जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक शौचालय दिन 2025 निमित्त जलशक्ती मंत्रालयाने हमारा शौचालय, हमारा भविष्य उपक्रमाचा केला शुभारंभ


हा राष्ट्रव्यापी उपक्रम 19 नोव्हेंबर 2025 पासून 10 डिसेंबर 2025 या मानवाधिकार दिनापर्यंत सुरु राहणार

Posted On: 20 NOV 2025 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 नोव्हेंबर 2025

 

जल शक्ती मंत्रालयाच्या  पेयजल आणि स्वच्छता विभागाने जागतिक शौचालय दिन 2025 रोजी ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली.

हमारा शौचालय, हमारा भविष्य ही मोहीम, स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी शौचालयांचे महत्त्व आणि आजच्या समुदायासाठी सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांची सेवा पुरवण्यासाठी त्यांच्या  योग्य देखभालीचे महत्त्व अधोरेखित करते. ही मोहीम ग्रामीण भागातील सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरांमधील वैयक्तिक शौचालयाचे कार्यक्षमता मूल्यांकन, दुरुस्ती आणि त्यांचे आधुनिक पद्धतीने सौंदर्यीकरण यावर भर देते. ही मोहीम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.

या मोहिमेची काही प्रमुख उद्दिष्टे :

  • सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरांमधील वैयक्तिक शौचालयांच्या कार्यक्षमतेत वृद्धी करुन त्यांची दुरुस्ती करणे.
  • सामुदायिक शौचालयांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कार्य आणि देखभाल प्रणालींचे मूल्यांकन आणि बळकटीकरण
  • सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरांमधील वैयक्तिक शौचालयांचे आधुनिक पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यासाठी समुदायांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे.
  • समुदाय तसेच विशेषतः शाळांमध्ये खालील गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करणे. (i) व्यक्ती, समाज आणि देशासाठी  स्वच्छता आणि स्वच्छताविषयक सवयींचे महत्व. (ii) मलमूत्र व्यवस्थापनासाठी सुरक्षित हाताळणी, तसेच रेट्रोफिटिंग म्हणजे जुनी व्यवस्था सुधारून सुरक्षित बनवणे आणि समुदाय स्तरावरील फेकल स्लज मॅनेजमेंट अर्थात संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि सुरक्षित निपटारा/पुनर्वापर. (iii) हवामान लवचिक स्वच्छता आणि सेवा वितरण प्रोटोकॉल.
  • संपूर्ण स्वच्छतेविषयी सामूहिक जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी जनभागीदारीचा प्रसार.

भारतात स्वच्छ भारत मोहीम (ग्रामीण) 2014 सुरु झाल्यापासून देशाने  ग्रामीण भागात सर्वाना शौचालये उपलब्ध करुन देण्यात तसेच गावे हागणदारी मुक्त करण्यात अभूतपूर्व प्रगती केली असून 2019 पर्यंत देशभरात 11 कोटींहून अधिक शौचालये उभारण्यात आली आहेत. स्वच्छ भारत मोहीम (ग्रामीण) च्या दुसऱ्या टप्प्याला 2020 मध्ये सुरुवात झाली आणि या टप्प्यात हगणदारीमुक्त आदर्श गाव संकल्पनेत गावे कायमस्वरूपी  हगणदारीमुक्त राहावीत,  गावांमध्ये उभ्या केलेल्या स्वच्छता व्यवस्थेचे प्रत्यक्ष पातळीवरील कार्य अधिक मजबूत व्हावे हा घटक महत्त्वाचा ठरला. हमारा शौचालय, हमारा भविष्य या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मोहीम (ग्रामीण) अंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आवाहन करण्यात येणार आहे.

या मोहिमेची रचना  विविध क्षेत्रीय आणि सामुदायिक सहभाग वाढविण्यासाठी  करण्यात आली असून मोहिमेच्या कालावधीत प्रत्यक्ष उपक्रम राबवण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ग्राम पंचायती, प्रभाग, जिल्हा स्तरावर जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.  राज्य/केंद्रशासित प्रदेश पातळीवरील सर्व संबंधित विभागांना सहभागी होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या मोहिमेविषयी जनजागृती करण्यासाठी आणि शौचालयांच्या वापराचे आणि स्वच्छतेचे महत्त्व जास्तीत जास्त अधोरेखित होण्याच्या दृष्टीने राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्ती, पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती, निवृत्त लष्करी कर्मचारी तसेच निमलष्करी दलातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक किंवा युवा समूह  (राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), नेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि विद्यार्थ्यांना या कार्यात सहभागी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव आणि पात्र लाभार्थ्यांना व्यक्तिगत घरगुती शौचालय (IHHL) मंजुरीपत्रांचे वितरण हे देखील या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या मोहिमेची सांगता  10 डिसेंबर 2025 रोजी मानवाधिकार  दिनी होणार आहे.

 

* * *

शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2192066) Visitor Counter : 10