पंचायती राज मंत्रालय
विशाखापट्टणममध्ये पेसा दौड ने ‘पेसा महोत्सवाची’ उत्साहवर्धक सुरुवात
महोत्सवात आदिवासी संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आजपासून दोन दिवसांचा (23-24 डिसेंबर 2025) पेसा (PESA) महोत्सव सुरू झाला. विशाखापट्टणम येथील सुप्रसिद्ध रामकृष्ण (आर.के.) बीच वर आयोजित केलेल्या ‘पेसा दौड’ ने, पंचायती (अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार) कायदा, 1996 (PESA), महोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

पहाटे आयोजित केलेल्या ‘पेसा रन’ मध्ये सर्व वयोगटातील नागरिकांनी, विशेषतः आदिवासी समुदायाच्या तरुणांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. अर्जुन पुरस्कार विजेती, ख्यातनाम भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नम हिने या रनला हिरवा झेंडा दाखवला. पंचायती राज मंत्रालयाच्या सहसचिव मुक्ता शेखर आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. वक्त्यांनी ‘पेसा’ कायद्याचा प्रभाव, आणि ग्रामसभांना सक्षम बनवण्यात आणि अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांचे हक्क, सामुदायिक संसाधने आणि सांस्कृतिक ओळख जपण्यामधील त्याची भूमिका अधोरेखित केली.
पेसा रननंतर, पेसा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आणि दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हस्तकला बाजार आणि खाद्य महोत्सवासह, महोत्सवतील स्टॉल्सवर आदिवासी हस्तकला आणि स्थानिक पाककृती प्रदर्शित करण्यात आल्या. कबड्डी आणि तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, दिवसभरात कबड्डी उपांत्य फेरीचे सामने झाले आणि तिरंदाजी स्पर्धा पात्रता फेरी, बाद फेरी आणि पदक फेरीतून सरकत आहेत.

पहिल्या दिवसाच्या उत्तरार्धात अनेक पेसा राज्यांच्या संघांनी आदिवासी समुदायाचे चोलो, येडू पेनकुलता, गेडी दौड, रसा काशी, उप्पन्ना बारेलू, पिथूल, सिकोर, मल्लखांब आणि चक्की खेल यासारख्या पारंपारिक देशी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. यामधून आदिवासी समुदायांचा समृद्ध क्रीडा वारसा प्रतिबिंबित झाला.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील दहा पेसा ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेण्यात आल्या, यात ग्रामसभांचे बळकटीकरण, जमीन हस्तांतरणाला प्रतिबंध, गौण वन उत्पादनांची मालकी, गौण खनिजांवर नियंत्रण, सामुदायिक संसाधने आणि लघु जलस्रोतांचे व्यवस्थापन, मादक पदार्थ आणि सावकारीवर नियंत्रण, आणि रीतिरिवाज, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख यांचे जतन, या संकल्पनांवर चर्चा झाली.

पेसा महोत्सव उद्याही सुरू राहणार असून, महोत्सवाचा भाग म्हणून तांत्रिक सत्रे, महत्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, पारितोषिक वितरण समारंभ आणि समारोप सत्र होईल. या महोत्सवाच्या माध्यमातून, सहभागात्मक प्रशासनाच्या संदेशाला आणि अनुसूचित क्षेत्रात तळापर्यंत लोकशाहीला बळकटी मिळेल.
यूट्यूब: https://www.youtube.com/live/X6EGU9lBmmg?si=UZYMQZaYaXU114nt
फेसबुक: https://fb.watch/E9QNp8k3Pm/
ट्विटर: https://x.com/mopr_goi/status/2003320353259733118?s=20
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207874)
आगंतुक पटल : 9