इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) दोन कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक केले निष्क्रिय


उपक्रमासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण भारताचे महानिबंधक, राज्ये आणि विविध केंद्रीय सरकारी विभागांकडून घेतली माहिती

myAadhaar पोर्टलद्वारे नातेवाईकांच्या मृत्यूची माहिती देण्याची सुविधा

Posted On: 26 NOV 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने, आधार माहिती साठ्यात सातत्यपूर्ण अचूकता राखण्यासाठीच्या देशव्यापी स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून, मृत पावलेल्या दोन कोटींपेक्षा जास्त मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत.

भारतीय महानिबंधक, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस), राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम यासह इतर अनेक ठिकाणांहून विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मृत व्यक्तींची माहिती मिळवली आहे. मृत व्यक्तींची माहिती प्राप्त करण्यासाठी प्राधिकरणाने वित्तीय संस्था आणि अशा इतर संस्थांसोबतही सहकार्यपूर्ण भागिदारींचे नियोजन केले आहे.

प्रत्येक आधार क्रमांक, पुन्हा कधीच दुसऱ्या व्यक्तीला वितरीत केला जात नाही. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, व्यक्ती ओळखीसंदर्भातील फसवणूक टाळण्यासाठी, तसेच कल्याणकारी लाभांसाठी अशा आधार क्रमांकाचा अनधिकृत वापर टाळण्यासाठी तो आधार क्रमांक निष्क्रिय करणे आवश्यक असते.

या वर्षाच्या सुरुवातीला विशिष्ट ओळख प्राधिकरणाने नागरिक नोंदणी प्रणाली वापरणाऱ्या सध्याच्या 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकरता, ज्या मृत्यूंची नोंद झाली आहे, त्याबाबत माहिती मिळवता यावी यासाठी, myAadhaar या पोर्टलवर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची माहिती देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे या पोर्टलसोबत एकात्मिकरण करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.

कुटुंबातील सदस्याने स्वतःची सत्यापन केल्यानंतर, पोर्टलवर मृत व्यक्तीचा आधार क्रमांक आणि मृत्यू नोंदणी क्रमांक यासह इतर जनसांख्यिकीय तपशील देणे गरजेचे असते. कुटुंबातील सदस्याने सादर केलेल्या माहितीचे सत्यापन करण्यासाठीची योग्य प्रक्रिया पार पडल्यानंतर, मृत व्यक्तीचा आधार क्रमांक निष्क्रिय करण्यासंबंधी किंवा पुढची इतर कार्यवाही केली जाते.

आधार क्रमांक धारकांनी मृत्यू नोंदणी प्राधिकरणांकडून मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची माहिती myAadhaar पोर्टलवर द्यावी असे आवाहनही विशिष्ट ओळख प्राधिकरणाने केले आहे.

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2194967) Visitor Counter : 5