दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
अथणीमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन
बेळगावच्या भूमीवर शौर्य, स्वाभिमान आणि अफाट शौर्याची अमर गाथा जिवंत झालीः सिंधिया यांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2025 6:16PM by PIB Mumbai
केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आज रविवारी कर्नाटकमधील बेळगावी इथल्या अथणी इथं मराठा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना सिंधिया म्हणाले की, हा प्रसंग ऐतिहासिक असून, हे केवळ एका पुतळ्याचे अनावरण नसून, भारताचा स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याची भावना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे. ते पुढे म्हणाले की, 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात धैर्य, राष्ट्रवाद आणि स्वाभिमान जागा करते. कार्यक्रमादरम्यान मंजुनाथ भारती स्वामी, संभाजी भिडे, कर्नाटकचे मंत्री संतोष लाड तसेच सतीश जारकीहोली, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सावदी, कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंत बी. पाटील आणि पी. जी. आर. शिंदे यांच्यासह इतर मान्यवर नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार आणि राष्ट्रवादाचे प्रतीक
केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि संघर्षाचे स्मरण करत सांगितले की, केवळ 15 व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा करणाऱ्या शिवाजी महाराजांनी शौर्य, युद्धनीती आणि दूरदृष्टीने आक्रमकांना पराभूत करत भारताच्या स्वाभिमानाचे रक्षण केले होते.
सिंधिया यांनी सांगितले की, बेळगावी आणि अथणीची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षीदार राहिली आहे. दक्षिण भारतातील त्यांच्या मोहिमांदरम्यान या प्रदेशाचे सामरिक महत्त्व अत्यंत होते. येथून दख्खन, कोकण आणि गोवा मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली होती. आज याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणे हा इतिहास, परंपरा आणि वर्तमान यांना जोडणारा गौरवपूर्ण क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. सिंधिया म्हणाले की, आज बेळगावच्या भूमीवर शौर्य, स्वाभिमान आणि अमर्याद साहसाची अमर गाथा सजीव झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेवर वाटचाल करणारा आधुनिक भारत : सिंधिया
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, आज भारत आत्मगौरव आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या मार्गावर पुढे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अधिकच सुसंगत ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत, आत्मनिर्भरता आणि राष्ट्रधर्माची जी चेतना देशात पुढे जात आहे, तिची मुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच विचारधारेत आहेत, असे त्यांनी सांगितले. हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना राष्ट्रहित सर्वोपरि आहे, साहस कधी थांबत नाही आणि स्वराज्याची भावना कधीही जुनी होत नाही, हा संदेश देत राहील.
उल्लेखनीय म्हणजे, केंद्रीय मंत्री सध्या त्यांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र–कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यापूर्वी शनिवारी त्यांनी कोल्हापूर येथे बॉम्बे जिमखान्याच्या 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टपाल तिकिटाचे अनावरण केले. त्यानंतर ते ग्रामीण डाक परिषदेतील कार्यक्रमात सहभागी झाले. तिथे त्यांनी ग्रामीण टपाल सेवकांशी संवाद साधला. त्यानंतर आज सिंधिया बेळगावी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहिले.



***
शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203764)
आगंतुक पटल : 25