कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
सरदार गाथा बनला सरदार@150 एकता दौडमधील शक्तिशाली क्षण
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2025 5:49PM by PIB Mumbai
अलिकडच्या काळात युवा नेतृत्वाखालील सर्वात मोठ्या राष्ट्र ऐक्य दृढ करणाऱ्या उपक्रमांपैकी एक असलेल्या सरदार@150 एकता दौडने आज नर्मदा जिल्ह्यातील सरदार गाथा कार्यक्रमाद्वारे एक महत्त्वाचा टप्पा गाठला. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय पदयात्रेचा भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात भारताचे एकीकरण करण्यात तसेच देशाच्या संघराज्य भावनेला आकार देण्यात पटेल यांच्या अतुलनीय भूमिकेचे स्मरण करण्यात आले.
"एक भारत, श्रेष्ठ भारत" या भावनेने प्रेरित असणारी एकता दौड सरदार पटेल यांचा राष्ट्रीय एकात्मता, शिस्तबद्ध नागरिकत्व आणि राष्ट्र उभारणीसाठी सामूहिक जबाबदारीचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न करते. भारत आपली सामाजिक, आर्थिक आणि सामरिक ताकद वाढवत असताना देशभरातील जिल्ह्यांमध्ये पोहोचलेली ही पदयात्रा वाढत्या राष्ट्रीय आत्मविश्वासाचे, सांस्कृतिक अभिमानाचे आणि नव्याने नागरिक सहभागाचे प्रतीक बनली आहे.
या मेळाव्यात बोलताना केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी पटेलांचा वारसा पुढे नेण्यातील तरुण नागरिकांची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, "सरदार पटेल यांनी भारताला एकता दिली; आज भारतातील तरुण त्या एकतेला बळ देत आहेत. या पदयात्रेतील त्यांचा सहभाग हा राष्ट्राचा आपल्या ओळखीवर विश्वास आणि प्रगतीसाठी वचनबद्धता दर्शवितो. हा प्रवास म्हणजे केवळ लोहपुरुषांना श्रद्धांजली नाही तर एक मजबूत आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाची पुष्टी आहे.”
चौधरी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, ज्यात एकता आणि राष्ट्रीय शक्तीच्या त्यांच्या चिरस्थायी आदर्शांना कायम ठेवण्याचा राष्ट्राच्या नेतृत्वाचा संकल्प अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक नागरिकांना सामुदायिक विकासातील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी सहभागींनी आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा घेतली, जी आत्मविश्वास आणि राष्ट्र-प्रथम या वचनबद्धतेच्या आदर्शांना प्रतीकात्मकरित्या बळकटी देते. या कार्यक्रमात युवा स्वयंसेवक, माय भारत सदस्य आणि स्थानिक समुदायांचा उत्साही सहभाग दिसून आला.
सरदार गाथा कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी आणि केंद्रीय शिक्षण आणि ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार हेही उपस्थित होते.




***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199623)
आगंतुक पटल : 4