वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जेईएम द्वारे भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन विषयावर आयडीएएस परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी अभिमुखता सत्राचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
05 DEC 2025 10:45AM by PIB Mumbai
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेईएम) ने भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या (आयडीएएस) प्रोबेशनर्स अर्थात परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी नवी दिल्ली येथील जेईएम कार्यालयामध्ये "जेईएम -भारतातील सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन" या विषयावर एक दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन केले.
जेईएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिहिर कुमार यांनी त्यांच्या मुख्य भाषणात, डिजिटल खरेदी पारदर्शक, जबाबदार आणि भविष्यासाठी तयार असलेल्या शासनसंबंधित आराखड्यासाठी महत्त्वाची आहे, यावर भर दिला. जेईएम ची भूमिका केवळ खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यापलीकडे असून हा मंच प्रत्येक भागधारकाला जलद, डेटा-आधारित आणि नियमांनुसार निर्णय घेण्यासाठी साधने पुरवत असल्याचे त्यांनी नमूद केले. संरक्षण क्षेत्रात हे परिवर्तन अधिक पुढे नेण्यासाठी संरक्षण लेखा व्यावसायिक महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दिवसभर चाललेल्या या अभिमुखता कार्यक्रमात जेईएम च्या प्रमुख अधिकारी आणि क्षेत्र विशेषज्ञांनी खालील विषयांवर सत्रे घेतली:
- महत्त्वाच्या खरेदी संकल्पना, प्रक्रिया आणि सर्वोत्तम पद्धती
- खरेदीदारासमोरील आव्हाने आणि प्लॅटफॉर्मद्वारे होणारे उपाय
- आवश्यक अनुपालन आणि धोरणात्मक चौकट
- तक्रार निवारण, घटना व्यवस्थापन आणि समर्थन प्रणाली
- जेईएम पोर्टलचे सविस्तर थेट प्रात्यक्षिक
या परस्परसंवादी चर्चांमुळे परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना थेट जेईएम टीम्ससोबत संवाद साधता आला, शंकांचे निरसन करता आले आणि मागणी निर्मिती आणि बोली लावण्यापासून ते करार व्यवस्थापन आणि पेमेंटपर्यंतची संपूर्ण खरेदी प्रक्रिया समजून घेता आली.
विभागीय प्रशिक्षण आणि सीजीडीए मुख्यालयाशी संलग्नतेचा भाग म्हणून, 2024 च्या तुकडीमधील 17 आयडीएएस परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी भारताच्या झपाट्याने विकसित होत असलेल्या डिजिटल सार्वजनिक खरेदी परिसंस्थेची व्यावहारिक माहिती घेण्यासाठी जेईएम ला भेट दिली. या सत्रामुळे त्यांना जेईएम ची मूळ तत्त्वे, प्रशासकीय पद्धती आणि तंत्रज्ञान-आधारित सुधारणांची माहिती मिळाली, ज्यामुळे सरकारी खरेदीमध्ये पारदर्शकता, स्पर्धा आणि कार्यक्षमता वाढली आहे.
संरक्षण संस्थांसोबतची भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि संरचित प्रशिक्षण आणि क्षमता-निर्माण कार्यक्रमांद्वारे सार्वजनिक वित्त आणि खरेदी व्यावसायिकांच्या पुढील पिढीच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी जेईएम कटिबद्ध आहे.
***
नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199348)
आगंतुक पटल : 10