वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते मुंबईतील सीप्झ अर्थात सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स निर्यात प्रक्रिया क्षेत्र इथे आयोजित कार्यक्रमात नवउद्योग आणि सेवा मनोरा – टप्पा 2 चे (NEST–02 / New Enterprises & Services Tower) उद्घाटन


पारदर्शकतेला बळकटी द्यावी, उद्योग क्षेत्र आणि शासनात सहकार्यपूर्ण भागीदारी प्रस्थापित व्हावी आणि कार्यक्षमता वाढवावी असे पीयूष गोयल यांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 11 DEC 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईतील सीप्झ अर्थात सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स निर्यात प्रक्रिया क्षेत्र इथे आयोजित कार्यक्रमात नवउद्योग आणि सेवा मनोरा – टप्पा 2 चे (NEST–02 / New Enterprises & Services Tower) उद्घाटन केले. भारताच्या भविष्यातील कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विषयक उपक्रमांना बळकटी द्यावी असे आवाहन, गोयल यांनी उद्योजकांना केले.

सीप्झने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने साध्य केलेल्या विकासाच्या गतीशी बरोबरी साधली पाहिजे असे त्यांनी सांगितले. या क्षेत्राचे कामकाज आणि कामगिरी देशाच्या  व्यापक आर्थिक गतीशी जुळली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पीयूष गोयल यांनी सीप्झमधील केंद्रांना प्रशिक्षण विषयक उपक्रमांचा, विशेषतः युवा वर्गाच्या सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहित केले. कौशल्य हा भारताच्या भारताच्या भविष्यातील प्रगतीच्या केंद्रस्थानी असलेला घटक आहे असल्याचेही त्यांनी नमूद केले. उद्योग जगताने मनुष्यबळ निर्मितीला पाठबळ पुरण्यात आणि देशाच्या व्यापक कौशल्य विषयक आराखड्यात योगदान देण्यासाठीच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठा वाटा उचलावा असे आवाहनही त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या प्रशासनिक दृष्टिकोनात पारदर्शकता, एकात्मता आणि जबाबदारी हे केंद्रस्थानी असलेले घटक आहेत ही बाब त्यांनी नमूद केली. सीप्झचे कामकाज स्वच्छ, पारदर्शक आणि उत्तरदायी तत्वावर व्हावे यासाठी इथल्या व्यवसाय धारकांनी तसेच या उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी प्रशासनासोबत एकत्रितपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. अशा प्रकारचे वातावरण टिकवून ठेवणे ही सामुदायिक जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

आत्मनिर्भर भारताचा संकल्पही त्यांनी अधोरेखित केला. देशांतर्गत क्षमतांना बळकटी देण्यासाठी, स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी, स्वदेशीला चालना देण्यासाठी, उच्च प्रतीचा मापदंड टिकवून ठेवण्यासाठी आणि भविष्यातील संधींसाठी आपण सज्ज असावे याकरता, हे उद्योग क्षेत्र आणि शासनाने एकत्रितपणे काम केले पाहिजे असे ते म्हणाले. विकसित भारत 2047 च्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला अनुसरून या उद्योग जगताने आधुनिक प्रणालीचा अवलंब करावा, भविष्यवेधी नियोजन करणे आणि जागतिक गुणवत्तेच्या प्रक्रियांची अंमलबजावणी करावी असे आवाहन त्यांनी केले.

सीप्झने भारताच्या आर्थिक परिवर्तनाची गती आणि महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबीत होईल अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे उत्पादन आणि निर्यात क्षेत्र म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करावे असे आवाहनही त्यांनी केले. उद्योग क्षेत्राच्या नेतृत्वाखालील प्रगती, नवोन्मेष आणि स्पर्धात्मकतेला पाठबळ देण्याप्रति केंद्र सरकारची वचनबद्धता त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.


शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2202596) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी