विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वदेशी 16-व्हॅलंट न्यूमोकोकल कॉंजुगेट लसीच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञान विकास मंडळाकडून नवी मुंबईच्या ‘टेकइन्वेंशन लाईफकेअर’ला आर्थिक पाठबळ

Posted On: 21 NOV 2025 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025

भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत तंत्रज्ञान विकास मंडळाने, नवी मुंबईच्या मेसर्स टेकइन्वेंशन लाईफकेअर लि.ला, स्वदेशी 16-व्हॅलंट न्यूमोकोकल कॉंजुगेट (PCV-16) लसीच्या निर्मितीसाठी व्यापारी तत्त्वावरील cGMP सुविधा उभारण्याकरिता वित्तीय सहाय्य मंजूर केले आहे. अद्ययावत कॉंजुगेट (विभिन्न रूपे घेणारे) लसींच्या निर्मितीबाबत भारताच्या क्षमता उंचावणे हा या सहाय्यित प्रकल्पाचा एक उद्देश आहे. देशांतर्गत नवोन्मेष आणि उत्पादन यांच्या माध्यमातून आयातीवरील दीर्घकाळपासूनचे अवलंबित्व कमी करण्याचाही उद्देश यामागे आहे.

PCV-16 तंत्रज्ञान हे 16 न्यूमोकोकल सेरोटाइप्सच्या धोरणात्मकरित्या निवडलेल्या पॅनेलवर तयार केले आहे.ते भारत आणि इतर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आक्रमक न्यूमोकोकल रोग (IPD), अँटीमायक्रोबियल प्रतिकार आणि उच्च मृत्यूच्या जोखमीशी संबंधित स्ट्रेनचे प्रतिनिधित्व करतात.

13 सेरोटाइप्स विद्यमान जागतिक पीसीव्ही मंचांशी ओव्हरलॅप होत असताना, तीन नवे सेरोटाइप्स - 12एफ, 15ए आणि 22एफ - यांचा समावेश केल्याने लसीकरण नसलेल्या सेरोग्रुपच्या विकासाविरुद्ध व्यापक कव्हरेज मिळते, व त्यामुळे या स्वदेशी दृष्टिकोनाचे सार्वजनिक-आरोग्य मूल्य अधिक बळकट होते.

हा प्रकल्प सेरोटाइप प्राधान्यक्रमाचे विज्ञान-आधारित पुनर्मूल्यांकन प्रतिबिंबित करतो. बालके, वृद्ध आणि असुरक्षित लोकसंख्येसाठी किफायतशीर लसीकरणाला समर्थन देण्यासाठीच याची रचना केली आहे. आरसीबी फरीदाबाद येथील बीएससी बायोनेस्ट बायो-इन्क्यूबेटरमधील टेकइन्व्हेन्शनच्या बीएसएल-2 सुविधेमध्ये सुरुवातीच्या अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम विकासाचे आयोजन करण्यात आले होते आणि नंतर ते नवी मुंबईतील कंपनीच्या जीएमपी-संरेखित हाय-कंटेनमेंट आर अँड डी सेंटर, 'होरिझॉन' मध्ये पुढे नेण्यात आले. अद्वितीय सेरोटाइप डिझाइन आणि प्रक्रिया नवकल्पनांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय पेटंट दाखल करण्यात आले आहे.

तंत्रज्ञान विकास मंडळाच्या पाठिंब्याने, हा प्रकल्प आता पूर्ण-प्रमाणात सीजीएमपी उत्पादनाकडे वाटचाल करेल, जेणेकरून प्रगत कॉन्जुगेट लस तंत्रज्ञान देशात विकसित, प्रमाणित आणि व्यावसायिक केले जाईल याची खात्री होईल. या उपक्रमामुळे भारताच्या महत्त्वाच्या लसींमध्ये स्वावलंबनाला लक्षणीयरीत्या चालना मिळेल, देशांतर्गत जैव उत्पादन क्षमता वाढेल आणि भविष्यातील मल्टीव्हॅलेंट मंचांसाठी मार्ग तयार होतील अशी अपेक्षा आहे.

टेकइन्व्हेन्शन लाईफकेअर लिमिटेडने वाढत्या तांत्रिक क्षमता दाखवून दिल्या आहेत, 15 हून अधिक पेटंट घेतले आहेत आणि भारतातील पहिल्या 6-इन-1 (सहा प्रकारे उपयोगी पडणारी एक लस) मेनिन्गोकोकल कंजुगेट लसीसह अनेक स्वदेशी लसींवर काम केले आहे. पुढील पिढीच्या लस नवोन्मेषात योगदान देण्यासाठी राष्ट्रीय एजन्सींनी कंपनीला मान्यता दिली आहे

या प्रसंगी बोलताना, टीडीबीचे सचिव श्री. राजेश कुमार पाठक म्हणाले-: "पीसीव्ही-16 प्रकल्प हा उच्च-प्रभावी, पुढील पिढीच्या लस तंत्रज्ञानाचा प्रकार असून,त्याला पाठबळ देणे हे टीडीबी चे उद्दिष्ट आहे. स्वदेशी विकास आणि व्यावसायिक-प्रमाणात उत्पादन सक्षम करून, आपण राष्ट्राची सिद्धता वाढवत आहोत आणि भारताच्या लसीकरण परिसंस्थेला विश्वासार्ह, देशांतर्गत उपायांचे पाठबळ मिळण्याची खातरजमा करत आहोत."

टेकइन्व्हेन्शनच्या प्रवर्तकांनी पुढे म्हटले-: "टीडीबीकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे आमच्या पीसीव्ही-16 चा-- प्रगत संशोधन आणि विकासापासून मोठ्या प्रमाणात, परवडणाऱ्या उत्पादनापर्यंतचा प्रवास वेगाने होईल. भारतासह निम्न आणि मध्यम उत्पन्न देशांसाठी तयार केलेल्या व्यापक-कव्हरेज लसी वितरित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये ही भागीदारी केंद्रस्थानी आहे."


सुवर्णा बेडेकर /जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2192615) Visitor Counter : 9