उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी भारतीय संरक्षण लेखा सेवा अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले
आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न ही गुरुकिल्ली : उपराष्ट्रपती
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2025 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) च्या 2023 आणि 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले.

उपराष्ट्रपती म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे देश वाटचाल करत असताना, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात सनदी अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी अमृत काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आवाहनाची आठवण करून दिली आणि सर्वसमावेशक वाढ आणि शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवणे हा विकासाचा केंद्रबिंदू हवा यावर भर दिला. ते म्हणाले की, तरुण अधिकाऱ्यांची युवा ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण विचार राष्ट्र उभारणीत महत्त्वपूर्ण ठरतील. 'सेवाभाव आणि कर्तव्यबोध' हे आपले मार्गदर्शक सूत्र म्हणून स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी या अधिकाऱ्यांना केले.

भारतीय संरक्षण लेखा सेवेचे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, ही सेवा भारतीय सशस्त्र सेना आणि संलग्न संस्थांच्या आर्थिक संसाधनांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संरक्षण सेवांचे लेखा आणि वित्तीय प्राधिकरण म्हणून, अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये बजावताना सशस्त्र दलांसमोरील आव्हाने समजून घेतली पाहिजेत आणि आत्मसात केली पाहिजेत, असे ते म्हणाले. सशस्त्र दलांची कार्यात्मक सज्जता सुनिश्चित करण्यासाठी विवेकी आर्थिक व्यवस्थापन आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला.

उपराष्ट्रपतींनी सचोटी, पारदर्शकता, दक्षता आणि उत्तरदायित्वाचे सर्वोच्च मापदंड राखण्याची गरज विशेषत्वाने अधोरेखित केली कारण सार्वजनिक पैसा हा करदात्यांच्या कष्टाने कमावलेल्या योगदानाचे प्रतिनिधित्व करतो.
वेगवान तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीने वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या युगातील निरंतर क्षमता बांधणीचे महत्त्व उपराष्ट्रपतींनी विशद केले. त्यांनी अधिकाऱ्यांना आजीवन शिक्षणासाठी 'आयजीओटी कर्मयोगी'सारख्या मंचाचा प्रभावीपणे वापर करण्यास प्रोत्साहित केले.
सार्वजनिक सेवेतील मूल्यांबाबत बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, ज्ञान आवश्यक असले तरी, चारित्र्य सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली की, त्यांना समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक दुर्मिळ संधी भारतातील 140 कोटी नागरिकांमधून लाभली आहे आणि त्यांनी ही जबाबदारी नम्रता व समर्पणाने पार पाडली पाहिजे.

* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207406)
आगंतुक पटल : 13