ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खाद्यान्नाची साठवण, वाहतूक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रमुख डिजिटल सुधारणांचा केला प्रारंभ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेला बळकटी देत, गरीब व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली अधोरेखीत
Posted On:
18 NOV 2025 10:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज अनेक डिजिटल उपक्रमांचा प्रारंभ केला. खाद्यान्य गोदामांच्या कार्यान्वयनाचे आधुनिकीकरण करणे, पुरवठा साखळीच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणणे आणि संपूर्ण सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाला प्रल्हाद जोशी यांनी संबोधित केले. या उपक्रमांमुळे लॉजिस्टिकसाठी होणाऱ्या खर्चात घट साध्य करणे आणि मालवाहतूकीला लागणारा वेळ कमी करण्याच्या सरकारच्या ध्येय उद्दिष्टांना पाठबळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री गति शक्ती कार्यक्रमामुळे वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये एकसंधता आणली आहे, तसेच व्यावसायिक वाहतूक विषयक एकात्मिक परिसंस्थेचा पाया घातला असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सगळ्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची असल्याचेही त्यांनी अधेरोखित केले. मात्र त्याचवेळी अत्यंत गरीब व्यक्तींपर्यंत प्रभावीपणे आणि पारदर्शकरित्या सेवा पोहोचवताना, त्यातला मानवी स्पर्श आपण गमावू नये असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय गोदामे महामंडळाचे Bhandaran 360 हे नवे, उद्योगविषयक संसाधन नियोजन विषयक एकात्मिक व्यासपीठ, या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे. हे व्यासपीठ SAP S/4HANA च्या आधारे विकसित केले गेले आहे.
या सुधारित व्यासपीठाअंतर्गत लीड अर्थात नव्या व्यवसायाची संधी आणि विपणन व्यवस्थापन विभागाची सोय उपलब्ध करून दिली गेले आहे. यासोबतच एकात्मिक मनुष्यबळ व्यवस्थापन व्यवस्था, प्रकल्प नियोजन, SAP FICO अर्थात आर्थिक लेखा विभाग, स्मार्ट साधन सामग्री व्यवस्थापन, जैवओळख तंत्रज्ञानाधारीत तसेच भौगौलिक स्थानाच्या चिन्हांकनासह हजेरी, मापन पुस्तकांसाठी मोबाइल ॲप तसेच अधिक सक्षम स्वरुप दिलेल्या करारांचा मागोवा घेण्याची सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा या व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.

कंटेनर आणि मोठ्या प्रमाणातील वस्तूमाल साठ्याची हाताळणी स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी स्मार्ट निर्यात - आयात (EXIM - Export / Import) गोदाम
कंटेनर आणि मोठ्या प्रमाणातील वस्तूमाल साठ्याची हाताळणी स्वयंचलित पद्धतीने करता यावी यासाठी, केंद्रीय कोठार महामंडळाने डिजिटल परिवर्तन 2.0 अंतर्गत, मालवाहू कंटेनर स्थानके आणि सामान्य स्वरुपातील गोदामांसाठी स्मार्ट स्मार्ट निर्यात - आयात गोदाम व्यवस्थाही उपलब्ध करून दिली गेली आहे. या व्यवस्थेअंतर्गत प्रमुख क्रिया-प्रक्रिया स्वयंचलितपद्धतीने करता याव्यात यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, फास्ट टॅग, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन आणि जागतिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली अर्थात जागतिक दिशामार्गदर्शन उपग्रह प्रणाली यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.

या साधनांमुळे प्रत्यक्ष मानवाने कामे हाताळण्याची गरज कमी होईल, वस्तूमालाच्या हाताळणीचा वेग वाढेल, तसेच व्यावसायिक वाहतुकीशी संबंधित सुरुवातीपासून ते अखरेच्या टप्प्यापर्यंतच्या सर्व क्रिया प्रक्रियांमध्ये पारदर्शकता येईल. यासोबतच यामुळे वस्तूमालाच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होईल, आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेतही सुधारणा घडून येईल.

भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने अन्न दर्पण या एकात्मिक, मोबाईल फोन पुरवठा साखळी कार्यान्वयानाचा प्रारंभ
भारतीय अन्न महामंडळाने अन्न दर्पण हे मायक्रो सर्विसेस आधारित नवे व्यासपीठ सुरु केले आहे. विद्यमान डेपो ऑनलाइन सिस्टीम या व्यासपीठाच्या जागी ते अमलात आणले जाईल. अन्न दर्पणच्या माध्यमातून खरेदी, साठवणूक, मालाची वाहतूक, विक्री, गुणवत्ता तपासणी, कामगार व्यवस्थापन आणि करारांचा मागोवा यांसारख्या अनेक प्रमुख क्रिया प्रक्रियांना परस्परांसोबत जोडण्यात आले आहे. हे व्यासपीठ भारतीय अन्न महामंडळ तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग या दोघांसाठी सत्यतेचा एकात्मिक स्रोत ठरला आहे. या व्यासपीठामुळे भारताच्या अन्न पुरवठा साखळीच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा घडून येईल अशी अपेक्षा आहे.
सार्वजनिक पुरवठा व्यवस्थेशी संबंधित नागरिकांचा अभिप्राय मिळवण्याच्या व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आशा हे व्यासपीठ
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आशा अर्थात, अन्न सहाय्यता विषयक कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत सर्वसमावेशक उपाययोजना (Anna Sahayata Holistic AI Solution) या व्यासपीठाचाही प्रारंभ केला आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत कॉलच्या माधमातून शिधा वितरणाबद्दलचा त्यांचा अभिप्राय सामायिक करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आशा या व्यासपीठाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना, त्यांना त्यांच्या पूर्ण हक्काचा लाभ मिळाला की नाही, अन्नधान्याची गुणवत्ता कशी आहे, तसेच रास्त दरातील दुकानांमध्ये त्यांना काही अडचण आल्या असतील तर, याबद्दलचा आपला अभिप्राय पोहचवण्यात मोठी मदत होते.
सुरुवातीच्या टप्प्यात पाच राज्यांमध्ये आशा हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. त्यानंतर आणखी 15 राज्यांपर्यंत त्याचा विस्तार केला गेला. आता मार्च 2026 पर्यंत, हे व्यासपीठ, दरमहा देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 20 लाख नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191475)
Visitor Counter : 4