युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

26 नोव्हेंबर रोजी सरदार @150 युनिटी मार्च राष्ट्रीय पदयात्रा होणार सुरू

Posted On: 25 NOV 2025 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (MYAS), माय भारत माध्यमातून, 26 नोव्हेंबर रोजी वल्लभ विद्यानगर येथील शास्त्री मैदानातून सरदार @150 युनिटी मार्च ही राष्ट्रीय पदयात्रा सुरू करणार आहे. हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात उभ्या राहिलेल्या ऐक्याभिमुख चळवळीला मिळालेल्या गतीवर आधारित, ही राष्ट्रीय पदयात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित एक सर्वव्यापी चळवळीचा शिरोबिंदू आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या राष्ट्रीय पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला जाईल.

देशभरातील या कार्यक्रमापूर्वी आयोजित उपक्रमांमुळे या पदयात्रेला देशभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रीय पदयात्रेची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:00 वाजता सरदार पटेल यांच्या करमसद येथील वडिलोपार्जित निवासस्थानी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर वल्लभ विद्यानगर येथील शास्त्री मैदान येथे सरदार सभा होणार आहे. या वेळी नेते, विद्वान आणि युवा प्रतिनिधी सरदार पटेल यांच्या नेतृत्वाची शाश्वत प्रासंगिकता अधोरेखित करतील. दुपारी 12:00 वाजता पदयात्रेला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला जाईल. या कार्यक्रमातून केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत सुमारे 180 किमी अंतराच्या 11 दिवसांच्या प्रवासाची सुरुवात होईल.

या पदयात्रेच्या संपूर्ण मार्गावर 150 संकल्पनात्मक थांबे असतील, जेथे प्रदर्शन, स्थानिक हस्तकला, कलाकुसर, सरकारी योजना आणि माय भारत स्वयंसेवकांच्या नेतृत्वाखालील संवादात्मक सत्रे आयोजित केली जातील. दररोज होणाऱ्या ‘सरदार गाथा’ सत्रांमध्ये सरदार पटेल यांच्या जीवनातील प्रसंगांचे वर्णन केले जाईल, ज्यातून इतिहासाचे स्मरण आणि नागरिकांच्या आधुनिक कर्तव्यांची सांगड घातली जाईल. ग्रामसभा, स्वच्छता मोहीम, एक पेड माँ के नाम या सारख्या उपक्रमाद्वारे आणि इतर जागरूकता मोहीमांद्वारे समाज सहभाग बळकट केला जाईल, ज्यामुळे पदयात्रेचा सेवाभावाचा आणि स्वदेशी तत्त्वांचा संदेश अधिक दृढ होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत राहून, सहभागींना खादीचा अंगीकार आणि स्थानिक कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. पदयात्रा मार्गावरील स्वदेशी स्टॉल, महिला बचत गट आणि तरुण नवोन्मेषक आत्मनिर्भर भारताच्या भावनेला चालना देतील, ज्यामुळे ही पदयात्रा इतिहासाचा सन्मान करते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ देते.

पदयात्रेचा समारोप 6 डिसेंबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे राष्ट्रीय सोहळ्याने होईल, जिथे पदयात्री सरदार वल्लभभाई पटेल यांना सामुहिक आदरांजली अर्पण करतील. 562 संस्थानांचे एकत्रीकरण करून आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या सरदार पटेल यांच्या नेतृत्वाचे दर्शन याप्रसंगी घडवले जाईल.

राष्ट्रीय पदयात्रेचे संपूर्ण तपशील – मार्ग नकाशे, वेळापत्रक आणि स्वयंसेवकांची माहिती माय भारत पोर्टलवरील Sardar@150 Unity March (https://mybharat.gov.in/) विभागात उपलब्ध आहे. ज्यामुळे देशभरातील तरुण ‘एक भारत, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत’ या आदर्शांना माहितीपूर्ण, सक्रिय आणि जबाबदार नागरी सहभागाद्वारे पुढे नेण्यास सक्षम होतील.

 

निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2194380) Visitor Counter : 5