आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांचे भारत मंडपम येथे नॅशनल वन हेल्थ मिशन असेंबली 2025 मध्ये उद्घाटनपर भाषण
‘एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य’ ही केवळ एक संकल्पना नाही तर ती आरोग्य सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील साथीच्या आजारांविरुद्ध सज्जता वाढवण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचा पाया आहे : जे पी नड्डा
Posted On:
20 NOV 2025 9:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि 'एक आरोग्य'वरील कार्यकारी सुकाणू समितीचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज भारत मंडपम कन्व्हेन्शन हॉलमध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे नॅशनल वन हेल्थ मिशन (राष्ट्रीय एक आरोग्य अभियान) असेंब्ली 2025 मध्ये उद्घाटनपर भाषण केले. दोन दिवसांच्या या कार्यक्रमाची संकल्पना “ज्ञानाचा व्यवहारात समावेश - एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य” अशी आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, नड्डा यांनी संकल्पनेची समयोचितता अधोरेखित केली. देशाची समग्र आरोग्याप्रति वाढती वचनबद्धता आणि जागतिक प्राधान्यांशी त्याचे संरेखन यातून प्रतिबिंबित होते असे त्यांनी नमूद केले. "'एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य' ही केवळ एक संकल्पना नाही - ती आरोग्य सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील साथीच्या आजारांविरुद्ध सज्जता वाढवण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचा पाया आहे," असे ते म्हणाले.

गेल्या दशकात आरोग्य संशोधन आणि नवोन्मेषात भारताने केलेली प्रगती अधोरेखित करताना, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की भारत औषधनिर्माण आणि वैद्यकीय शास्त्रात एक प्रमुख जागतिक शक्ती म्हणून उदयास आला आहे.. "भारताने शंभराहून अधिक देशांसाठी लसी विकसित केल्या आहेत आणि पुरवल्या आहेत, ज्यामुळे एक विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून आपली भूमिका पुन्हा स्पष्ट झाली आहे," असे त्यांनी नमूद केले.
भारताने पुढील पिढीच्या लसीकरण प्लॅटफॉर्ममध्येही उल्लेखनीय प्रगती केली आहे यावर नड्डा यांनी भर दिला .
राष्ट्रीय एक आरोग्य अभियानाचा उल्लेख करत नड्डा यांनी हे महामारीविरोधात सज्जतेच्या दिशेने भारताने उचललेले सर्वात महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. या अभियानात मानवी आरोग्य, प्राणी आरोग्य, पर्यावरण, कृषी, औषधनिर्माण, संरक्षण, पृथ्वी विज्ञान, अंतराळ विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या16 वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्य मंत्रालये/विभागांचा समावेश आहे. "राष्ट्रीय एक आरोग्य अभियान हे संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाजाच्या सहकार्याचे एक अनोखे उदाहरण आहे. पहिल्यांदाच, आम्ही सर्व संबंधित मंत्रालये आणि विभागांना मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी सामुहिक काम करण्यासाठी एकत्र आणले आहे," असे ते म्हणाले.
या अभियानाने महत्त्वाच्या उपक्रमांची याआधीच अंमलबजावणी सुरू केली आहे याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले .
मंत्र्यांनी यावर भर दिला की एक आरोग्य दृष्टिकोन साथीच्या रोगांसाठी पूर्वसूचना प्रणाली सक्षम करेल, एकात्मिक हस्तक्षेपांना समर्थन देईल आणि भारताला भविष्यासाठी सज्ज राहण्यास मदत करेल. त्यांनी हे संमेलन आयोजित केल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आणि नमूद केले की हे संमेलन सहकार्य, ज्ञानाची देवघेव आणि विविध क्षेत्रांतील भागीदारीसाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करेल.
या प्रसंगी बोलताना डॉ. व्ही. के. पॉल यांनी एकात्मिक, सहयोगी परिसंस्थेद्वारे मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आज खऱ्या जनचळवळीची सुरुवात होत असल्याचे अधोरेखित केले.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192345)
Visitor Counter : 3