नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विमान सेवा जलद गतीने पूर्ववत करणे  आणि प्रवासी सुविधा उपाययोजना

प्रविष्टि तिथि: 07 DEC 2025 5:08PM by PIB Mumbai

 

वर्तमान कार्यस्थिती

इंडिगो सेवा व्यत्ययामुळे निर्माण झालेली कोंडी  दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सततची गैरसोय होऊ नये यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने  त्वरित आणि ठोस पावले उचलली आहेत. देशभरातील हवाई सेवांचे कामकाज जलद गतीने स्थिर होत आहे. इतर सर्व देशांतर्गत विमान कंपन्या सुरळीत आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, तर  इंडीगोच्या कामगिरीत आज लक्षणीय सुधारणा दिसत असून उड्डाण वेळापत्रके पुन्हा सामान्य पातळीवर येत आहेत.  इंडीगोची उड्डाणे 05.12.25 रोजी 706 वरून 06.12.25 रोजी 1,565 वर वाढली असून आज अखेरपर्यंत ती 1,650 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अतिरिक्त आकारणी रोखण्यासाठी विमान भाडेनियमन:

विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे मागणीत झालेली वाढ आणि  हवाई शुल्कात झालेली तात्पुरती वाढ या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने तात्काळ हस्तक्षेप करून हवाई शुल्क मर्यादा लागू केली आहे. या उपायामुळे प्रवाशांसाठी प्रवास अधिक न्याय्य आणि परवडणारा झाला आहे. हा आदेश लागू झाल्यापासून प्रभावित मार्गांवरील भाडे पातळी स्वीकारार्ह मर्यादेत परत आली आहे. सर्व विमान कंपन्यांना सुधारित भाडे संरचनेचे कठोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवासी परतावा आणि पुनर्नियोजन सहाय्य

प्रवाशांच्या आर्थिक हितरक्षणासाठी मंत्रालयाने  इंडीगोला कठोर निर्देश दिले आहेत की रद्द किंवा मोठ्या विलंबामुळे  प्रभावित सर्व उड्डाणांचे परतावे आज संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत पूर्ण करावेत.  इंडीगोने आतापर्यंत एकूण ₹610 कोटींचे परतावे दिले  आहेत. रद्द उड्डाणांमुळे प्रभावित प्रवासाचे पुनर्नियोजन करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. प्रवाशांना सक्रियपणे सहाय्य करण्यासाठी समर्पित सहाय्य कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, ज्यामुळे परतावा आणि  नव्याने बुकिंग संदर्भातील समस्या कोणत्याही विलंबाशिवाय आणि गैरसोयीशिवाय सोडवता येतील.

सामान नियमन आणि वितरण

या व्यत्ययामुळे, प्रवाशांचे वेगळे ठेवलेले सर्व सामान 48 तासांच्या आत शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.या प्रक्रियेदरम्यान सातत्यपूर्ण संवाद साधणे अनिवार्य आहे. या प्रयत्नांमुळे, इंडिगोकडून कालपर्यंत संपूर्ण देशातील प्रवाश्यांना 3000 नग सामान यशस्वीरित्या वितरीत केले आहे.

विमानतळ संचलन आणि प्रत्यक्ष स्थानी (ऑन-ग्राउंड) सुविधा

दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद आणि गोवा येथील विमानतळ संचालकांनी विमानतळावर परिस्थिती सामान्य असल्याची पुष्टी केली आहे. चेक-इन,सुरक्षा किंवा बोर्डिंग स्थळावर गर्दी नसल्याने प्रवाशांची ये-जा सुरळीत होत आहे. विमानतळ ऑपरेटर्स  आणि  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून वाढीव  देखरेख तसेच वेळेत सहाय्य पुरवून  प्रत्यक्ष ठिकाणी मदत व्यवस्था बळकट करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष देखरेख आणि नियंत्रण उपाय

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा   24×7 नियंत्रण कक्ष   उड्डाण परिचालन, विमानतळावरील  परिस्थिती आणि प्रवासी मदतीच्या गरजांवर देखरेख ठेवण्यासाठी एकात्मिक समन्वय केंद्र म्हणून कार्यरत आहे. प्रवाशांच्या दूरध्वनीला त्वरीत प्रतिसाद दिला जात असून, गरजेनुसार आवश्यक साहाय्य केले जात आहे. आमचे पथक परिचालन नियोजन, कर्मचाऱ्यांची (रोस्टरिंग) कार्य जबाबदारी, प्रवासी हाताळणी मानके यांचे निरीक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष स्थानावर तैनात असून ते नियमांचे पालन सुनिश्चित करत आहेत.

प्रवाशांना आश्वस्त करणे

प्रवाशांची सुरक्षा, सुविधा आणि प्रतिष्ठा याला भारत सरकार सर्वोच्च प्राथमिकता देत असल्याची हमी नागरी विमान वाहतूक मंत्रालय प्रवाशांना देत आहे. . विमान वाहतूक  पूर्ववत होण्याकडे वाटचाल करत आहे आणि परिचालन पूर्णपणे स्थिरस्थावर होईपर्यंत  सर्व सुधारित उपाययोजना सुरू राहतील.

प्रवाशांचे हक्क आणि हितांचे संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय सातत्याने सतर्कतेने देखरेख ठेवणार असून आवश्यकतेनुसार पुढील अद्ययावत माहिती सामाईक केली जाईल.

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2200077) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Odia