दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी साधला संवाद
भारतात गुंतवणूक करण्याचे व भारताच्या भवितव्याला आकार देण्याचे भारतीय समुदायाला केले आवाहन
परदेशात भारताचे सक्षमीकरण- संबंध दृढ करून प्रगतीला दिशा देण्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पेम्मासनी यांनी भारतीय समुदायाला केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2025 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025
केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी सोमवारी संध्याकाळी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. हजारापेक्षा अधिक संख्येने उपस्थिती असलेल्या चैतन्यमयी सोहळ्याच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. यामध्ये तेल आणि वायू, आतिथ्यशीलता, आणि वस्तुव्यापार अशा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील व्यावसायिकांचा आजच्सया उपस्थितांमध्ये समावेश होता. शिवाय विद्यापीठांचे 380 विद्यार्थीही उपस्थित होते.
इंडियन अझरबैजान असोसिएशन, अझरबैजान तेलगू असोसिएशन, बाकु तमिळ संघम आणि इंडियन स्टुडन्ट्स असोसिएशन ऑफ अझरबैजान अशा विविध संस्था-संघटनांच्या स्थापनेतून प्रतिबिंबित होणारी भारतीय समुदायाची एकता प्रशंसनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मायदेशापासून सहस्रावधी मेल दूर असूनही आपल्या वारशाच्या मुळांशी घट्ट रुजलेला आणि तरीही- आधुनिक, बलशाली, आणि महत्त्वाकांक्षी असा भारताचा चेहरा या संमेलनातून दिसून येतो- असे उद्गार त्यांनी काढले.
भारताच्या बदलत्या परिदृश्यावर प्रकाश टाकत केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पेम्मासनी यांनी, डिजिटल नवोन्मेष, नवीकरणक्षम ऊर्जा,अवकाश संशोधन, आणि आर्थिक गतिशीलता या बाबतींतील भारताची प्रगती अधोरेखित केली. भारतीय समुदायाच्या सदस्यांनी भारताच्या विकासयात्रेशी जोडून घ्यावे यावर भर देत पेम्मासनी यांनी आवर्जून सांगितले की- त्यांच्या यशाने भारताचे जगातील स्थान उंचावते, त्यांच्या गुंतवणुकीने संधी निर्माण होतात आणि त्यांची मुले दोन संस्कृतींमधील भावी सेतूचे काम करणार आहेत.
तरुणाईने त्यांचा दुपेडी परिचय अभिमानाने मिरवावा, भारताच्या प्राचीन विद्वत्तेचा आधुनिक बहुसांस्कृतिकतेशी संगम घडवून आणावा, असे आवाहन राज्यमंत्री पेम्मासनी यांनी केले. तेथील भारतीय समुदायाने परस्परांच्या आणि भारताच्या नित्य संपर्कात राहावे, ज्ञानाची देवघेव करावी, तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करावे, आणि भारताच्या विकासगाथेत आपलेही योगदान द्यावे- असे आवाहन त्यांनी केले. अनिवासी भारतीय समुदायाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी सदैव खुले आहेत, असे सांगून पेम्मासनी यांनी त्यांना आश्वस्त केले.




* * *
गोपाळ चिप्पलकट्टी/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2191645)
आगंतुक पटल : 16