यात या सर्व प्रक्रिया पार पाडतील.

आज जागतिक स्तरावर सेंद्रिय अन्नाच्या सेवनाला आरोग्यदायी मानले जाते, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परिणामकारकरीत्या पोहोचावीत यासाठी प्रमाणन, शास्त्रीय तपासणी, आकर्षक पॅकेजिंग आणि विपणन यांची सशक्त व्यवस्था उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्रत्येकाने निसर्गसेवेचा संकल्प करून सर्वाधिक ऑक्सिजन देणारी किमान पाच पिंपळाची झाडे लावावीत, असेही त्यांनी आवाहन केले.
आज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे आणि रीवा त्यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक होते, असे शाह यांनी सांगितले. ज्यांचे विचार आणि जीवन परस्पर पूरक आहेत, असे अटल जी यांच्या सारखे नेते दुर्मिळ असल्याचे शाह यांनी नमूद केले.

* * *
निलिमा चितळे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208617)
आगंतुक पटल : 21