56 व्या इफ्फीमध्ये 'सु फ्रॉम सो', 'मालिपुट मेलडीज' आणि 'बिये फिये निये' या चित्रपटांनी भरले वैविध्यपूर्ण प्रादेशिक रंग
अंधश्रद्धांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याच्या वृत्तींविरुद्ध 'सु फ्रॉम सो'ने एक प्रखर संदेश
ग्रामीण ओदिशाच्या कथा, संस्कृती आणि लोकांना 'मालिपुट मेलडीज'ने दिली मानवंदना
'बिये फिये निये' मध्ये भारतीय विवाहसमारंभांचे मूक वास्तव आणि शहरी मध्यमवर्गाचे गुंतागुंतीचे प्रश्न यांचे प्रतिबिंब
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2025
56 व्या इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा फिचर फिल्म विभागात प्रदर्शित झालेल्या तीन प्रादेशिक फिचर फिल्म्समुळे भारताचे भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्य जणू पुन्हा साजरे झाले. यात कन्नड चित्रपट 'सु फ्रॉम सो', ओडिया चित्रपट 'मालिपुट मेलडीज' आणि बंगाली चित्रपट 'बिये फिये निये' यांचा समावेश आहे. शनिवारी गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अंधश्रद्धा आणि स्त्रियांचे प्रश्न विनोदाच्या अंगाने हाताळणारा कन्नड चित्रपट 'सु फ्रॉम सो'
'सु फ्रॉम सो' चित्रपट दाखवून झाल्यावर दिग्दर्शक प्रकाश (जेपी तुमिनाड) आणि अभिनेता शनील गौतम यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुळू नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी असलेल्या प्रकाश यांनीच, या चित्रपटाची पटकथा लिहिली असून ती त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांवर बऱ्यापैकी आधारित आहे, असं त्यांनी सांगितले. झपाटलेपणाचे नाटक करणारे मध्यवर्ती पात्र- अशोक- त्यांच्या बालमित्रावरून बेतलेले आहे. गंभीर सामाजिक प्रश्न विनोदामध्ये आणि मनोरंजनामध्ये मिसळून मांडल्याने प्रेक्षकांशी अधिक चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात, असे प्रकाश यांनी सांगितले. अंधश्रद्धांवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याच्या वृत्तीविरुद्ध 'सु फ्रॉम सो' एक प्रखर संदेश देतो. प्रकाश यांनी स्वतःच्या गावात असे अनेक प्रकार बघितल्याने त्यांना त्याबद्दल आतून कळवळा आहे. हा चित्रपट स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दलही प्रश्न विचारतो आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याबद्दलची जबाबदारी नेमकी कोणाची- कुटुंबाची की साऱ्या समाजाची- असा सवाल या चित्रपटातून समोर येतो.
गावचा नायक रवी अण्णा याची भूमिका वठवणाऱ्या शनील गौतम या अभिनेत्याने सांगितले की- अंधश्रद्धांना बळी पडू नये यासाठी हा चित्रपट प्रेक्षकांच्या विचारांना चालना देतो. तर पटकथेवर शैलीच्या दृष्टीने मल्याळी चित्रपटाचा प्रभाव असल्याचे प्रकाश यांनी सांगितले. त्यांच्या सर्जनशील दृष्टिकोनाला मल्याळी चित्रसृष्टीने आकार दिल्याचेही ते म्हणाले.

ओडिया चित्रपट 'मालिपुट मेलडीज'-: ग्रामीण कोरापूत मधील कथा-कहाण्यांचा संग्रह
विशाल पटनायक दिग्दर्शित आणि कौशिक दास निर्मित ओडिया चित्रपट 'मालिपुत मेलडीज' हाही चित्रपट शनिवारी दाखवला गेला. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत चित्रपटाबद्दल संवाद साधण्यात आला. मूळचे कोरापूत जिल्ह्यातले पटनायक म्हणाले की- हा चित्रपट म्हणजे ग्रामीण ओदिशाच्या कथा, संस्कृती आणि लोकांना दिलेली मानवंदना आहे. कोरापूतमधील कथनावर आधारित कथा-कहाण्यांचा संग्रह असे स्वरूप देण्याची कल्पना कशी पुढे आली, याबद्दल सांगताना - "आम्हाला आमच्या कथा-कहाण्या सांगायच्या होत्या." अशी भूमिका त्यांनी मांडली. स्वतः पटनायक आणि संगीत दिग्दर्शक तोष नंदा सोडून सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ चित्रसृष्टीत नवखे आहेत. चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया साधारण अडीच वर्षे चालली, आणि त्यादरम्यान अप्रशिक्षित स्थानिक अभिनेत्यांना त्यांच्या-त्यांच्या भूमिकांसाठी प्रशिक्षण देण्यात आले.
निर्माते कौशिक दास म्हणाले, "आधुनिक सुविधांची चणचण असलेल्या दुर्गम खेड्यात चित्रीकरण झाले. स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ, निसर्गदृश्ये आणि बोलीभाषा प्रकाशात आणल्या गेल्या. एका जिव्हाळ्याने आणि खुसखुशीत पद्धतीने ग्रामीण जीवन सादर केले आहे". या चित्रपटात अंदाजे 20% अभिनेत्यांना नाट्यसृष्टीची पार्श्वभूमी असून इतर सर्व अभिनेते स्थानिक म्हणजे ग्रामस्थ आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

बंगाली चित्रपट 'बिये फिये निये': शहरी मध्यमवर्गाचे समकालीन चित्रण
दिग्दर्शक नील दत्त यांच्या 'बिये फिये निये' या बंगाली चित्रपटाला नुकतेच फ्रान्समधील चित्रपट महोत्सवात परीक्षक मंडळाचे पारितोषिक मिळाले आहे. हाही चित्रपट शनिवारी इफ्फीमध्ये दाखवण्यात आला. ख्यातनाम निर्माते अंजन दत्त यांच्यासह चित्रपटाच्या पथकाने माध्यमांशी बोलताना, सहयोगातून हा चित्रपट कसा आकाराला आला, ते सांगितले. फ्रेंच चित्रनिर्माते फ़्रांस्वा त्रुफो यांच्या "चित्रपट मित्रांनी तयार करावेत आणि मित्रांनी पाहावेत" या मताचा संदर्भ देत, नील दत्त म्हणाले की- या चित्रपटाची कथा चार मित्रांनी मिळून लिहिली होती- ते स्वतः, प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते सावन चक्रवर्ती, सहाय्यक दिग्दर्शक उश्नक बासू आणि लाईन प्रोड्युसर अर्णब घोष. शहरी मध्यमवर्गाचे जीवन जसे आहे तसे उभे करण्याच्या दृष्टीने कथेत अनेकदा बदल झाले आणि पुनर्लेखने झाली.
नील दत्त म्हणाले की- समकालीन बंगाली चित्रपटांत त्यांची पिढी कमी प्रमाणात दाखवली जाते. आधुनिक जीवनातील गुंतागुंती आणि दुराग्रह/समजुती यांचा धांडोळा घेत त्यांचे अगदी थेट चित्रण हा चित्रपट करतो, असेही त्यांनी सांगितले. लग्नाच्या संकल्पनेभोवती फिरणारा 'बिये फिये निये', भारतीय विवाहसमारंभांतील सहसा ज्याबद्दल बोललेच जात नाही अशा संदिग्ध वास्तवाचे प्रतिबिंब दाखवतो.
ख्यातकीर्त अभिनेते-दिग्दर्शक-संगीततज्ज्ञ असणारे अंजन दत्त, या चित्रपटाचे निर्माते या भूमिकेतून म्हणाले, की चित्रनिर्मितीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. केवळ आर्थिक पाठबळ देऊन, तरुणाईला सर्जनशीलतेबाबत पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे, असा विचार त्यामागे होता. अंजन दत्त यांनी मृणाल सेन यांच्या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. पुढे, दिग्दर्शनात पदार्पण करताना त्यांनी पठडीबाज व्यावसायिक चित्रपटांपासून दूर जाणे पसंत केले आणि अर्थपूर्ण वास्तववादी चित्रपटांच्या पाठीशी उभे राहण्याचे महत्त्व कृतीतून दाखवून दिले. बॉलिवूडमधील अनेक यशस्वी समकालीन चित्रपट, दिग्गज चित्रनिर्मात्यांच्या पाठबळावर उभे राहिले आहेत, यावर भर देत त्यांनी, चित्रनिर्मात्यांची पुढची पिढी घडवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन प्रस्थापित दिग्दर्शकांना केले.

इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/जाई वैशंपायन/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193140
| Visitor Counter:
10