संरक्षण मंत्रालय
आयएनएस माहेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश- भारताच्या पहिल्या माहे श्रेणीतील उथळ पाण्यात संचारक्षम पाणबुडीविरोधी युद्धनौका वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये दाखल
Posted On:
24 NOV 2025 5:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
स्वदेशी बनावटीची रचना असलेली आणि उभारणी करण्यात आलेली भारताची पहिली माहे श्रेणीतील माहे ही उथळ पाण्यात संचारक्षम (एएसडब्लू) पाणबुडीविरोधी युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या गोदीत भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात एका समारंभात दाखल केली.
लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी वेस्टर्न नेव्हल कमांडचे ध्वजाधिकारी कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मलबारच्या किनारपट्टीवरील माहे या ऐतिहासिक किनारी शहराच्या नावावरून या युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे.
आयएनएस माहे ही तिच्या श्रेणीतील आठ युद्धनौकांपैकी पहिली युद्धनौका असून तिची रचना आणि बांधणी कोचीच्या कोचीन शिपयार्डने केली आहे.बीईएल, एल अँड टी डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स, एनपीओएल आणि 20 पेक्षा जास्त सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांचा या प्रकल्पाच्या उभारणीत सहभाग असून भारताच्या नाविक रचना, सामग्री आणि प्रणाली एकात्मिकरणाच्या विस्तारणाऱ्या परिसंस्थेला हा प्रकल्प बळकटी देत आहे. आत्मनिर्भर भारताचे आयएनएस माहे हे एक तेजस्वी प्रतीक आहे. या युद्धनौकेतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची असल्याने, देशातच विकसित होणारे नवोन्मेषी तंत्रज्ञान आणि समस्यांवरील उपाययोजना यांच्या माध्यमातून स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदलाकडून सातत्याने होणाऱ्या प्रयत्नांना या युद्धनौकेची उभारणी अधोरेखित करत आहे.
आयएनएस माहे नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेला, विशेषत: किनारपट्टीच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी, महत्त्वपूर्ण बळ मिळाले आहे. या युद्धनौकेमधील युद्ध प्रणालीच्या संचात अनेक प्रणालींचे सुटसुटीत परंतु शक्तिशाली जाळे तयार करण्यात आले आहे. तिची रचना विशेषत्वाने किनारी आणि उथळ पाण्यामध्ये पाणबुडीविरोधी ऑपरेशनसाठी करण्यात आली आहे. अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि दळणवळण प्रणालींनी सुसज्ज असलेले हे जहाज अचूकतेने पाण्याखालील धोके शोधण्यात, मागोवा घेण्यात आणि ते निष्प्रभ करण्यासाठी सक्षम आहे. हे जहाज उथळ पाण्यामध्ये दीर्घकाळ टिकून राहात सागरी मोहिमांमध्ये काम करू शकते आणि त्यात तांत्रिकदृष्ट्या प्रगत यंत्रसामग्री आणि नियंत्रण प्रणालींचा समावेश आहे.
आयएनएस माहेचे लोकार्पण केवळ एका नवीन शक्तिशाली सागरी मंचाच्या आगमनाचे प्रतीकच नाही, तर स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतागुतीची रचना असलेल्या युद्धनौकांची रचना आणि उभारणी करून त्यांचा प्रभावी वापर करण्याची भारताची वाढती क्षमता देखील दर्शवत आहे, यावर या समारंभाला संबोधित करताना, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भर दिला.
या जहाजाच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची सागरी भागांजवळ प्रभुत्व सुनिश्चित करण्याची, किनारी सुरक्षा जाळे मजबूत करण्याची आणि किनारपट्टीच्या भागात भारताच्या सागरी हितसंबंधांचे रक्षण करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, असे त्यांनी अधोरेखित केले.
सशस्त्र दलांची ताकद जमीन, समुद्र आणि वायू या तिन्ही क्षेत्रांमध्ये समन्वय साधण्यात आहे, कारण भविष्यातील संघर्ष हे बहु-क्षेत्रीय असतील आणि त्यासाठी एकत्रित राष्ट्रीय प्रयत्नांची आवश्यकता असेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ऑपरेशन सिंदूरचा संयुक्ततेचा एक आदर्श मोहीम म्हणून दाखला देत, त्यांनी जगभरातील आपत्कालीन मदत आणि बचाव तसेच सागरी आणि जमीन या दोन्ही ठिकाणावरील मोहिमांमध्ये लष्कर आणि नौदलाच्या दीर्घकाळ चाललेल्या भागीदारीवरही प्रकाश टाकला.
माहे-श्रेणीच्या नौका किनारी संरक्षणाची पहिली फळी तयार करतील, ज्यांचे भारताच्या सागरी कार्यक्षेत्रावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी मोठा पृष्ठभाग असलेली लढाऊ जहाजे, पाणबुड्या आणि हवाई प्रणालींसह अखंडपणे एकात्मिकरण करता येईल. आयएनएस माहे, विकसित समृद्ध भारतासाठी सागराचे रक्षण करत असताना लढाईसाठी सज्ज, एकसंध आणि आत्मनिर्भर या भारतीय नौदलाच्या संकल्पाची पुष्टी करत आहे.
(1)30EK.jpeg)
(14)VRHT.jpeg)
(12)20PQ.jpeg)
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193633)
Visitor Counter : 24