अकिनोला डेव्हीस ज्यु. यांना ‘माय फादर्स शॅडो’ या चित्रपटासाठी रौप्य मयूर-विशेष परीक्षक पुरस्कार देऊन गौरव
उत्कृष्ट पटकथा आणि बहारदार अभिनयाचे परीक्षकांनी केले कौतुक
राजकीय उलथापालथीच्या दरम्यान कुटुंबातील गुंतागुंतीच्या नात्याचा शोध घेणारा चित्रपट
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दिग्दर्शक अकिनोला डेव्हीस ज्यु. यांना युके आणि नायजेरिया मधील ‘माय फादर्स शॅडो’ या सशक्त आणि उद्बोधक चित्रपटासाठी रौप्य मयूर-विशेष परीक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या विभागातील 15 चित्रपटांच्या यादीतून या चित्रपटाने त्यातील लक्षवेधी चित्रपट निर्मिती कला आणि दिग्दर्शकाच्या विशिष्ट कलात्मक दृष्टीसाठी हा सन्मान मिळवला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू तसेच इफ्फी परीक्षक मंडळ प्रमुख राकेश ओमप्रकाश मेहरा आणि महोत्सव संचालक शेखर कपूर यांच्या उपस्थितीत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल.मुरुगन यांच्या हस्ते अकिनोला डेव्हीस ज्यु. यांना हा पुरस्कार देण्यात आला.

परीक्षकांच्या मते चित्रपट निर्मितीच्या कोणत्याही एका पैलूमध्ये असामान्य उत्कृष्टतेचे दर्शन घडवणाऱ्या चित्रपटाला इफ्फी मधील विशेष परीक्षक पुरस्कार, म्हणजेच अधिकृतरित्या रौप्य मयूर - विशेष परीक्षक पुरस्कार असे संबोधला जाणारा हा पुरस्कार देण्यात येतो. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देण्यात येणाऱ्या या पारितोषिकामध्ये रौप्य मयूर मानचिन्ह, 15,00,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र यांचा समावेश आहे.
परीक्षकांनी सांगितले, “वर्ष 1993 मध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या काळातील गोंधळाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जेव्हा अदम्य मानवी प्रेरणा हिंसक दडपशाहीविरोधात ठाम उभी राहिली, त्यावेळी घडताना दाखवलेल्या या कथेत फोलारीन त्याच्या दोन लहान मुलांना घेऊन, उशिरा झालेला पगार मिळवण्यासाठी लेगोस येथे जातो. हताश झालेले वडील आणि गोंधळात पडलेली, कधीकधी घाबरलेली मुले यांची ही उत्कृष्ट पटकथा आणि बहारदार अभिनय, आपल्याला प्रेम, पालकत्व, अभाव आणि सलोखा यांच्या संकल्पनांचे दर्शन घडवताना दिसतात. जिव्हाळ्याचे क्षण आणि छोट्या छोट्या कृती या चित्रपटाच्या स्नेहार्द आलिंगनाच्या केंद्रस्थानी आहेत.”
‘माय फादर्स शॅडो’ या चित्रपटाचा गौरव करून इफ्फी जागतिक कथाकथन आणि समकालीन चित्रपटांच्या सीमा ओलांडणाऱ्या चित्रपट निर्मात्यांची सर्जक ताकद यांच्या उल्लेखनीय कार्याचा उत्सव साजरा करत आहे.
‘माय फादर्स शॅडो’ची संक्षिप्त कथा

ही निम-आत्मचरित्रात्मक कथा 1993 च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या काळात, लेगोस या नायजेरियाच्या राजधानीत एका दिवसात घडणारी कथा आहे. हा चित्रपट अकीन आणि रेमी या दोन भावांची कथा सांगतो. त्यांच्यापासून वेगेळे झालेल्या त्यांच्या वडिलांचा, फोलारीनचा उशिरा झालेला पगार मिळवण्यासाठी गोंधळाच्या स्थितीत असलेल्या शहरात प्रवास करत या मुलांनी त्यांच्या वडिलांसोबत व्यतीत केलेला दिवस चित्रपटात बघायला मिळतो. राजकीय गोंधळाच्या स्थितीत, जिव्हाळ्याचे क्षण आणि छोट्या छोट्या कृती यांच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेम, अभाव आणि सलोखा यांच्या संकल्पनांचे वास्तववादी चित्रण करतो.
‘माय फादर्स शॅडो’च्या वार्ताहर परिषदेची लिंक:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | आशिष सांगळे/संजना चिटणीस/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2196324
| Visitor Counter:
6