गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या भूज इथे सीमा सुरक्षा दलाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याला केले संबोधित
सुरक्षा दलांचे शौर्य आणि अथक प्रयत्नांमुळे येत्या 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादापासून देश पूर्ण मुक्त होईल – गृहमंत्री
आगामी पाच वर्षांत जगातील सर्वात आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत भारताचे सीमा सुरक्षा दल बनेल
सीमा सुरक्षा दलाच्या हीरक महोत्सवानिमित्त एका विशेष स्मृती टपाल तिकिटाचे प्रकाशन
Posted On:
21 NOV 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या भूज इथे सीमा सुरक्षा दलाच्या हीरक महोत्सवी समारंभाला संबोधित केले. यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीत सिंह चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जोपर्यंत सीमा सुरक्षा दल पहारा देत आहे, तोपर्यंत शत्रू भारताच्या एका इंच जमिनीकडेही पाहू शकत नाही, याची दखल गेल्या सहा वर्षांत सीमा सुरक्षा दलाने भारतातील लोकांसोबतच संपूर्ण जगाला घ्यायला लावली असल्याचे शहा यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाच्या शूर जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता, असामान्य शौर्य आणि कौशल्याने ‘प्रथम प्रतिसादक’ म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आहे, त्यासाठी अनेकांनी सर्वोच्च बलिदानही दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

सीमा सुरक्षा दलाने नक्षलग्रस्त भागांमध्येही उल्लेखनीय यश मिळवले आहे. आपल्या सुरक्षा दलांच्या शौर्य आणि अथक प्रयत्नांमुळे, 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल. 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचा आणि आपल्या आदिवासी बांधवांसाठी चोहोबाजूंनी विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी नमूद केले. एकट्या छत्तीसगडमध्येच सीमा सुरक्षा दलाने 127 माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रवृत्त केले, 73 माओवाद्यांना अटक केली आहे आणि 22 माओवाद्यांना कंठस्नान घातले, अशी माहिती त्यांनी दिली.

सीमा सुरक्षा दलाने देशात अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध अनेक कारवाया सुरू केल्या आहेत, आणि त्यात त्यांनी मोठे यशही मिळवले आहे. 2025 मध्ये सीमा सुरक्षा दलाने आतापर्यंत 18,000 किलोग्रॅमपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले आहेत—ही एक विक्रमी कामगिरी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संबोधनादरम्यान महान स्वातंत्र्यसैनिक हरेकृष्ण महताब, परमवीर चक्र विजेते सुभेदार जदुनाथ सिंह आणि भारतरत्न डॉ. सी.व्ही. रामन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. आज आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना एक शौर्य पोलीस पदक (मरणोत्तर), आठ राष्ट्रपती पदके, तसेच जनरल चौधरी चषक , महाराणा प्रताप चषक आणि अश्विनी कुमार चषक देऊन सन्मानित करण्यात आले आहे, ही बाब त्यांनी नमूद केली. सीमा सुरक्षा दलाच्या हीरक महोत्सवी सोहळ्यानिमित्त आज एक स्मृती टपाल तिकीटही प्रकाशित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हे तिकीट या दलाचा गौरवशाली 60 वर्षांचा प्रवास शतकानुशतके देशाच्या स्मृतीत अजरामर ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुवर्णा बेडेकर /तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192657)
Visitor Counter : 12