पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ओमानचे महामहिम सुलतान यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मस्कत येथे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. राजवाड्यामध्ये आगमन झाल्यावर महामहिम सुलतानांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांना औपचारिक सन्मान प्रदान केला.
उभय नेत्यांनी परस्परांशी आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. त्यांनी भारत-ओमानच्या बहुआयामी सामरिक भागीदारीचा सर्वंकष आढावा घेतला आणि द्विपक्षीय संबंधांमधील वाढीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी नमूद केले की, या वर्षी दोन्ही देश राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची 70 वर्षे साजरी करत असल्याने ही भेट भारत-ओमान संबंधांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे.
त्यांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर (सीईपीए) झालेली स्वाक्षरीचे स्वागत करून ही द्विपक्षीय संबंधांमधील एक महत्त्वपूर्ण घडामोड असून यामुळे धोरणात्मक भागीदारीला मोठी चालना मिळेल, असे सांगितले. द्विपक्षीय व्यापाराने 10 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडल्याबद्दल आणि दोन्ही देशांमधील गुंतवणुकीचा ओघ पुढे जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की सीईपीएमुळे द्विपक्षीय व्यापार तसेच गुंतवणुकीला लक्षणीय चालना मिळेल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि दोन्ही देशांमध्ये असंख्य संधी उपलब्ध होतील.
उभय नेत्यांनी दीर्घकालीन ऊर्जा करार, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि हरित हायड्रोजन व हरित अमोनिया प्रकल्पांद्वारे ऊर्जा सहकार्याला नवीन चालना देण्यावरही चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील झाल्याबद्दल ओमानचे कौतुक केले आणि त्यांना आपत्ती-प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीच्या आघाडीत आणि जागतिक जैवइंधन आघाडीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले.
पंतप्रधानांनी नमूद केले की, कृषी विज्ञान, पशुसंवर्धन, जलशेती आणि भरडधान्यांच्या लागवडीसह कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे दोन्ही देशांना फायदा होऊ शकतो.
शिक्षण क्षेत्रातील सहकार्याचे महत्त्व ओळखून दोन्ही नेत्यांनी नमूद केले की प्राध्यापक आणि संशोधकांची देवाणघेवाण दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल.
उभय नेत्यांनी अन्न सुरक्षा, उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, अत्यावश्यक खनिजे, लॉजिस्टिक्स, मानव संसाधन विकास आणि अंतराळ सहकार्य या क्षेत्रांमधील सहकार्यावरही चर्चा केली.
आर्थिक सेवांच्या बाबतीत त्यांनी यूपीआय आणि ओमानच्या डिजिटल पेमेंट प्रणालीमधील सहकार्य, रुपे कार्डचा स्वीकार तसेच स्थानिक चलनांमध्ये व्यापार यावरही चर्चा केली.
पंतप्रधानांनी नमूद केले की, खते आणि कृषी संशोधन ही दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर क्षेत्रे आहेत आणि त्यांनी संयुक्त गुंतवणुकीसह या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्यासाठी काम केले पाहिजे.
उभय नेत्यांनी सागरी क्षेत्रासह संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अधिक वाढवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल महामहिम सुलतान यांचे आभार मानले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सागरी वारसा, भाषा संवर्धन, युवा देवाणघेवाण आणि क्रीडा संबंध या क्षेत्रांतील अनेक नवीन द्विपक्षीय उपक्रमांमुळे उभय देशांतील जनतेमधील संबंध अधिक दृढ होतील. उभय देशांनी सामायिक केलेल्या समृद्ध सांस्कृतिक वारशावरही त्यांनी चर्चा केली आणि सागरी संग्रहालयांमधील सहकार्य, तसेच कलाकृती व कौशल्यांची देवाणघेवाण याच्या महत्त्वावर भर दिला.
नेत्यांनी ओमान व्हिजन 2040 आणि भारताचे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय यांच्यातील समन्वयाचे स्वागत केले आणि आपल्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी परस्परांना पाठिंबा दर्शवला.
नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचारविनिमय केला आणि प्रादेशिक शांतता व स्थिरतेसाठी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.
या भेटीच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी 'सीईपीए' व्यतिरिक्त सागरी वारसा, शिक्षण, कृषी आणि भरडधान्य लागवड या क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार/व्यवस्थांवर स्वाक्षऱ्या केल्या.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206262)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam