बॉन्ड आणि बॅटमॅनच्या जबरदस्त यशामागील SFX उस्ताद क्रिस कॉर्बोल्ड यांनी इफ्फीमध्ये आपल्या कलेबाबत मोकळेपणाने साधला संवाद
सिंकिंग पलाझो, हॉलवे फाईट आणि आयकॉनिक ट्रक फ्लिप हे चित्रपटांचे प्रेक्षकांसमोर विश्लेषण करण्यात आले
कॉर्बोल्ड यांनी राजामौलींच्या चित्रपटांबद्दल भाष्य केले, त्यांच्या चित्रपटांमधील दृश्यांच्या सौंदर्याचे केले कौतुक
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2025
कला अकादमीच्या खचाखच भरलेल्या हॉलमध्ये, अकादमी पुरस्कार विजेते आणि स्पेशल इफेक्ट्समधील निपुण क्रिस्टोफर चार्ल्स कॉर्बोल्ड ओ बी ई यांनी आज दुर्मिळ सिनेमॅटिक अनुभव सादर केला. मुलाखत सत्रात कॉर्बोल्ड यांनी सिनेमातील दृश्यांच्या बारकाव्याबाबत सखोल चर्चा केली, जेम्स बाँडचे जग उडवून देणाऱ्या, बॅटमॅनचा ट्रक उलटवणाऱ्या आणि क्रिस्टोफर नोलनसाठी भौतिकशास्त्राचे नियम बदलवणाऱ्या माणसाशी संवाद साधण्याची संधी प्रेक्षकांना दिली. 'फ्रॉम बॉन्ड टू बॅटमॅन: SFX, स्टंट्स अँड स्पेक्टेकल' शीर्षकाच्या मुलाखत सत्रात अनेक दशकांच्या चित्रपट निर्मितीच्या कल्पकतेचा एक शानदार आणि रोमांचक प्रवास सादर करण्यात आला.
या सत्राची सुरुवात चित्रपट निर्माते रवी कोट्टारक्करा यांनी खोडकर अंदाजात आपला फोन उचलून बॉन्ड थीम वाजवून केली. ते म्हणाले की,15 बॉन्ड चित्रपटांमागील आख्यायिका ओळखण्यासाठी ही एक धून पुरेशी आहे. त्यानंतर त्यांनी बॅटमॅनच्या तीन चित्रपटांमधील स्पेशल इफेक्ट्स आणि अकादमी पुरस्कार विजेत्या 'इन्सेप्शन' मध्ये महत्वपूर्ण योगदान बजावणाऱ्या कॉर्बोल्ड यांना सन्मानित केले. प्रसिद्ध समीक्षक नमन रामचंद्रन यांनी याचे सूत्रसंचालन केले. या संभाषणाने लगेच उत्कंठावर्धक वातावरण निर्माण केले जे उत्सुकता, उत्साह आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या अनोख्या कथांनी भारलेले होते.

त्यांच्या कलाकृतीच्या मार्गदर्शक तत्वज्ञानाबद्दल विचारले असता, कॉर्बोल्ड यांनी विनासंकोच उत्तर दिले: “मी नेहमीच शक्य तितके व्यावहारिकपणे काम करतो.” त्यांनी व्यावहारिक आणि डिजिटल प्रभावांमधील संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण सांगितली , परंतु दोन्ही टीम आता एकमेकांना सुंदरपणे पूरक बनायला शिकल्या आहेत, हे देखील स्पष्ट केले. “दोन्ही विभागांना जाणवले की ते एकमेकांना मदत करू शकतात,”असे सांगून ते म्हणाले की आजचे सर्वोत्तम सिनेमॅटिक क्षण ते आहेत जे दोघांच्याही सहज मिश्रणातून साकारले आहेत.
नोलन स्कूल ऑफ प्रिसिजनमधील यथार्थ
क्रिस्टोफर नोलनसोबत चार चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, कॉर्बोल्ड यांनी दिग्दर्शक म्हणून नोलन यांच्या वास्तविक घटकांवरील अतूट विश्वासाचा उल्लेख केला. जेव्हा शक्य असेल तेव्हा, नोलन यांनी व्यावहारिक अंमलबजावणीवर विश्वास दाखवला होता : खऱ्या गाड्या ,खरे अपघात, खऱ्या संरचना यांचा समावेश होता. “आम्ही ते प्रथम प्रत्यक्ष चित्रित करतो . नंतर ते अधिक चांगले करण्यासाठी डिजिटल टीम काम करते ,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या दरम्यान प्रेक्षकांना 'कॅसिनो रोयाल ' मधील बुडणाऱ्या पॅलाझोपासून, 'इन्सेप्शन' मधील हॉलवे लढाई, 'द डार्क नाईट' मधील अविस्मरणीय ट्रक फ्लिपपर्यंत, दृश्यांच्या आणि पडद्यामागील व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या. प्रत्येक क्लिपने विशाल रस्सी डिझाइन करणे, फिरणारे कॉरिडॉर बांधणे, अचूक मार्गांवर जाण्यासाठी हेलिकॉप्टर प्रोग्राम करणे आणि धाडसी स्टंटसाठी वाहने तयार करणे यासारखे तपशीलवार किस्से उलगडून सांगितले.
इन्सेप्शन हॉलवे फायटिंग सिन बद्दल, कॉर्बोल्ड म्हणाले: "मी आधी रिव्हॉल्व्हिंग रूम केली होती , परंतु यासाठी लांब कॉरिडॉरची आवश्यकता होती. प्रति मिनिट तीनपेक्षा जास्त रिव्होल्यूशनमुळे कोणीतरी पडू शकते. नोलनला याचा वेग वाढवायचा होता आणि कसे तरी, आम्ही ते काम केले." डार्क नाईट ट्रक फ्लिपबद्दल तो हसत म्हणाला : "मी त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला की आपण खरा ट्रक उलटवू शकत नाही. पण नोलन याने ऐकले नाही आणि शेवटी, आम्ही खरा ट्रक उलटवला ."
अचूकता, चाचणी आणि सुरक्षितता सर्वोपरि
पडद्यावरील प्रत्येक अद्भुत क्षणामागे असंख्य तासांची बारकाईने केलेली तयारी असते यावर कॉर्बोल्ड यांनी भर दिला. "आम्ही आमच्या सिस्टीमची किमान २५ वेळा चाचणी करतो. आम्ही प्रत्येक संभाव्य त्रुटी, प्रत्येक आकस्मिकतेचा विचार करतो," असे तो म्हणाला. कलाकारांच्या सुरक्षिततेबद्दल, तो अढळ होता: "मला माझे कलाकार सहज आणि आत्मविश्वास भरलेले हवे आहेत . आम्ही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामासाठी अंतर्गत भागांमध्ये व्यवस्था करतो , वाहनांमध्ये अग्निसुरक्षा प्रणाली बसवतो."
त्याने त्याच्या सेटवर अनेक विभागांमध्ये समन्वय कसा अनिवार्य आहे हे विस्तृतपणे सांगितले. "प्रत्येकजण एकत्र बसतात. कुणालाही कसलेही आश्चर्य वाटू नये. प्रत्येकाला नेमके काय घडेल हे माहित असले पाहिजे." नियंत्रित स्फोटांचे वर्णन करताना कॉर्बोल्डचे डोळे चमकले, जे त्याच्या दीर्घकालीन इच्छांपैकी एक आहे. "सर्व काही मिलिसेकंदांमध्ये निश्चित केले जाते. संगणकीकृत स्फोट प्रणाली प्रत्येक स्फोट त्या क्षणी अचूकपणे ट्रिगर करते, जेव्हा तो व्हायला हवा. "
डिजिटल तंत्रज्ञान, राजामौली आणि भविष्य याबाबत
प्रामाणिकपणे बोलताना, कॉर्बोल्डने आठवण सांगितली की त्यांना एकेकाळी डिजिटल इफेक्ट्समुळे आपले काम कालबाह्य होईल अशी भीती वाटत होती. "ते घडले नाही, कारण डिजिटल हे एक साधन असले पाहिजे, संपूर्ण प्रक्रिया नाही," असे तो म्हणाला. त्याने भारतीय चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली यांचे कौतुक केले, त्यांचे चित्रपट "पाहण्यास अद्भुत" वाटते असे म्हटले आणि आगामी चित्रपट 'वाराणसी' बद्दल उत्साहाने विचारले.

त्यांनी असेही उघड केले की तो आता दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एसएफएक्स देखरेखीपासून दूर गेला आहे आणि भारतात घडणाऱ्या कथा सांगायला त्याला आवडेल. समारोप करताना कॉर्बोल्डने महत्त्वाकांक्षी निर्मात्यांसाठी संदेश दिला : "व्यावहारिक प्रभाव कायम राहतील. प्रत्येक अडथळ्यावर मात करणे आणि दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाला जिवंत करणे आणि ते देखील परिस्थिती तुमच्या विरोधात असताना, हा एक सुखद अनुभव आहे."
सत्रातून जे समोर आले ते केवळ प्रतिष्ठित स्टंटचा उत्सव नव्हता, तर अंतःप्रेरणा, यांत्रिकी, सहकार्य आणि सर्जनशीलता एकत्र येऊन अविस्मरणीय सिनेमॅटिक क्षण कसे निर्माण करतात याचा विचारपूर्वक शोध होता. कशा प्रकारे आपल्या मर्यादा ओलांडून, चित्रपट इतिहासातील काही सर्वात प्रतिष्ठित क्षण कसे तयार केले गेले हे पाहण्याची इफ्फीच्या प्रेक्षकांसाठी ही एक दुर्मिळ संधी होती.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194842
| Visitor Counter:
4