कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विक्रमी अन्नधान्य उत्पादनाने मागील सर्व उच्चांक काढले मोडीत, भारताच्या कृषी क्षेत्रात जोडले यशाचे नवे अध्याय


कृषी मंत्रालयाने 2024-25 साठी पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज केला जारी - एकूण अन्नधान्य उत्पादनात जवळपास 8% विक्रमी वाढ

अन्नधान्याचे उत्पादन 2023-24 मधील 332.30 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2024-25 मध्ये 357.73 दशलक्ष टनांपर्यंत वाढले

विक्रमी उत्पादनासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांचे मानले आभार

Posted On: 20 NOV 2025 8:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे 2024-25 च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. विक्रमी अन्नधान्य उत्पादन घेतल्याबद्दल त्यांनी देशातील शेतकऱ्यांचे आभार मानले. त्यांनी डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात झालेल्या उत्साहवर्धक वाढीचे स्वागत केले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत भारतात अन्नधान्य उत्पादनात सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. अन्नधान्य उत्पादन 2015-16 मधील 251.54 दशलक्ष टनांपासून 106 दशलक्ष टनांनी वाढून आता 357.73 दशलक्ष टन झाले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कृषी क्षेत्रातील जलद वाढीचे प्रतिबिंब आहे.

केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगितले की, तांदळाचे उत्पादनही 1,501.84 लाख टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या 1,378.25 लाख टनांपेक्षा 123.59 लाख टन जास्त आहे. गव्हाच्या उत्पादनानेही विक्रमी वाढ नोंदवली असून ते , 1,179.45 लाख टन झाले आहे.जे गेल्या वर्षीच्या 1,132.92 लाख टनांपेक्षा 46.53 लाख टनांनी वाढले आहे. मूग उत्पादन 42.44 लाख टन, सोयाबीन 152.68 लाख टन आणि भुईमूग 119.42 लाख टन झाले आहे. मका आणि 'श्रीअन्न' (भरड धान्ये) यांचे उत्पादन अनुक्रमे 434.09 लाख टन आणि 185.92 लाख टन होण्याचा अंदाज आहे जे गेल्या वर्षी अनुक्रमे 376.65 लाख टन आणि 175.72 लाख टन होते.

तेलबिया उत्पादनात झालेल्या जोरदार वाढीबद्दल समाधान व्यक्त करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, 2024-25 मध्ये एकूण तेलबिया उत्पादन विक्रमी 429.89 लाख टन होण्याचा अंदाज आहे, जो 2023-24 मध्ये उत्पादित झालेल्या 396.69 लाख टनांपेक्षा 33.20 लाख टनांनी जास्त आहे.

केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पीकानुसार उत्पादनाचा तपशील खालीलप्रमाणे सादर केला:

एकूण अन्नधान्य - 3577.32 लाख टन (विक्रमी)

● तांदूळ - 1501.84 लाख टन (विक्रमी)

● गहू - 1,179.45 लाख टन (विक्रमी)

● पोषण/भरड धान्ये - 639.21 लाख टन

● मका - 434.09 लाख टन

● एकूण डाळी - 256.83 लाख टन

● श्री अन्न (भरड धान्य) - 185.92 लाख टन

● हरभरा - 111.14 लाख टन

● मूग - 42.44 लाख टन

● तूर - 36.24 लाख टन

एकूण तेलबिया - 429.89 लाख टन

● सोयाबीन - 152.68 लाख टन (विक्रमी)

● भुईमूग - 119.42 लाख टन (विक्रमी)

● रेपसीड  आणि मोहरी - 126.67 लाख टन

ऊस - 4,546.11 लाख टन

कापूस - 297.24 लाख गाठी (प्रत्येकी 170 किलो)

अंतिम अंदाज जाहीर केल्यानंतर, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भविष्यातील धोरणांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'डाळींमध्ये आत्मनिर्भरता अभियान'मुळे डाळींचे उत्पादन वाढण्यास मोठी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या विविध कृषी कल्याणकारी कार्यक्रमांमुळे अन्नधान्य उत्पादनात यापुढेही सकारात्मक परिणाम दिसत राहतील, असे त्यांनी सांगितले.

चौहान यांनी तूर, उडीद, हरभरा आणि मूग यांच्या किमान आधारभूत किमतीच्या खरेदीच्या आश्वासनावरही प्रकाश टाकला आणि या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा देशभरातील बहुसंख्य शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे नमूद केले. सरकार शेती आणि शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रभावी प्रयत्न करत  राहील, असेही त्यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करा:


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2192352) Visitor Counter : 7