भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्टार्टअप्सच्या पुढील पिढीला आकार देण्यासाठी अर्थसहाय्यापेक्षा मार्गदर्शनच महत्वाचे- डॉ. जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 07 DEC 2025 6:26PM by PIB Mumbai

 

भारताच्या भविष्यातील प्रगतीमध्ये स्टार्टअप्स निर्णायक भूमिका बजावतील, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. केवळ अर्थ सहाय्य नव्हे तर मार्गदर्शन हेच नव्या पिढीच्या स्टार्टअप्सला आकार देतील  असे त्यांनी सांगितले. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात सिंह यांनी आज उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सक्षम मार्गदर्शनाची वाढती गरज, संशोधनात अधिक जोखीम घेण्याची तयारी आणि तरुण नवोन्मेषकांना प्रारंभीच योग्य मार्गदर्शन मिळणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी “स्टार्टअप जर्नीज्” या विषयावरील पॅनल चर्चेत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताने विज्ञान शिक्षणातील मर्यादित उपलब्धतेच्या टप्प्यातून पुढे जात संधींचे “लोकशाहीकरण” होत असलेल्या नव्या अवस्थेकडे निर्णायक वाटचाल केली आहे. त्यामुळे लहान शहरांतील आणि सर्वसाधारण पार्श्वभूमीतून येणाऱ्या तरुणांना उद्योजकतेची आकांक्षा बाळगण्याचे स्वातंत्र्य लाभत आहे. त्यांनी सांगितले की, सरकारचा भर आता केवळ धोरणात्मक घोषणांवर न राहता, नवकल्पनांना बाजारपेठांशी जोडणाऱ्या सक्षम परिसंस्था उभारण्यावर केंद्रित झाला आहे.

विज्ञानातील वेगवान प्रगतीने भारतातील सामान्य नागरिकांच्या जीवनमानात मोठे बदल घडवले आहेत. आरोग्य तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानातील ज्या सुविधा पूर्वी परदेशातच उपलब्ध होत, त्या आता देशांतर्गत विकसित होत आहेत, असे सिंह म्हणाले.  आजचा भारत जागतिक तंत्रज्ञानाचा केवळ ग्रहणकर्ता राहिलेला नाही, तर जीवन विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान आणि अन्य क्षेत्रांत आपल्या स्वतंत्र कल्पना व उपाययोजना देत सक्रिय योगदान देत आहे, असे त्यांनी नमूद केले.

शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह तरुण उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्टार्टअप सुरू करण्यापूर्वी उद्दिष्टांची स्पष्टता आणि स्वतःच्या क्षमतांची जाणीव असण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तरुण नवोन्मेषकांना त्यांची बलस्थाने ओळखण्यासाठी, कल्पना अधिक सुस्पष्ट करण्यासाठी आणि सामान्य चुका टाळण्यासाठी प्रारंभीच्या टप्प्यात मिळणारे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

***

सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2200112) आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Kannada , Malayalam