वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'पीएम गतिशक्ती' अंतर्गत लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एनपीजीच्या 105व्या बैठकीत घेण्यात आला रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचा आढावा 

प्रविष्टि तिथि: 19 DEC 2025 4:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 19 डिसेंबर 2025

पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी आज नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी)105 वी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेशी (पीएमजीएस एनएमपी) सुसंगत ठरेल अशा पद्धतीने बहुपद्धतीय जोडणी सुविधा आणि लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.

एनपीजीने 07 रेल्वे प्रकल्प आणि 01 रस्ता प्रकल्प यांची पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या एकात्मिक बहुपद्धतीय पायाभूत सुविधाविषयक तत्वे, आर्थिक तसेच सामाजिक केंद्रांशी शेवटच्या टोकापर्यंत जोडणी तसेच ‘संपूर्णतः सरकारी’ दृष्टीकोन यांच्याशी सुसंगतता तपासण्यासाठी सदर प्रकल्पांचे मूल्यांकन केले. हे उपक्रम लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेला चालना देतील, प्रवासाचा वेळ वाचवतील आणि प्रकल्पाच्या महत्त्वाच्या टप्प्यांना लक्षणीय सामाजिक आर्थिक लाभ मिळवून देतील. या प्रकल्पांचे मूल्यांकन आणि अपेक्षित परिणाम यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

खालील प्रकल्पांचे थोडक्यात वर्णन:

केंद्रीय रेल्वे मंत्रालय (एमओआर)

1. आराक्कोणम-रेणीगुंटा तिसरी आणि चौथी लाईन

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वे वाहतुकीतील कोंडी दूर करण्यासाठी, मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी, वक्तशीरपणा सुधारण्यासाठी आणि वाढती मालवाहतूकविषयक मागणी पूर्ण करण्यासाठी आराक्कोणम ते रेणीगुंटा या टप्प्यात 76.559 किमी लांबीची तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचा प्रस्ताव दिला आहे. ही मार्गिका तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील काही जिल्ह्यांमधून जाणार असून ती “मोहीम 3000 एमटी” आणि उच्च-घनता वाहतूक मार्ग (अमृत चतुर्भुज) कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असेल.

सदर प्रस्ताव उद्योगांशी चर्चेचा समावेश करतो, महत्त्वाच्या महामार्गांशी आणि विमानतळांशी जोडले जाण्याची सुनिश्चिती करतो तसेच औद्योगिक केंद्र आणि महत्त्वाची वाहतूक केंद्रे यांच्याशी सशक्त बहुपद्धतीय जोडण्यांचा वापर करतो. मालाच्या लोडिंगसाठी सुधारित पोहोच रस्ते लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेला आणखी बळकटी देतात. रेल्वेसंबंधी पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि त्या प्रदेशांतील आर्थिक विकासाला पाठबळ पुरवणे ही उद्दिष्टे असलेला हा प्रकल्प म्हणजे एक धोरणात्मक गुंतवणूक आहे हे मंत्रालयाने अधोरेखित केले आहे.

2. इरोड – करुर टप्प्यातील मार्गांचे दुपदरीकरण

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोंडी सोडवण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवासी तसेच मालवाहतूक सेवा अशा दोन्हींची परिचालनात्मक कार्यक्षमता सुधारण्यासाठी 66.67 किमी लांबीच्या इरोड – करुर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रकल्प छोट्या मालवाहतूक मार्गांना मदत करेल, औद्योगिक विकासाला चालना देईल आणि त्या प्रदेशातील गतीशीलतेला मजबूत करेल.  

या मार्गिकेचे राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांशी सशक्त एकत्रीकरण, हवाई जोडणी तसेच औद्योगिक केंद्रांशी असलेली विद्यमान रस्ते जोडणी यामुळे सुरळीत बहुपद्धतीय वाहतूक शक्य होईल. या मार्गाच्या दुपदरीकरणामुळे कोळसा, पोलाद, सिमेंट आणि ग्रॅनाईट यांसारख्या महत्त्वाच्या साहित्याची ऊर्जा प्रकल्प आणि उद्योगांपर्यंत ने-आण सुधारेल आणि याला लोडिंग बिंदूपर्यंत पुरेशा पोहोच रस्त्यांची मदत होईल.  

हा प्रकल्प पुरवठा साखळ्यांमध्ये वाढ करेल, संपर्क सुविधेत सुधारणा करेल आणि तामिळनाडूच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देईल हे सांगण्यावर मंत्रालयाने अधिक भर दिला आहे.

3. गुंटकल – बेल्लारी स्थानकांच्या दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांच्या दरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या दुपदरी मार्गीकेचे परिणामकारकरीत्या चौपदरीकरण करत गुंटकल आणि बेल्लारी या स्थानकांच्या दरम्यान 45.92 किमीची तिसरी आणि चौथी लाईन बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. जेएसडब्ल्यू, कल्याणी स्टील्स, अल्ट्राटेक सिमेंट, एसीसी सिमेंट आणि केपीसीएल यांसारख्या महत्त्वाच्या उद्योगांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाच्या मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक मार्गाची क्षमता या प्रकल्पामुळे वाढणार आहे.

महत्त्वाच्या हुबळी-गदग-गुंटकल मार्गाच्या दरम्यान असलेला हा भाग वायव्य कर्नाटकला संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या भागांशी जोडतो. बेल्लारी, तोर्णगल्लू, हॉस्पेट आणि जिनीगेर या खनिज समृद्ध आणि महत्त्वाचे पोलाद आणि ऊर्जा प्रकल्प असलेल्या पट्ट्याला सुधारलेल्या मालवाहतूक गतिमानतेचा आणि कमी झालेल्या कोंडीचा लक्षणीय लाभ मिळेल.

4.गुंटकल - वाडी दरम्यानची तिसरी आणि चौथी लाईन

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा या राज्यातून जाणाऱ्या गुंटकल आणि वाडीदरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या उभारणीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रदेशातील एका सर्वात महत्त्वाच्या मालवाहतूक मार्गाच्या क्षमतेचा विस्तार करत हा प्रकल्प विद्यमान दुहेरी टप्प्याचे चौपदरीकरण करेल.

ही मार्गिका वाडी-गुंटकल-रेणीगुंटा मार्गालगत असलेल्या उर्जा प्रकल्पांसाठी नागपूर-बल्हारशाह-कोठगुंडम पट्ट्यातून कोळसा वाहतूक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून ती वाडी आणि तांदूर दरम्यान असलेल्या प्रमुख सिमेंट कारखान्यांसाठी देखील उपयुक्त आहे. सदर विस्तारामुळे रेल्वे वाहतुकीची कोंडी सोडवता येईल, वक्तशीरपण तसेच सरासरी वेग सुधारेल आणि प्रवासी तसेच माल वाहतुकीसाठी अतिरिक्त मार्ग निर्माण होतील.

5.सालेम-करुर-दिंडीगुल दरम्यानच्या मार्गाचे दुपदरीकरण

मेट्टूर औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि पोलाद, सिमेंट, वस्त्रोद्योग, कृषी आणि अन्न प्रक्रिया यांसारख्या प्रमुख क्षेत्रांची सेवा देणारा एक महत्त्वाचा ऊर्जा आणि औद्योगिक मार्ग म्हणून, उन्नत केलेली ही रेल्वे मार्गिका मालवाहतूक खर्च लक्षणीयरीत्या कमी करेल, दळणवळण (लॉजिस्टिक्स) कार्यक्षमता सुधारेल आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देईल. सेलम, नामक्कल, करूर आणि दिंडीगुल येथील मजबूत औद्योगिक समूहांना या सुधारित मार्गिकांच्या सोयींचा लाभ होईल.

या प्रकल्पामुळे सेवेविषयी विश्वसनीयता सुधारेल, स्थानिक रोजगार निर्माण होईल आणि तामिळनाडूचे सामरिक मालवाहतूक जाळे अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.

6. यादद्री आणि काझीपेठ स्थानकांदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका आणि घाटकेसर आणि यादद्री स्थानकांदरम्यान चौथी मार्गिका

रेल्वे मंत्रालयाकडे यादद्री आणि काझीपेठ (77.958 किमी) दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका आणि घाटकेसर आणि यादद्री (32.448 किमी) दरम्यान चौथी मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव आहे. हे विभाग भारतीय रेल्वेच्या प्रकल्पांच्या संचांतर्गत ओळखल्या गेलेल्या उच्च वाहतूक घनता कॉरिडॉरचा भाग आहेत, जे त्यांचे सामरिक महत्त्व अधोरेखित करते.

यादाद्री-काझीपेठ-घाटकेसर कॉरिडॉर हा तेलंगणातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे मार्गांपैकी एक आहे, जो दक्षिण भारतात प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी एक प्रमुख दुवा म्हणून काम करतो आणि हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली यांसारख्या प्रमुख महानगरांना एकमेकांशी जोडतो. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे आणि या प्रदेशात प्रमुख औद्योगिक आस्थापना एकाच जागी असल्याने या कॉरिडॉरमध्ये लक्षणीय विकास झाला आहे.या मार्गाला बहुविध वाहतूक जोडणीचा उत्तम लाभ होतो, ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग-163 आणि राज्य महामार्ग -1 आणि 2 सारख्या प्रमुख रस्त्यांवर थेटपणे पोहोचता येते.

हे ठिकाण प्रमुख विमानतळांच्या सोयीस्कर जवळ आहे—राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (सिकंदराबादपासून सुमारे 31 किमी) आणि बेगमपेट विमानतळ (सुमारे 40 किमी). रेल्वे स्थानके आणि औषधी उत्पादन कंपन्यांच्या (फार्मास्युटिकल) क्लस्टरसह औद्योगिक क्षेत्रांमधील सध्याचे रस्ते दुवे प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाढलेल्या वाहतुकीला सामावून घेण्यासाठी आणखी मजबूत केले जातील. जवळच्या परिसरात कोणतेही बंदर नाही.

प्रस्तावित विस्ताराचा उद्देश नेटवर्कची क्षमता वाढवणे, वेळेवर सेवा सुनिश्चित करणे आणि प्रदेशातील वाढत्या प्रवासी व मालवाहतुकीच्या मागणीला आधार देणे हा आहे.

7. तळेगाव-उरुळी दरम्यान तिसरी आणि चौथी विद्युतीकृत बहु-मार्गी रेल्वे लाईन

प्रवाशांची आणि मालवाहतुकीची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तळेगाव आणि उरुळी दरम्यान ब्रॉड-गेज, विद्युतीकृत बहु-मार्गी रेल्वे लाईनचा प्रस्ताव दिला आहे. ही मार्गिका तळेगाव,वाघोली आणि उरुळी यांसारख्या प्रमुख शहरांतून जाईल आणि महत्त्वाच्या औद्योगिक व लॉजिस्टिक्स केंद्रांना सहाय्य करेल.

जेएसडब्ल्यू डोल्वी, जेएनपीए, अदानी एपीसेझ, एमआयडीसी चाकण, निफाड ड्राय पोर्ट्स आणि ऑटोमोबाइल उद्योगांसारख्या प्रमुख भागधारकांशी वाहतूकीच्या मूल्यांकन आणि शक्यतांसाठी सल्लामसलत करण्यात आली आहे. हा प्रकल्प प्रमुख राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मार्गक्रमण टाळून, विमानतळ आणि महामार्गांसोबत बहुविध वाहतूक एकीकरणाची खात्री देतो.

ही मार्गिका उरुळी येथील आगामी मेगा कोचिंग टर्मिनलला जोडली जाईल, मुंबई-चेन्नई उच्च-घनता जाळ्यावरील पुणे-सोलापूर-वाडी मार्गाशी संलग्न होईल आणि पुणे-सातारा विभागावरील आळंदीपर्यंत अतिरिक्त मार्गिका जोडेल, ज्यामुळे एकूण जाळ्याची क्षमता आणि कार्यान्वयन कार्यक्षमता सुधारेल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH)

8. आंध्र प्रदेश राज्यात अमरावती बाह्य वळण रस्त्यावर संपणारे, विनूकोंडा-गुंटूर विभागातील राष्ट्रीय महामार्ग-544D महामार्गाच्या उन्नतीकरणाचे बांधकाम. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने विनूकोंडा ते गुंटूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग एनएच-544D च्या उन्नतीकरणाचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये महामार्गाचे दुपदरी रुंदीकरण करून त्याला पक्क्या कडेपट्ट्यांसह चौपदरी महामार्गात रूपांतरित केले जाईल. या प्रकल्पाचा उद्देश या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याची क्षमता, सुरक्षा आणि एकूण कार्यक्षमता वाढवणे हा आहे, जो राष्ट्रीय महामार्ग-44 (बंगळूरू-हैदराबाद) आणि राष्ट्रीय महामार्ग-16 (कोलकाता-चेन्नई) यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.

हा प्रस्तावित मार्ग विनूकोंडा येथील पोडिलि जंक्शनपासून अमरावती बाह्य वळण रस्त्यापर्यंत पसरलेला असून, त्याची एकूण लांबी अंदाजे 85.9 किलोमीटर आहे, ज्यात सुमारे 44.6 किलोमीटर हा सध्याचा रस्ता आणि 41.3 किलोमीटर नवीन रस्ता यांचा समावेश आहे. हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सध्याच्या महामार्गालाच अनुसरतो, तथापि, सध्याच्या मार्गातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी निवडक भागांमध्ये भूमितीय सुधारणा, मार्गबदल आणि बाह्यवळण रस्त्यांचा विकास केला जाईल.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, प्रवासाचा वेळ सुमारे 52%, ने कमी होईल, लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल तसेच मालवाहतूक व वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे नरसारावपेट, गुंटूर, विजयवाडा आणि नव्याने विकसित होणारे राजधानीचे शहर अमरावती यांसारख्या प्रमुख शहरी केंद्रांमधील संपर्क सुधारेल, तसेच प्रादेशिक आर्थिक विकास रोजगार निर्मिती, शहरी विकास आणि पर्यटनाला चालना मिळेल.

या बैठकीचे अध्यक्षस्थान उद्योग आणि अंतर्गत व्यापार, मालवाहतूक प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) सहसचिव, यांनी भूषवले होते.

***

नितीन फुल्लुके/संजना चिटणीस/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2206956) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil