कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वर्ष 2025-26 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचे पहिले अग्रिम अंदाज केले जाहीर


प्रमुख पिकांच्या उत्पादनात विक्रमी वाढ, अन्नधान्याच्या एकूण उत्पादनात 3.87 दशलक्ष टन इतकी वाढ - शिवराज सिंग चौहान

वर्ष 2025-26 च्या खरीप हंगामात 173.33 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज - शिवराज सिंह चौहान

Posted On: 26 NOV 2025 7:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वर्ष 2025-26 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचे पहिले अग्रिम अंदाज जाहीर केले आहेत. त्यानुसार प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनात विक्रमी वाढ अपेक्षित असून अन्नधान्याच्या एकूण उत्पादनात 3.87 दशलक्ष टन इतकी वाढ होऊन खरीप हंगामात 173.33 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. खरीप तांदूळ आणि मक्याचे चांगले उत्पादन अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्राचा सातत्याने विकास होत आहे, असे चौहान यांनी सांगितले.

देशाच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांवर परिणाम झाला असला तरी चांगल्या मौसमी पावसामुळे बहुतेक भागांना लाभ झाला आहे, त्यामुळे एकूण अन्नधान्य उत्पादन चांगले होईल, असे ते म्हणाले. वर्ष 2025-26 मध्ये खरीप तांदळाचे एकूण उत्पादन 124.504 दशलक्ष टन अंदाजित असून गेल्या वर्षीच्या खरीप तांदळाच्या उत्पादनापेक्षा ते 1.732 दशलक्ष टन अधिक आहे. खरीप मक्याचे उत्पादन 28.303 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षीच्या खरीप मक्याच्या उत्पादनापेक्षा 3.495 दशलक्ष टन जास्त आहे.

केंद्रीय कृषी मंत्री पुढे म्हणाले की, सुरवातीस आलेल्या अग्रिम अंदाजानुसार, 2025-26 साठी खरीपातील भरड धान्यांचे एकूण उत्पादन 41.414 दशलक्ष टन तर डाळींचे खरीप उत्पादन एकूण 7.413 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे. यामध्ये, तूर (अरहर) डाळीचे उत्पादन 3.597 दशलक्ष टन, उडीद डाळीचे 1.205 दशलक्ष टन आणि मूग डाळीचे 1.720 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. 2025-26 साठी देशात एकूण खरीप तेलबियांचे उत्पादन 27.563 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.यामध्ये शेंगदाण्याचे (भुईमूग) उत्पादन 11.093 दशलक्ष टन आहे, जे गत वर्षीपेक्षा 0.681 दशलक्ष टनांनी जास्त आहे आणि सोयाबीनचे उत्पादन 14.266 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे.उसाचे उत्पादन 475.614 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 21.003 दशलक्ष टनांची वाढ दर्शवते. कापसाचे उत्पादन 29.215 दशलक्ष गाठी (प्रत्येक गाठ 170 किलोग्रॅम वजनाची) आणि ‘पॅटसन’ आणि ‘मेस्टा’ या धाग्यांचे उत्पादन 8.345 दशलक्ष गाठी (प्रत्येकी गाठी.. किलोग्रॅम वजनाची) होण्याचा अंदाज आहे.

हे अंदाज मागील वर्षातील उत्पन्नाचे कल, इतर भू-स्तरीय आधार, प्रादेशिक निरीक्षणे आणि प्रामुख्याने राज्यांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहेत. प्रत्यक्ष पीक कापणीनंतर उत्पन्नविषयी डेटा उपलब्ध झाल्यावर यात सुधारणा केल्या जातील.

संपूर्ण अंदाज पुढील पोर्टलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत

[upag.gov.in].

 

सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2194917) Visitor Counter : 11