वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतील अशा चहाच्या नवीन जाती विकसित कराव्या : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
28 NOV 2025 4:45PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे संकल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित सुरक्षित चहा उत्पादन या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. दार्जिलिंग, आसाम आणि निलगिरी यांसारख्या जगभरात दखल घेतल्या गेलेल्या अद्वितीय चहा उत्पादनासाठी भारत जगभरात ओळखला जातो. असे असतानाही देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीयोग्य उत्पादनांचा एक व्यापक संच निर्माण करण्याची गरज आहे, ही बाब त्यांनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केली.
भारताने आपल्या पारंपरिक सामर्थ्यापलीकडे जात, जगभरातील ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार, आरोग्य विषयक उदयोन्मुख कलांनुसार आणि प्रीमियम जीवनशैलीशी संबंधित बाजारपेठांच्या गरजा पुर्ण करू शकेल अशा स्वरुपातील चहाची नवी नवीन सिग्नेचर उत्पादने निर्माण करण्यावर भर दिला पाहीजे असे ते म्हणाले. उच्च प्रतीचा चहा आणि बाह्य अवशेषांची अत्यल्प पातळी राखण्यासाठी शाश्वत पद्धती, कामगार विषयक उत्तदरदायी मानके आणि सातत्यपूर्ण नवोन्मेषाची कास धरणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
निर्यातीच्या नव्या संधी निर्माण करू शकतील अशा नाविन्यपूर्ण जाती आणि उच्च मूल्यधारीत उत्पादने विकसित करण्यासाठी संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी भारताच्या कृषी हवामान विषयक वैविध्यपूर्ण क्षमतांचा लाभ घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी केले. अशा नवोन्मेषाधारीत मूल्यवर्धनामुळे या क्षेत्राच्या बाबतीत भारताच्या जागतिक स्तरावरील अस्तित्वाचा विस्तार होईल, आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना, विशेषत: लहान उत्पादकांना उत्तम परतावाही मिळू शकेल असे ते म्हणाले. सध्याच्या बहुआयामी जागतिक चहा उद्योग क्षेत्रात भारतीय चहा उत्पादने स्पर्धात्मक, वैशिष्ट्यपूर्ण आणि भविष्याच्यादृष्टीने सज्ज असलेली असावीत याची सुनिश्चिती करण्यासाठी सखोल संशोधन, प्रयोगशिलता आणि उत्पादनांचा विकास महत्त्वाचा असणार आहे असेही ते म्हणाले.
आज भारत दरवर्षी सुमारे 255 दशलक्ष टन इतके चहा उत्पादन निर्यात करतो. आज भारत जगातील सर्वात मोठा चहा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. भारताच्या आदरतिथ्य आणि व्यापार विषयक संस्कृतीत चहा उत्पादने अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. अशा उद्योग क्षेत्राचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. या परिषदेदरम्यान झालेल्या विचारमंथनातून , या उद्योग क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आपल्या मंत्रालयाला तसेच चहा मंडळालाही मौल्यवान मार्गदर्शक माहिती हाती लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चहा उत्पादकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. मात्र त्याचवेळी प्रभावी धोरणे तयार करण्यासाठी या क्षेत्राशी संबंधित भागधारक, संशोधक आणि या उद्योग क्षेत्रातील व्यक्तींकडून मिळणारी माहिती, सूचना आणि मार्गदर्शन खऱ्या अर्थाने मोलाचे आहे असे ते म्हणाले.
यावेळी गोयल यांनी नवोन्मेशी आणि शाश्वत शेती पद्धतींचा व्यापक अवलंब करावा असे आवाहनही केले. ठिबक सिंचनासारख्या पद्धतींमुळे पाण्याची कार्यक्षमता वाढू शकते, तसेच उत्पादकांच्या दृष्टीने एकूण उत्पादकतेतही लक्षणीयरीत्या सुधारणा घडून येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. चहा उत्पादकांना जागतिक पातळीवर पोहचता यावे यासाठी आपले मंत्रालय आणि चहा मंडळ व्यापार मेळावे, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि खरेदीदार-विक्रेता भेटी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाठबळ पुरवत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
अमृत काळात विकसित भारत 2047 चा संकल्प साकार करण्याच्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या वाटचालीत चहा उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
***
निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196163)
आगंतुक पटल : 8