पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
पंतप्रधानांनी केले स्कायरूटच्या पहिल्या उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या ॲर्बिटल रॉकेट विक्रम-I चे अनावरण
आपली युवाशक्ती, नवोन्मेष, जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकतेसह नवीन शिखरे गाठत आहे: पंतप्रधान
इस्रोने अनेक दशके भारताच्या अंतराळ प्रवासाला नवीन उंची गाठण्यासाठी बळ दिले आहे, आपली विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्याद्वारे भारताने जागतिक अंतराळ क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे: पंतप्रधान
मागील केवळ सहा ते सात वर्षांमध्ये , भारताने आपल्या अंतराळ क्षेत्राचे एका खुल्या, सहकारी आणि नवोन्मेष-संचालित परिसंस्थेत रूपांतर केले आहे: पंतप्रधान
जेव्हा सरकारने अंतराळ क्षेत्र खुले केले , तेव्हा आपले युवक आणि विशेषतः जनरेशन झेड संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुढे आले: पंतप्रधान
भारताकडे अंतराळ क्षेत्रात अशा क्षमता आहेत ज्या जगातील काही मोजक्या देशांकडे आहेत: पंतप्रधान
Posted On:
27 NOV 2025 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी भर दिला. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे यावर भर देत त्यांनी अधोरेखित केले की देशातील नवोन्मेष , युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येईल याचे प्रतिबिंब म्हणजे आजचा कार्यक्रम आहे असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांना शुभेच्छा दिल्या आणि नमूद केले की हे दोन्ही युवा उद्योजक देशभरातील असंख्य तरुण अंतराळ उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. दोघांनीही स्वतःवर विश्वास ठेवला, जोखीम घेण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि परिणामी आज संपूर्ण देश त्यांचे यश पाहत आहे आणि देशाला त्यांचा अभिमान वाटत आहे यावर त्यांनी भर दिला .
भारताचा अंतराळ प्रवास मर्यादित संसाधनांपासून सुरू झाला मात्र देशाच्या महत्त्वाकांक्षा कधीही मर्यादित नव्हत्या याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की सायकलवरून रॉकेटचे सुटे भाग घेऊन जाण्यापासून ते जगातील सर्वात विश्वासार्ह प्रक्षेपण वाहने विकसित करण्यापर्यंत भारताने हे सिद्ध केले आहे की स्वप्नांची उंची संसाधनांनी नव्हे तर दृढ संकल्पाने निश्चित केली जाते. “इस्रोने गेली अनेक दशके भारताच्या अंतराळ प्रवासाला भरारी घेण्यासाठी नवीन पंख दिले आहेत आणि विश्वासार्हता, क्षमता आणि मूल्य यांनी या क्षेत्रात भारताची वेगळी ओळख स्थापित केली आहे ”, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.
बदलत्या काळात, अंतराळ क्षेत्राचा विस्तार होणे क्रमप्राप्त आहे , कारण ते दळणवळण, शेती, सागरी देखरेख, शहर नियोजन, हवामान अंदाज आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया बनले आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, म्हणूनच भारताच्या अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या, सरकारने अंतराळ क्षेत्र खाजगी नवोन्मेषासाठी खुले केले आणि नवीन अंतराळ धोरण तयार केले. मोदी पुढे म्हणाले की, स्टार्टअप्स आणि उद्योगांना नवोन्मेषाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि स्टार्टअप्सना इस्रोच्या सुविधा आणि तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी इन -स्पेस ची स्थापना करण्यात आली. “गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताने आपले अंतराळ क्षेत्र एका खुल्या, सहकारी आणि नवोन्मेष संचालित परिसंस्थेत रूपांतरित केले आहे”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि आजचा कार्यक्रम या परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे असे सांगितले.
भारतातील तरुण नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देतात आणि प्रत्येक संधीचा सर्वोत्तम वापर करतात यावर भर देत मोदी म्हणाले की जेव्हा सरकारने अंतराळ क्षेत्र खुले केले तेव्हा देशातील तरुणांनी, विशेषतः जनरेशन झेड त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुढे आले. आज 300 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स भारताच्या अंतराळ भविष्याला नवीन आशा देत आहेत यावर त्यांनी भर दिला आणि नमूद केले की यापैकी बहुतेक स्टार्टअप्सची सुरुवात लहान टीमपासून झाली - कधीकधी दोन लोक, कधीकधी पाच, कधीकधी लहान भाड्याच्या खोलीत - मर्यादित संसाधने होती मात्र नवीन उंची गाठण्याचा दृढ निर्धार होता.
"याच भावनेने भारतातील खाजगी क्षेत्रातील अंतराळ क्रांतीला जन्म दिला आहे" असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जेन झी अभियंते, डिझाइनर्स, कोडर्स आणि वैज्ञानिक नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहेत, मग ते वैज्ञानिक प्रेरण प्रणाली असो, कंपोझिट साहित्य असो, रॉकेट स्टेजेस किंवा उपग्रह प्लॅटफॉर्म असोत. काही वर्षांपूर्वी अकल्पनीय वाटणाऱ्या क्षेत्रांमध्ये भारतातील युवक काम करत आहेत, यावरही त्यांनी भर दिला. भारतातील खाजगी अंतराळ प्रतिभा जगासमोर एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करत आहे आणि आज जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारताचे अंतराळ क्षेत्र हे एक आकर्षणाचे स्थान झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
जगभरातून लहान उपग्रहांसाठीची मागणी सातत्याने वाढत असल्याचे सांगून ते म्हणाले की उपग्रह प्रक्षेपणाच्या वारंवारतेत देखील वाढ झाली आहे. उपग्रह विषयक सेवा पुरवण्यासाठी नवनवीन कंपन्या या क्षेत्रात प्रवेश करत असून अंतराळ क्षेत्राने स्वतःला एक संरचनात्मक मालमत्ता म्हणून स्थापित केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. येत्या काही वर्षांत जागतिक अंतराळ अर्थव्यवस्था कित्येक पटींनी वाढ करण्यासाठी सज्ज असून ही स्थिती भारतीय युवकांसाठी असलेली उल्लेखनीय संधी दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
भारताकडे जगातील अत्यंत मोजक्या देशांकडे असलेली अंतराळ क्षेत्रातील क्षमता आहे, त्याचप्रमाणात तज्ञ अभियंते, उच्च दर्जाची उत्पादन परिसंस्था, जागतिक दर्जाची प्रक्षेपण केंद्रे आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणारी विचारसरणी देखील आहे, भारताची अंतराळ क्षमता कमी खर्चिक आणि विश्वासार्ह असून जगाला आपल्या देशाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. जागतिक कंपन्यांना भारतात उपग्रहांची निर्मिती करण्याची इच्छा आहे, भारतातीळ प्रक्षेपण केंद्रांचा लाभ घ्यायचा आहे आणि भारतासोबत तंत्रज्ञानातील भागीदारी करायची इच्छा आहे त्यामुळे देशाने या संधींचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा, असे पंतप्रधानांनी सांगितले.
अंतराळ क्षेत्रात होणाऱ्या या सुधारणा भारतात व्यापक स्तरावर होत असलेल्या क्रांतीचे द्योतक आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षांत फिनटेक, ऍग्रीटेक, हेल्थटेक, क्लायमेट टेक, एड्युटेक आणि डिफेन्स टेक या क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सची नवीन लाट उसळली आहे, भारताच्या युवावर्गाच्या विशेषतः जेन झी च्या सहाय्याने या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय प्रदान केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. भारताच्या जेन-झी पिढीचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की त्यांची सर्जनशीलता, सकारात्मक दृष्टीकोन आणि क्षमता-वृद्धीची ताकद ही जगातील जेन-झी पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरू शकते. भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनला आहे. एक काळ असा होता की स्टार्टअप्स या केवळ देशातील मोठ्या शहरांपुरत्या मर्यादित होत्या मात्र आता गावांमधून आणि लहान शहरांमधूनही स्टार्टअप्स उदयाला येत आहेत, असे ते म्हणाले. ते म्हणाले की देशात आता 1.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत आणि त्यापैकी अनेकांनी युनिकॉर्न दर्जा मिळवला आहे.
भारत आता फक्त अॅप्स आणि सेवांपुरता मर्यादित नसून डीप-टेक, उत्पादन क्षेत्र आणि हार्डवेअर नवोन्मेषाकडे जलदगतीने आगेकूच करत आहे, यावर भर देत पंतप्रधानांनी जेन-झी पिढीचे आभार मानले. यासंदर्भात त्यांनी सेमी कंडक्टर क्षेत्राचे उदाहरण दिले. केंद्र सरकारने या क्षेत्राला बळकट करण्यासाठी घेतलेल्या ऐतिहासिक पावलांमुळे भारताच्या टेक अर्थात तंत्रज्ञान भविष्याचा पाया मजबूत होत आहे, असे ते म्हणाले. देशभरात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट्स, चिप उत्पादन केंद्रे आणि डिझाइन हब विकसित होत आहेत, आणि चिपपासून ते सिस्टमपर्यंत भारत एक मजबूत इलेक्ट्रॉनिक्स मूल्य साखळी उभारत आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले. हा केवळ आत्मनिर्भर भारताच्या निर्धाराचा एक भाग नाही तर त्यामुळे भारत जागतिक मूल्य साखळीचा एक भक्कम आणि विश्वासार्ह स्तंभ म्हणून उदयाला येत आहे, असे ते म्हणाले.
देशामध्ये बदलांचा आवाका सातत्याने वाढत असून ज्याप्रमाणे अंतराळ क्षेत्रातील नवोन्मेष खाजगी क्षेत्रासाठी खुला करण्यात आला आहे, त्याप्रमाणे भारत आता अणुऊर्जा क्षेत्र देखील खुले करण्याकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या क्षेत्रात खाजगी क्षेत्राची मजबूत भूमिका निर्माण केली जात असून त्यामुळे लहान मॉड्युलर रिॲक्टर्स, प्रगत रिअॅक्टर्स आणि आण्विक नवोन्मेष यांमध्ये संधी निर्माण होतील. या सुधारणेमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला आणि तांत्रिक नेतृत्वाला नवी ताकद मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
सध्या होत असणाऱ्या संशोधनावर भविष्य अवलंबून असेल यावर भर देत, पंतप्रधानांनी अधोरेखित केले, सरकार तरुणांना संशोधनात जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आधुनिक संशोधनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनच्या स्थापनेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि “एक राष्ट्र, एक सदस्य”या उपक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमधून प्रवेश करणे सोपे झाले आहे असे त्यांनी नमूद केले.एक लाख कोटी रुपयांचा संशोधन, विकास आणि नवोन्मेष निधी देशभरातील तरुणांना संशोधन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आधार देईल, असे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि नवोन्मेषाची भावना निर्माण करण्यासाठी10,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब्सची स्थापना करण्यात आली आहे, आणि येत्या काळात 50,000 नवीन लॅब्स स्थापन करण्याचे काम सुरू असल्याचेही मोदी म्हणाले. हे प्रयत्न भारतातील नवोपक्रमांचा पाया रचत आहेत,यावर त्यांनी जोर दिला आणि येणारे युग भारताचे, त्याच्या तरुणाईचे आणि त्यांच्या नवोपक्रमांचे आहे असे त्यांनी घोषित केले.
काही महिन्यांपूर्वी, अंतराळ दिनानिमित्त, आपण भारताच्या अंतराळ आकांक्षांबद्दल बोलल्याचे त्यांनी स्मरण करून दिले आणि पुढील पाच वर्षांत भारत आपली प्रक्षेपण क्षमता नवीन उंचीवर नेईल आणि अंतराळ क्षेत्रात पाच नवीन युनिकॉर्न तयार करेल याचा पुनरुच्चार केला.स्कायरूट टीमच्या प्रगतीमुळे भारताने निश्चित केलेले प्रत्येक ध्येय साध्य होईल याची खात्री वाटते, असे त्यांनी नमूद केले.
प्रत्येक तरुण, प्रत्येक स्टार्टअप, शास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योजक यांना पंतप्रधानांनी आश्वासन दिले, की सरकार प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहे. त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण स्कायरूट टीमचे अभिनंदन केले आणि भारताच्या अंतराळ प्रवासाला नवीन गती देणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. एकविसावे शतक पृथ्वीवर असो किंवा अवकाशात, हे भारताचे शतक असेल असा निश्चय करण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी या कार्यक्रमाला इतर मान्यवरांसह उपस्थित होते.
पार्श्वभूमी
भारतीय अंतराळ स्टार्टअप स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस, हे एक अत्याधुनिक अंतराळ सुविधा केंद्र आहे जे सुमारे 200,000 चौरस फूटांपर्यंत विस्तारलेले आहे. त्यामध्ये अनेक प्रक्षेपण वाहनांची रचना, विकास, एकत्रीकरण आणि चाचणी करण्याची सुविधा असून त्यात दरमहा एक ऑर्बिटल रॉकेट तयार करण्याची क्षमता आहे.पवन चंदना आणि भरत ढाका ,हे दोघेही भारतीय तंत्रज्ञान संस्थांचे माजी विद्यार्थी आणि इस्रोचे माजी शास्त्रज्ञ असून आता ते उद्योजक बनले आहेत. स्कायरूट ही त्यांनी स्थापन केलेली खाजगी अंतराळ कंपनी, असून भारतातील आघाडीची कंपनी आहे.नोव्हेंबर 2022 मध्ये, स्कायरूटने त्यांचे सब-ऑर्बिटल रॉकेट, विक्रम-एस प्रक्षेपित केले, ज्यामुळे अवकाशात रॉकेट प्रक्षेपण करणारी ही पहिली भारतीय खाजगी कंपनी बनली आहे.
खाजगी अंतराळ उद्योगांचा झपाट्याने होणारा उदय हा गेल्या काही वर्षांत सरकारने केलेल्या परिवर्तनकारी सुधारणांच्या यशाचे उत्तम उदाहरण आहे, ज्यामुळे भारताची प्रतिमा एक सक्षम जागतिक अंतराळ शक्ती आणि आश्वासक नेतृत्व म्हणून बळकट होत आहे.
गोपाळ चिपलकट्टी/सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195346)
Visitor Counter : 12