विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी, सिकलसेल या प्रामुख्याने आदिवासी लोकसंख्येमध्ये प्रादुर्भाव असलेल्या आजारासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी "CRISPR" आधारित जनुक उपचारपद्धतीचा केला शुभारंभ


आदिवासी स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांना समर्पित असलेली ही उपचार पद्धती "बिरसा 101" नावाने ओळखली जाणार

Posted On: 19 NOV 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर 2025

विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारतातील आदिवासी लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या सिकल सेल या आजारावरील भारतातील पहिल्या स्वदेशी "CRISPR" आधारित जनुक उपचारपद्धतीचा शुभारंभ केला. "बिरसा 101" असे नाव देण्यात आलेली ही उपचार पद्धती आदिवासी आदिवासी स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांना समर्पित आहे. नुकतीच त्यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी झाली.

या उपचार पद्धतीचा शुभारंभ करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारताने सिकलसेल आजारापासून मुक्त देश बनण्याच्या दिशेने आपला निर्णायक प्रवास औपचारिकपणे सुरू केला असून, देशाचे सार्वजनिक आरोग्य आणि जीनोमिक औषध विज्ञान परीप्रेक्ष्यातील हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

भारतातील पहिल्या स्वदेशी CRISPR-आधारित जनुक उपचारपद्धतीचा विकास आणि हस्तांतरणासह, देशाने 2047 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिकलसेल-मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे, आणि त्याच वेळी आघाडीच्या वैद्यकीय तंत्रज्ञानात आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पुढे नेले आहे, असे ते म्हणाले.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी नमूद केले की, सीएसआयआर-इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) येथे विकसित केलेल्या या संशोधनाने जागतिक किमतीच्या तुलनेत अत्यंत कमी किमतीत पथदर्शी उपचारपद्धती विकसित करण्याची भारताची क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे ही उपचार पद्धती परदेशातील 20–25 कोटी रुपये खर्चाच्या उपचारपद्धतींची जागा घेईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

त्यांनी अधोरेखित केले की हा नवोन्मेश, देशाच्या विशेषतः या आजाराचा सर्वाधिक भार असलेल्या मध्य आणि पूर्व भारतातील आदिवासी समुदायांसाठी, महत्वाचा ठरेल. त्यांनी वैज्ञानिक संस्थांना इन्फोग्राफिक्स आणि सोशल मीडियाद्वारे सोप्या भाषेत हे यश समजावून सांगण्याचे  आवाहन केले, जेणेकरून लोकांना या प्रगतीचे महत्त्व पूर्णपणे समजेल.

सरकारी वैज्ञानिक संस्था आणि भारतीय उद्योग, विशेषत: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातील वाढत्या समन्वयाची डॉ.जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली.

ते म्हणाले की, बीआयआरएसए 101 आणि CRISPR प्लॅटफॉर्म सीरम इन्स्टिट्यूटसारख्या जागतिक आघाडीच्या उत्पादकाकडे हस्तांतरित केल्यामुळे किफायतशीरता, मापनक्षमता आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनाची हमी मिळतेआणि प्रगत जनुक-संपादन उपचार भारतीय रूग्णांसाठी, विशेषत: वंचित आदिवासी लोकसंख्येसाठी सहज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होतो.

"आपण आता केवळ जागतिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाही, तर ते निर्माण करत आहोत. परवडण्याजोग्या, अत्याधुनिक आरोग्यसेवेच्या भविष्यासाठी जग आता भारताकडे पाहील," केंद्रीय मंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. उमेश शाळीग्राम यांनी कृतज्ञता व्यक्त केली, आणि आयजीआयबीच्या नवोन्मेशाचा प्रत्यक्ष प्रभाव पाडण्यासाठीच्या संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.


निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2191901) Visitor Counter : 6