पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ब्राझील मध्ये बेलेम येथे झालेल्या कॉर्प - 30 गोलमेज परिषदेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी उद्योजकांना केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 18 NOV 2025 11:24AM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी ब्राझील मध्ये बेलेम येथे 17.11.2025 रोजी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषदेअंतर्गत कॉर्प थर्टी परिषदेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपन्यांच्या प्रमुखांच्या गोलमेज परिषदेला संबोधित केले. पॅरिस कराराअंतर्गत सहयोगी, तंत्रज्ञानावर आधारित आणि शाश्वत औद्योगिक संक्रमणाप्रति भारताची वचनबद्धता त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

जागतिक हवामान बदलाच्या संक्रमण काळात अगदी योग्य निर्णायक टप्प्यावर  ही गोलमेज परिषद होत असल्याचे लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन (LeadIT) चे सह-अध्यक्ष म्हणून अधिवेशनाची सुरुवात करताना यादव यांनी सांगितले. "ही गोलमेज परिषद अगदी महत्त्वाच्या टप्प्यावर होत असून जग  पॅरिस कराराची दशकपूर्ती करत असताना आपल्याला आता उद्दिष्ट निर्धारणापासून अंमलबजावणीच्या टप्प्याकडे मार्गक्रमण केले पाहिजे" असे ते म्हणाले.

लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन ची स्थापना झाल्यापासून यातील सदस्य देशांची संख्या 18 झाली असून त्यात 27 कंपन्या आहेत. यामाध्यमातून जागतिक हवामान बदल अजेंड्यावर औद्योगिक संक्रमण यशस्वीरित्या पुढे नेले आहे,  संक्रमणाच्या पथदर्शी आराखड्याला समर्थन दिले आहे , शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दृष्टीने जागतिक स्तरावर पारदर्शकतेत वाढ केली आहे आणि ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी व्यासपीठ तयार केले आहे. वृद्धी आणि शाश्वतता यांकडे पाहण्याचा भारताचा संतुलित दृष्टिकोन विषद करताना यादव यांनी भारताच्या आर्थिक वृद्धीसोबतच सातत्याने कमी होत असलेल्या कार्बन उत्सर्जनाचा मुद्दा अधोरेखित केला. 2005 ते 2020 दरम्यान, भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची उत्सर्जनाची तीव्रता (GDP) 36% ने कमी झाली. यातून  विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समतोल साधण्याबाबत देशाची बांधिलकी स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

भारत आणि स्वीडन यांच्या  संयुक्त निधीतून स्थापन झालेल्या उद्योग परिवर्तन मंच अंतर्गत झालेल्या प्रगतीची  यादव यांनी नोंद घेतली. या उपक्रमाअंतर्गत भारत आणि स्वीडन मधील 18 उद्योग आणि संशोधन संस्था लवकरच प्रकल्प सुरु करणार असून त्यामध्ये औद्योगिक सह उत्पादन आणि वायूंमधून मूल्य निर्मिती, कार्बन कॅप्चर आणि त्याचा वापर, प्रक्रियांच्या अनुकूलनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, विद्युतीकरण आणि हायड्रोजन-आधारित औद्योगिक तापमान प्रणाली यांसारख्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.

सर्व राष्ट्रांनी, उद्योगांनी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांनी सहकार्य वाढवावे असे आवाहन यादव यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केले. हे औद्योगिक परिवर्तन  सुरु असताना जागतिक भागीदार, देश आणि उद्योगांनी देखील त्यात सहभागी व्हावे यासाठी यादव यांनी त्यांना आमंत्रित केले. आपले एकत्रित प्रयत्न पॅरिस कराराची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहाय्य करतील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्याची निर्मिती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2191097) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil