अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज नवी दिल्ली येथे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) 68 व्या स्थापना दिन कार्यक्रमाचे केले उद्घाटन
तस्करीच्या सिंडिकेटचा बिमोड करण्यासाठी आणि तस्करीतून निर्माण होणाऱ्या बेकायदेशीर निधीचा प्रवाह रोखण्यासाठी डीआरआयच्या अथक प्रयत्नांवर डीआरआयच्या महासंचालकांनी टाकला प्रकाश
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 2:47PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज नवी दिल्ली येथील मुख्यालयात महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) च्या 68 व्या स्थापना दिन समारंभाचे उद्घाटन केले. ही भारताची सर्वोच्च तस्करीविरोधी गुप्तचर आणि अंमलबजावणी संस्था आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) अंतर्गत ही संस्था काम करते.

याप्रसंगी आपल्या भाषणात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 1957 मधील स्थापनेपासून भारताच्या आर्थिक सीमा आणि व्यापार पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी डीआरआयच्या दृढ वचनबद्धतेचे कौतुक केले. जागतिक आव्हाने, तांत्रिक बदल आणि संघटित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याचा उदय या सर्व बाबींचा सामना करण्यासाठी आणि प्रत्येक आघाडीवर दृढता, समर्पण आणि कार्यक्षमतेने आपली कर्तव्ये बजावत राहिल्याबद्दल त्यांनी डीआरआयचे कौतुक केले. प्रामाणिक करदाते सन्मानाने व्यवसाय करू शकतील तसेच भारताच्या जमीन, जलमार्ग किंवा हवाई मार्गाचा वापर बेकायदेशीर व्यापारासाठी अशक्य, धोकादायक होईल याची खात्री करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे यावर त्यांनी भर दिला.

डीआरआयने आपले वार्षिक प्रमुख प्रकाशन असलेला भारतातील तस्करी अहवाल 2024-25 देखील प्रकाशित केला. यात अंमलबजावणीतले ठळक यश, बेकायदेशीर व्यापारातील कल, उदयोन्मुख आव्हाने आणि धोरणात्मक शिफारसींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या समारंभात 10 व्या प्रादेशिक सीमाशुल्क अंमलबजावणी बैठकीतील (आरसीईएम) 15 सहभागी देशांमधील 30 आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते, जे आंतरराष्ट्रीय तस्करी रोखण्यासाठी भारत आणि जागतिक अंमलबजावणी संस्थांमधील वाढती भागीदारी प्रतिबिंबित करते. त्यांच्या उपस्थितीने आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क सहकार्यातील प्रमुख योगदानकर्ता म्हणून डीआरआयची भूमिका अधोरेखित केली.

डीआरआय देशाच्या सेवेच्या 69 व्या वर्षात प्रवेश करत असताना भारताच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणे, सीमांचे रक्षण करणे आणि अखंडतेचे सर्वोच्च मानक राखणे या आपल्या ध्येयाची पुष्टी करते.

***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2199158)
आगंतुक पटल : 30